Animal Health : जनावरांच्या आरोग्यासाठी दूर्वा, आघाडा फायदेशीर

गौरी-गणपती पूजेसाठी वापरण्यात येणाऱ्या दूर्वा आणि आघाडा वनस्पती जनावरांच्या आरोग्यास देखील उपयुक्त आहेत. दूर्वामध्ये विविध औषधी गुणधर्म आहेत. आघाड्याच्या पानांचा रस मूतखड्यावर उपयोगी आहे.
Animal Health
Animal HealthAgrowon

डॉ. स्वाती उमप, डॉ. आरजू सोमकुवर

गौरी-गणपती पूजेसाठी वापरण्यात येणाऱ्या दूर्वा (Durva) आणि आघाडा वनस्पती (Aghada Medicinal Plant) जनावरांच्या आरोग्यास (Animal Health) देखील उपयुक्त आहेत. दूर्वामध्ये विविध औषधी गुणधर्म (Medicinal Properties In Durva) आहेत. आघाड्याच्या पानांचा रस मूतखड्यावर (Aghada Juice Useful In Kideny Stone) उपयोगी आहे.

Animal Health
Animal Care : जनावर गाभण न राहण्याच्या समस्येवर घरगुती उपचार

दूर्वा

पावसाळ्यात दूर्वा मुबलक प्रमाणात आढळतात. दूर्वांमध्ये प्रथिने, कर्बोदके, खनिजे, साइटोस्टेरॉल, फ्लेव्हॅनॉइड्स, अल्कलॉइड्स, ग्लायकोसाइड्स आणि ट्रायटरपेनॉइड्स असतात.

आयुर्वेद आणि युनानी उपचार शास्त्रात दूर्वा वनस्पतीचे विविध औषधी उपयोग सांगितले गेले आहेत.

उदर विकारांसाठी (जळजळ) आणि इतर विकारांसाठी दूर्वा गुणकारी औषधी आहे. दूर्वा गर्भाशयाला सुदृढ बनवते आणि शक्तिवर्धकसुद्धा आहेत. त्यामुळे त्या गर्भधारणेस पोषक असतात.

माजावर येणाऱ्या गाई, म्हशींना दूर्वा खाऊ घातल्यास पोषणासही मदत होते तसेच गर्भपात टाळता येतो. मोठ्या जनावरांना (गाय, म्हैस) ४० ते ५० ग्रॅम आणि लहान जनावरांमध्ये (शेळी, मेंढी) २० ते ३० ग्रॅम दूर्वा खाऊ घालाव्यात.

बरेचदा आपण पाहतो की मांजर, श्‍वानांना पोटात दुखत असेल किंवा ते अस्वस्थ असतील तर त्वरित उलटी करण्यासाठी दूर्वा खातात.

दुर्गम भागात दूर्वा मुळानिशी कुटून त्याचा लेप बनवून फोड व फुंशीवर लावतात.

Animal Health
Animal Care: रक्तनमुना मेंढराचा,अहवाल शेळीचा

आघाडा

गौरी-गणपती पूजेसाठी आघाडा वनस्पतींच्या पानाला विशेष महत्त्व आहे. या वनस्पतीच्या पानांचा गौरीच्या पूजेतील पत्रींमध्ये समावेश असतो. दूर्वांप्रमाणेच काही भागांत आघाड्याची २१ पाने गणपतीला वाहिली जातात.

पांढरा आघाडा आणि तांबडा आघाडा असे आघाड्याचे मुख्य दोन प्रकार आहेत. आघाडा मूत्रजनन आहे.

आयुर्वेदानुसार आघाड्याच्या पानांचा रस मूतखड्यावर उपयोगी आहे. रानभाजी म्हणूनही बहुतांशी भागात आघाड्याच्या कोवळ्या पानांची भाजी आवडीने खाण्यात येते.

आघाड्याची १० ते २० मध्यम आकाराची पाने, १० ते १५ मिरे आणि १० ते १५ लसूण पाकळ्या बारीक कुठून त्याची गोळी खाऊ घातल्यास थंडी आणि सर्दीमुळे जनावरांना आलेला ज्वर (ताप) कमी होतो.

गायी-म्हशींमधील झार पडत नसल्यास आघाड्याची पूर्ण १ ते २ झाड खाऊ घातल्यास झार पडण्यास मदत होते.

जनावरांच्या किरकोळ जखमांवर आघाड्याचा पानांचा लेप लावल्यास जखमा दुरुस्त होण्यास मदत होते.

जनावरे किंवा मनुष्याच्या पायात काटा विशेषत: बाभळीचा काटा मोडल्यास आघाड्याचा रस चोळून लावावा, त्याचा लगदा बांधल्यास, काटा वर येतो आणि दुखणे सुद्धा थांबते.

जनावरांच्या शरीरावर होणाऱ्या गोमाश्या आणि गोचीडसुद्धा आघाड्याच्या पानांचा लगदा वा लेप बनवून लावल्यास २ ते ३ दिवसांत नष्ट होतात.

- डॉ. स्वाती उमप, ८१४९७७१९१७

(नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय, नागपूर)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com