Dairy Business : कष्टातून मिळवली ‘दूधवाले सावंत’ अशी प्रतिष्ठा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कासरल बादेवाडी (ता. कणकवली) येथील दीपक सावंत यांनी प्रचंड मेहनत, संघर्ष, व्यवसायाप्रती निष्ठा, प्रामाणिकपणा व कुटुंबाची साथ याद्वारे दुग्ध व्यवसायात (Dairy Busness) ओळख निर्माण केली. कणकवली परिसरात थेट ग्राहक तयार केले. याच व्यवसायातून आर्थिक स्थैर्य मिळवले, घर बांधले, मुलांना चांगले शिक्षण दिले. दूधवाले सावंत अशी प्रतिष्ठा मिळवण्याचे समाधानही त्यांनी मिळवले आहे.
Dairy Business
Dairy BusinessAgrowon

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावरील वागदे येथून सुमारे साडेतीन किलोमीटरवर कासरल गाव आहे. येथून कणकवली शहर सहा किलोमीटरवर आहे. भात (Paddy), नाचणी (Ragi), आंबा (Mango), काजू (Cashew) अशी पिके गावात दिसतात.

सावंत यांचे संघर्षमय जीवन

गावातील बादेवाडी येथे दीपक अर्जुन सावंत यांचे घर आहे. घरची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक होती. वडिलांच्या पदरात अवघी आठ गुंठे शेतजमीन आली. खरिपात ते भात घेत. इतरांची पडीक जमीनही कसायला घेत. आर्थिक परिस्थितीमुळे दीपक यांना शिक्षण घेता आले नाही. लहानपणापासून ते शेती करायचे. वयाच्या बाराव्या वर्षी वडिलांचे निधन झाले. कुटुंबावर मोठा आघात झाला.

जबर मानसिक धक्क्यातून आई सावरू शकली नाही. तिला मानसिक आजार जडला. खेळण्या-बागडण्यांच्या वयात कुटुंबाची जबाबदारी दीपक यांच्यावर आली. पावसाळ्यात काही प्रमाणात शेती आणि उर्वरित वेळेत मोलमजुरी ते करू लागले. काही काळ गेला. प्रचंड मेहनत घेऊनही कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळत नव्हते. पण दीपक अनुकरणप्रिय होते. कुठेही मोलमजुरीसाठी गेले तरी नवे काही शिकण्याचा प्रयत्न करायचे. त्यातून ‘सेंट्रिंग’चे कामही ते शिकले.

Dairy Business
Dairy Business : उत्तम, काटेकोर व्यवस्थापनातून दुग्धव्यवसाय केला किफायतशीर

दुग्ध व्यवसायाने दाखवला मार्ग

दीपक यांचे प्रचंड कष्ट व धडपड पाहून एका शेतकऱ्याने त्यांना दोन रेडकू दिले. मनापासून पालनपोषण करताना चार वर्षांत त्यांची चांगली वाढ झाली. नांगरणीसाठी आणि दुधासाठी असा दुहेरी वापर शेतीसाठी सुरू झाला. गावात दुधाला तितकी मागणी नव्हती. मग पहाटे लवकर उठून धारा काढायच्या आणि सहा किलोमीटरचा प्रवास पायी करून दूध कणकवली शहरात न्यायचे असा दिनक्रम सुरू झाला. थेट आणि दर्जेदार दूध ग्राहकांना मिळू लागल्यामुळे मागणी वाढू लागली. एखादा ग्राहक गायीचे दूध मिळेल का, असेही विचारायचा. मग गायही खरेदी केली. आता गोठ्यात जनावरांची संख्या तीनवर पोहोचली. दुधाचे प्रमाणही वाढले.

