Poultry Shed : पर्यावरण नियंत्रित पोल्ट्री शेड

Poultry Farm : यशस्वी पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी काळजीपूर्वक नियोजन, ठोस व्यवसाय धोरण आणि उद्योगाची संपूर्ण माहिती आवश्यक आहे. यासोबतच व्यवसायाची निरंतर वाढ होण्यासाठी उद्योगाचा कल आणि नवीन यांत्रिक प्रगती याबद्दल सातत्याने माहिती घेऊन त्याचा अवलंब आपल्या व्यवसायामध्ये करावा.
Poultry Farming
Poultry FarmingAgrowon

आर. सी. कुलकर्णी, कुलदीप देशपांडे, वैभव परगे

Poultry Farming : अनेकदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका पोल्ट्री व्यावसायिकांना सुद्धा बसत आहे. कधी वातावरणानुसार कोंबड्यांची वाढ होत नाही तर कधी रोगाचा प्रादुर्भाव होऊन कोंबड्या दगावतात. कोंबडीला योग्य वाढीकरिता २०-२६ अंश सेल्सिअस इतके तापमान आवश्यक असते.

परंतु वातावरण बदलामुळे तापमान ३५ अंश सेल्सिअस पेक्षाही अधिक होते तर विदर्भ-मराठवाड्यात ४५ ते ४७ अंश सेल्सिअस तापमान उन्हाळ्यात नोंदवले जाते. यावर उपाय म्हणजे अत्याधुनिक व वातानुकूलित तंत्रज्ञानाने सुसज्ज असा पोल्ट्री फार्म. यालाच ‘ईसी शेड' असे म्हणतात. ज्यामध्ये कोंबड्यांच्या चांगल्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती राखली जाते.

जागेचे नियोजन आणि बांधकाम

- पोल्ट्री शेडचे बांधकाम पूर्वेकडून पश्चिमेकडे केले जाते. पूर्वेकडून कुलिंग पॅड, पश्‍चिमेकडून मोठे एक्झॉस्ट पंखे लावले जातात. अशा शेडमध्ये स्वयंचलित खाद्य आणि पाण्याची व्यवस्था करावी लागते.

- साधारणतः ईसी शेडमध्ये एका कोंबडीसाठी ०.७० चौरस फूट एवढी जागा लागते. त्यानुसार जागेचे नियोजन करावे लागते. १०,००० कोंबड्यांसाठी ७,००० चौरस फूट एवढी जागा लागते.

थंडीमध्ये कोंबड्यांचे नियोजन

- कोंबडीच्या योग्य वाढीसाठी योग्य तापमान राखणे हे फायदेशीर व्यवसायाची गुरुकिल्ली आहे. कोंबडीला शरीर तापमान नियंत्रण क्षमता गाठण्यासाठी साधारणपणे १४ दिवसांचा कालावधी लागतो. या काळात शेडमधील तापमान ही स्थिर राहील याची काळजी घेणे गरजेचे असते.

- थंडीच्या काळात पोल्ट्री शेड गरम करण्यासाठी नैसर्गिक वायू , रेडियंट हीटर्स, पॅनकेक हीटर्स व ट्यूब हीटर्स अशा विविध प्रकारच्या हीटर्सचा वापर केला जातो.

Poultry Farming
Poultry Business : नोकरीत मन रमले नाही म्हणून सांगलीच्या युवतीने सुरु केला पोल्ट्री व्यवसाय

वायुविजन

- वायुविजन यंत्रणा ही ताजी हवा शेडमध्ये वितरित करण्यासाठी काम करते. सर्व पोल्ट्री शेडमध्ये अतिरिक्त उष्णता, अमोनिया, कार्बन डायऑक्साइड, इतर वायू आणि धूळ बाहेर टाकण्यासाठी; त्याचबरोबर ऑक्सिजनचा पुरवठा सुनिश्‍चित करण्यासाठी वायुविजन आवश्यक आहे. यामध्ये एक्झॉस्ट पंखे व कूलिंग पॅड, कंट्रोलर काम करतात.

