शेळी, मेंढीमधील आंत्रविषार

आंत्रविषार आजार क्लोस्ट्रिडियम परफ्रिन्जेन्स जिवाणूमुळे होतो. हा आजार सर्व वयोगटातील मेंढ्या आणि शेळ्यांना होऊ शकतो.शेळ्या-मेंढ्याचे पावसाळ्यापूर्वी आंत्रविषार नियंत्रणासाठी लसीकरण करून घ्यावे. तीन महिन्यांवरील कोकरे आणि करडांना लस द्यावी.
Animal Care
Animal CareAgrowon

डॉ. उमा तुमलाम, डॉ. मृणालिनी बुधे

-------------------------

पावसाळ्यामध्ये सगळीकडे हिरवेगार लुसलुशीत कोवळे, गवत दिसायला लागते. हे गवत जर जास्त प्रमाणात शेळी, मेंढीने खाले तर त्यांना आंत्रविषार आजाराची शक्यता असते. मेंढ्या आणि शेळ्यांचे संगोपन, व्यवस्थापन पद्धतीमध्ये काही महत्त्वाचे फरक आहेत.

१) आंत्रविषार आजार क्लोस्ट्रिडियम परफ्रिन्जेन्स (प्रकार डी) जिवाणूमुळे होतो.

२) हा आजार सर्व वयोगटातील मेंढ्या आणि शेळ्यांना (एका आठवड्यापासून ते मोठ्या वयापर्यंत) होऊ शकतो.

३) शेळी, मेंढीला चाऱ्याला सोडले असताना किंवा उच्च दर्जाचे गवत किंवा धान्य जास्त प्रमाणात खाद्यामध्ये आले तर हा आजार होतो.

४) या आजारामध्ये साधारणतः मृत्यूचे प्रमाण १० ते ४० टक्क्यांपर्यंत आढळते.

५) आंत्रविषार हा एक अतिशय महत्त्वाचा आजार आहे. काही भागांत तो शेळ्यांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात दिसतो. या आजाराचे कारण म्हणजे क्लॉस्ट्रिडियम परफ्रिन्जेन्स टाइप सी किंवा टाइप डी या जिवाणूद्वारे तयार केलेल्या विषांद्वारे होतो.

६) बहुतेक प्राण्यांच्या आतड्यात क्लॉस्ट्रिडियम परफ्रिन्जेन्स हा जिवाणू कमी प्रमाणात असतो. मोठ्या प्रमाणात आणि उच्च दर्जाच्या आहारामुळे उद्‍भवलेल्या परिस्थितीत, जिवाणू वेगाने वाढून एक शक्तिशाली विष तयार करतात. हे विष आतड्याच्या आतून शोषले जातात आणि काही तासांत शेळ्या आणि मेंढ्यांचा मृत्यू होतो.

जनावरांना आंत्रविषार होण्याची कारणे ः

१. जनावरांच्या आहारामध्ये अचानक बदल होणे.

२. खूप जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट देणे.

३. स्टार्च आणि शर्करा नसलेला आहार देणे.

४. अनियमित आहार देणे.

५. आहाराचे प्रमाण खूप वेगाने वाढवणे.

६. प्राण्यामध्ये परजीवी प्रमाण असणे.

७. आतड्यात मोठ्या प्रमाणात न पचलेले किंवा अंशतः पचलेले अन्नामुळे आतड्यांमध्ये विष तयार होते.

८. नैसर्गिक रोग प्रतिकारशक्तीचा अभाव असणे.

आजाराची लक्षणे :

१) कोकरू आणि करडामध्ये आंत्रविषार आजाराची बाधा होण्याचे प्रमाण जास्त असते. या आजाराची लक्षणे शेतकऱ्यांच्या लक्षात येईपर्यंत बाधित जनावरांचा मृत्यू होतो.

२) आंत्रविषारामुळे होणारे मृत्यू सहसा अचानक होतात. प्रादुर्भाव झाल्यापासून १२ तासांत करडांचा मृत्यू होतो. काही जनावरांमध्ये मरण्यापूर्वी कित्येक तास किंवा एक दिवस किंवा त्याहून अधिक काळ आजारी लक्षणे दिसतात.

३) कोकरू सुस्तपणे एका ठिकाणी बसून राहतात. कोकरांमध्ये हातपाय ताठ होणे, आक्षेपार्ह हालचाली, मेंदूशी संबंधित लक्षणे, अतिसार, करडे दूध पिणे बंद करतात.

४) करडांनी हिरव्या रंगाची पातळ हगवण होते. तोंडाजवळ फेस येतो. बाधित करडे हवेत उड्या मारून जमिनीवर पडतात. अशी लक्षणे विशेषतः शेळ्यांमध्ये दिसतात.

५) वर वर्णन केलेली लक्षणे आंत्रविषाराशी सूचक असली, तरी ती इतर आजारांमध्ये देखील दिसू शकतात ज्यामुळे अचानक मृत्यू होतो, जसे की अक्युटेसिडोसिस किंवा ग्रेन फाउंडर, पोलिओ एन्सेफॅलोमॅलेशिया, लिस्टिरिओसिस, तीव्र पेस्ट्युरेलोसिस, टिटॅनस

आणि ब्लॅकलेग. अशा मृत्यूची कारणे त्वरित आणि योग्यरीत्या निदान करणे महत्त्वाचे आहे.

आजाराचे निदान ः

१) जेव्हा क्लोस्ट्रिडियम परफ्रिन्जेन्स (प्रकार डी) लसीकरण न केलेल्या जनावरांमध्ये अचानक मृत्यू होतो तेव्हा आंत्र विषाराचे निदान केले जाते. जनावरांचे शवविच्छेदन चाचणी देखील आजार कळण्यास मदत करू शकते.

२) जर मृत्यूनंतर तत्काळ किंवा त्वरित शवविच्छेदन केले गेले, तर काही बदल लक्षात येऊ शकतात, विशेषत: जनावरांचा अचानक मृत्यू झाल्यास तेव्हा त्यात सामान्यतः फुफ्फुसातील रक्तसंचय आणि द्रवपदार्थ आणि जिलेटिनस सामग्रीच्या (फायब्रिन) गुठळ्या असलेल्या हृदयाच्या थैलीमध्ये (पेरीकार्डियल सॅक) द्रव पदार्थात वाढ झालेली असते. हृदयाच्या बाहेरील आणि आतील स्नायूंच्या भिंतींवर रेषा असलेल्या स्पष्ट पडद्याच्या खाली लहान रक्तस्राव आणि रक्त स्प्लॅश दिसून येतो. मूत्रपिंडाच्या उती द्रवाने भरतात. वेगाने खराब होऊ शकतात.

उपचार:

१) आंत्रविषार आजार अल्पमुदतीचा असल्याने यावर कोणताही प्रभावी उपचार नाही.

२) बाधित जनावराला पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार प्रतिजैविके द्यावीत. शेळ्या-मेंढ्याचे पावसाळ्यापूर्वी आंत्रविषार नियंत्रणासाठी लसीकरण करून घ्यावे. तीन महिन्यांवरील कोकरे आणि करडांना लस द्यावी. त्यानंतर तीन आठवड्यांनी बूस्टर डोस द्यावा.

३) प्रौढ शेळ्या-मेंढ्याचे नियमितपणे वर्षातून दोन वेळा लसीकरण करावे.

---------------

संपर्क ः

डॉ. उमा तुमलाम, ९४२२१७७६७२

डॉ. मृणालिनी बुधे, ९९२२६१५२५८

(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय विज्ञान महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com