घरची लक्ष्मी

पाच- सहा वर्षे केलेल्या कष्टाचे फळ मिळू लागले. दुग्ध व्यवसायातून आर्थिक स्थैर्य मिळू शकते असा आत्मविश्‍वास आला. दीपक गायीला घरची लक्ष्मी असे संबोधत. कुटुंबात आनंदी वातावरण होते. पण अचानक गाय आजारी पडली. पशुवैद्यकीय अधिकारी सांगतील ते सर्व उपचार केले. मात्र तिचा मृत्यू झाला. घरची लक्ष्मी गेल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला. आर्थिक घडी बसलेले कुटुंब या प्रसंगाने विस्कटले. गोठ्यात जायची इच्छा होईना. अशावेळी मित्रांनी दोन गायी देत मदतीचा हात दिला. पण लक्ष्मीची आठवण हे कुटुंब कधीच विसरू शकले नाही. घरात तिचे छायाचित्र लावले असून, त्यावर घरची लक्ष्मी असे लिहिले आहे.

Dairy Business
Milk Dairy : जिल्हा दूध संघाच्या दूध संकलनात वाढ

तयार केली ओळख

अनेक आव्हानात्मक प्रसंगांशी सामना करीत दीपक यांनी आज दुग्ध व्यवसायात स्थिरता व ‘दूधवाले सावंत’ अशी ओळख तयार केली आहे. सुरुवातीपासूनच थेट विक्रीवरच भर दिला. सावंत कुटुंबीयांचा रोजचा दिवस पहाटे पाचलाच सुरू होतो. कुणी गोठ्याची साफसफाई, कुणी खाद्याची सोय, कुणी दूध काढणी, तर कुणी पॅकिंग करणे अशा कामांत व्यस्त होऊन जातं. शेतीत देखील हे कुटुंब राबते.

बांधले पक्के घर

एकेकाळी सहा किलोमीटरचा प्रवास पायी करून करून दूधविक्री करणाऱ्या दीपक यांनी पुढे सायकल घेत त्यावरून पाच- सहा वर्षे दूध घालण्याचे काम केले. आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर दुचाकी घेत त्यावरून ते दूधविक्री करतात. पूर्वीचे घर जुन्या पद्धतीचे होते. त्याची स्थिती अतिशय बिकट होती. आता पक्के घर बांधले आहे. दुग्ध व्यवसायात स्थिर होताना शेळीपालनही सुरू केले आहे. एका शेळीपासून दहा ते बारा शेळ्यांपर्यंत व्यवसाय वाढवला आहे.

दुग्ध व्यवसायातील ठळक बाबी

-तीस वर्षांचा तयार झाला अनुभव.

-आजमितीला सात गायी, तीन म्हशी.

-प्रतिदिन सुमारे ४० लिटर दूध संकलन. पॅकिंग व सुट्या पद्धतीनेही विक्री. (मुख्यतः कणकवली शहर आणि गावात.) गायीच्या दुधाला ५० रुपये, तर म्हशीच्या दुधाला प्रति लिटर ६० रुपये दर.

-वर्षाला काही लाखांची उलाढाल.

-सुरुवातीला एक गाय खरेदी करण्यासाठी बॅंकेकडून १० हजार रुपये कर्ज घेतले. पहिल्या कर्जाची परतफेड केल्यानंतरच दुसरे कर्ज अशी नियमित परतफेड करीत गेल्याने बँकेत चांगली पत निर्माण झाली. लिहिता वाचता येत नसले, तरी कर्ज घेण्यापूर्वी त्यावरील व्याज, परतफेडीसाठी लागणारा अवधी याची सर्व माहिती ते घेतात.

-पत्नी दीपिका, मुली सोनाली, दर्शना, दीपिका आणि मुलगा अर्जुन यांची मदत. याच व्यवसायामुळे मुलांना चांगले शिक्षण देता आले. एक मुलगी पदवीधर झाली आहे. दुसरी पदवीचे शिक्षण घेत आहे. एक बारावीत तर मुलगा अकरावीत आहे.

दीपक सावंत, ९४०३३९२७९४

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com