- जेव्हा तापमान हे २९.४ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होते तेव्हा कोंबड्यांना आरामदायी वातावरण देण्यासाठी कूलिंग प्रणाली आवश्यक असते.

खाद्य आणि पाणी नियोजन

- खाद्य पुरवण्यासाठी स्वयंचलित प्रणाली असते. यामुळे खाद्य हे समान प्रमाणात सर्व कोंबड्यांना उपलब्ध केले जाते. यामुळे खाद्याची नासाडी देखील होत नाही. यासाठी कंट्रोलरमध्ये फीड मॉनिटरिंग सिस्टीम असते.

- ईसी शेडमध्ये साधारणपणे दिवसातून ७ ते ८ वेळा खाद्य द्यावे लागते. पाण्यासाठी निप्पल सिस्टीमचा वापर केला जातो. यामुळे पाणी सांडत नाही, शेड कोरडे राहते. माश्‍यांचा प्रादुर्भाव कमी होतो.

कंट्रोलर

- ईसी शेड चे व्यवस्थापन हे इलेक्ट्रिक कंट्रोलरवर अवलंबून असते. कंट्रोलरच्या मदतीने आपण बाहेरील तापमानाच्या विपरीत शेडमधील तापमान योग्य त्या अंशावर ठेवू शकतो. यामुळे कोंबड्यांना आरामदायी ठेवणे शक्य होते. यामुळे शरीर उबदार किंवा थंड राखण्यासाठी त्यांची ऊर्जा खर्च होत नाही.

- कंट्रोलर हा शेडमधील वातावरणाचे निरीक्षण करतो. आवश्यकतेनुसार शेड गरम किंवा थंड करण्यासाठी यंत्रणा चालू करतो.

- शेडच्या तापमानात चढ उतार होत असताना, कंट्रोलर आवश्यकतेनुसार हीटर किंवा पंखे चालू करतो. कंट्रोलर शेडमधील हीटर, पंखे, दिवे, कूलिंग सिस्टीम यासह उपकरणे चालवतो. या प्रणालीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जातो.

अलार्म आणि जनरेटर

कोंबड्यांना आरामदायक व तणावमुक्त वातावरण देणे गरजेचे असते. परंतु हे सर्व पूर्णपणे शेडमधील वीज आणि घरामधील उपकरणांचा योग्य कामावर अवलंबून असते. पक्षी पूर्णवेळ घरामध्ये असतात, यामुळे शेडमध्ये काही चूक झाल्यास ती फार्म व्यवस्थापकाला कळण्यासाठी अलार्म सिस्टीम गरजेची आहे.

- वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा तापमान योग्य तापमानापेक्षा खूप जास्त किंवा खूप कमी झाल्यास सूचित करण्यासाठी अलार्मचा वापर होतो. वीजपुरवठा खंडित झाल्यास आपत्कालीन जनरेटरचा वापर नुकसान टाळण्यासाठी, वायुविजन, खाद्य व पाणी व्यवस्था सुरळीत चालू ठेवण्यासाठी केला जातो. अशा जनरेटर मध्ये स्वयंचलित पावर स्वीच ओव्हरची क्षमता असणे आवश्यक असते.

पर्यावरण नियंत्रक शेडमुळे अलीकडच्या काळात पोल्ट्री उद्योगात खूप मोठी क्रांती केली आहे. यामुळे कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचा मोठा अडथळा दूर झाला आहे. यशस्वी पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी काळजीपूर्वक नियोजन, ठोस व्यवसाय धोरण आणि उद्योगाची संपूर्ण माहिती आवश्यक आहे.

व्यवसायाची निरंतर वाढ होण्यासाठी उद्योगाचा कल आणि नवीन यांत्रिक प्रगती याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. जरी या शेडमध्ये वाढीचा दर चांगला असला तरी हे तंत्रज्ञान फक्त मोठ्या पोल्ट्रीहाउसमध्येच वापरले जाऊ शकते, कारण त्यासाठी लागणारी मोठी गुंतवणूक. योग्य मानसिकता, योग्य व्यवसाय नियोजन आणि योग्य दृष्टिकोन असल्यास कुक्कुटपालन हा तुमच्यासाठी एक फायद्याचा आणि यशस्वी व्यवसाय ठरू शकतो.

ईसी शेडचे फायदे

१) या शेडमध्ये तापमानाचे योग्य नियमन केल्यामुळे, पारंपरिक पद्धती पेक्षा कोंबड्यांचा मृत्युदर कमी असतो (२ ते ३ टक्के).

२) प्रति कोंबडी कमी जागा लागते. त्यामुळे पारंपरिक पद्धती पेक्षा जास्त कोंबड्यांची क्षमता या शेडची असते.

३) खाद्य व पाणी यांचा स्वयंचलित यंत्रणेमुळे कमी शारीरिक श्रमाची आवश्यकता लागते. यामुळे १०,००० कोंबड्यांसाठी एक कामगार पुरेसा असतो. मजुरीवरील खर्चात बचत होते.

४) पंख्यामुळे कोंबड्यांना नेहमी ताजी हवा मिळते. अमोनिया बाहेर फेकला जातो.

५) खाद्य रूपांतरण गुणोत्तरात (FCR) सुधारणा होते. सोप्या भाषेत सांगायचे तर पारंपरिक फार्मच्या तुलनेत एक किलो ब्रॉयलर मीट तयार करण्यासाठी कमी खाद्य लागते.

६) इलेक्ट्रिक कंट्रोलर आणि ऑटोमेशन वापरामुळे मानवी चुका कमी होतात.

Poultry Farming
Broiler Poultry Business : सातत्य, चिकाटीतून ब्रॉयलर पोल्ट्री व्यवसाय केला यशस्वी

७) उन्हाळ्यात होणारी कोंबड्यांची मरतूक, विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव याचे धोके कमी होतात.

८) कोंबड्यांची वाढ होण्याचा कालावधी हा सुमारे ८ ते १० दिवसांनी कमी होतो. ४२ ते ४५ व्या दिवशी मिळणारे वजन ३५ व्या दिवशी मिळते.

९) कोंबड्यांना विविध प्रकारच्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका कमी होतो. यामुळे औषधांवरचा खर्चसुद्धा कमी होतो.

१०) वातानुकूलित शेडमुळे उग्र वासाच्या त्रासापासून परिसरात सर्वांना सुटका मिळते.

११) पारंपरिक पद्धतीच्या शेडमध्ये उन्हाळ्याच्या चार महिन्यांमध्ये तीव्र उष्णतेमुळे उत्पादन थांबवले जाते. त्यामुळे वर्षभरात ते ५ ते ६ बॅचेस करणे शक्य होते. परंतु ईसी शेडमध्ये कोंबडीच्या ८ बॅचेस आपण विनाथांबा नियोजन करू शकतो.

१२) ईसी शेडचा योग्य नियोजन करून वापर केल्यास शेड बांधणीचा खर्च ४ ते ५ वर्षांत निघून येतो.

१३) शेतकऱ्याकडे ईसी शेड असल्यास काही कंपन्या करार तत्त्वावर कुक्कुटपालन करण्यास देखील तयार असतात.

ईसी शेडचे तोटे

१) पारंपरिक पोल्ट्री फार्मच्या तुलनेत सुरवातीलाच अत्याधिक गुंतवणूक करावी लागते.

२) २४ × ७ तास वीजपुरवठा आवश्यक असतो.

३) १०,००० कोंबड्यांच्या क्षमतेपेक्षा लहान शेड बांधणे आर्थिकदृष्ट्या नुकसानीचे ठरते.

संपर्क - डॉ. कुलदीप देशपांडे, ८००७८६०६७२, (सहायक प्राध्यापक तथा विभाग प्रमुख, पशू पोषण विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

डॉ. आर. सी. कुलकर्णी, ७७७६८७१८००, (सहायक प्राध्यापक, कुक्कुटपालन शास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com