Animal Care : पर्व शाश्‍वत गोसंवर्धनाचे...

आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात नवनवीन वैज्ञानिक पद्धतीने गोवंश संवर्धन केले पाहिजे. यासाठी गोप्रेमी, गोपालक, गोशाळा, प्रगतिशील पशुपालक आणि व्यावसायिकांनी पुढाकार घेणे आवश्यक झाले आहे.
Animal Care
Animal CareAgrowon

डॉ. प्रवीण बनकर, डॉ. स्नेहल पाटील

शेतकरी बांधवांचा सखा बैलांच्या प्रति आदरभाव व्यक्त करण्यासाठी जसा श्रावण महिन्यात (Shrawan Month) पोळा साजरा केला जातो, तसाच गायीचे पावित्र्य आणि महत्त्व उत्सवपूर्वक व्यक्त करण्यासाठी गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारस (Vasubaras) हा उत्सव साजरा करण्यात येतो. भारतीय संस्कृतीमध्ये (Indian Culture) दुभती गाय हे ऐश्‍वर्य आणि मंगलकारी असल्याचे नमूद आहे. भारतीय परंपरेमध्ये (Indian Tradition) गोस्थ (गोठा), गोपाल (गायी राखणारा), धेनू (दूध देणारी सवत्स गाय) अशा अनेक शब्दांचा वापर आपल्याला दिसतो. गाईपासून मिळणारे दूध, लोणी, तूप, ताक, दही यांना गोरस म्हणतात. याचा वापर आरोग्यरक्षण, शक्तिसंवर्धन, रोगनिवारण इत्यादींसाठी केला जात असल्याचे चरक, सुश्रुत आदी महर्षींनी नमूद केले आहे.

गोमय (शेणखत), गोमूत्र आदी जमिनीच्या सुपीकतेसाठी किती महत्त्वपूर्ण आहे हे आजच्या काळात देखील सिद्ध होत आहे. भारतीय अर्थकारणामध्ये प्राचीन काळापासून गोधनाची दूध आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, पंचगव्य, शेणखत इत्यादी माध्यमातून महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. म्हणूनच प्राचीन काळी एखाद्याची संपन्नता किंवा श्रीमंती त्यांच्यापदरी असलेल्या गोधनावरून ठरत असे. पाच लाख गोधन असणाऱ्यास ‘उपनंद’, नऊ लाख (नंद), दहा लाख (वृषभानू), पन्नास लाख (वृषभानुवर) आणि एक कोटी गोधन सांभाळणारा नंदराजा असा उल्लेख आहे. आज ही आकडेवारी अतिशयोक्ती वाटत असली तरी भारतीय गोधनाच्या मुबलक संख्येबाबत दुमत नाही, कारण आजदेखील जगाच्या पाठीवर भारत हा सर्वाधिक गोधन असणारा प्रथम क्रमांकाचा देश आहे.

Animal Care
Indian Agriculture : सामान्य शेतकऱ्यांनी गुंफली यशमाला

साधारणतः सहा दशकांपूर्वी झालेली श्‍वेतक्रांती म्हणजेच विक्रमी दूध उत्पादनात भारताने स्वातंत्र्योत्तर काळात मारलेली मजल नक्कीच कौतुकास्पद ठरते. परंतु संकरीकरणास शास्त्रीय बाजूने नीटसे समजून न घेतल्याने गल्लत झाली. गोठ्यातील देशी वंशाच्या गोधनाची अंगभूत रोगप्रतिकारक्षमता, किमान परिस्थितीत कमाल व माफक उत्पादनक्षमता, पर्यावरण अनुकूलता अशा महत्त्वपूर्ण बाबींचा सोईस्कर विसर पडला.

Animal Care
Weed Management : फळ बागायतदारांचे तण व्यवस्थापनातील अनुभव

आपल्या भागातील पशुधनाचे उत्पादक आणि वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म माहिती नसल्याने किंवा न उलगडल्याने पुढील पिढीस हा वारसा सुपूर्द करताना आपले बहुमोल गोधन ‘गावरान किंवा गावठी‘ म्हणून दुर्लक्ष झाले. तथापि, आताच्या सुजाण पिढीने आपल्या देशी गोवंशाचे माहात्म्य जबाबदारीपूर्वक समजून घेतल्यास पुढील पिढ्यांना विविध अनाकलनीय समस्यांना सामोरे जात असताना प्राचीन समृद्ध गोवंश उलगडून देणे आवश्यक ठरते.

देशी गोवंशाची शास्त्रीय नोंदणी ः

कर्नाल येथील राष्ट्रीय पशू आनुवंशिकी संसाधन ब्युरो या शिखर संस्थेकडून देशभरातील विविध पशुधनाच्या जातींची नोंद केली जाते. देशातील नोंदणीकृत गोवंशांची संख्या ५३ झाली असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील सात गोवंश आहेत.

१) मराठवाड्यात डोंगरपट्टी, डोंगरी, अशा नावाने लोकप्रिय असलेल्या देवणी गायी रंगाने पांढऱ्या असून, काळ्या रंगांच्या ठिपक्यांवरून वान्नेरा, बालंक्या आणि शेवरा या उपजाती आढळतात.

२) कानडा, कोकणी, घाटी या नावाने परिचित डांगी गोवंश नाशिक, नगर जिल्ह्यांत दिसतो.

३) आर्वी, गौळणी नावाने विदर्भातील गवळाऊ गोवंश ओळखला जातो.

४) लाखलबुंदा नावाने स्थानिक भागात परिचित असलेली लाल कंधारी लातूर, हिंगोली, परभणी, बीड या भागांतही आढळते.

५) खिल्लार, माणदेशी नावाने सुपरिचित खिलार गोवंश चपळ व

उत्तम भारवाहू म्हणून प्रसिद्ध आहे.

६) समुद्र किनाऱ्यालगतच्या दमट हवामानात अनुकूल असलेला कोकण कपिला गोवंश ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यात दिसतो.

७) पांढऱ्या तांबूस काळसर रंगाच्या कठानी गोवंश हा चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात आहे.

८) गुजरातमधील गीर, मध्य प्रदेशातील निमारी व माळवी, कर्नाटकातील कृष्णाखोरी सारखे गोवंश महाराष्ट्रात दिसतात.

९) दुधाळ जाती म्हणून राष्ट्रीय मान्यता असलेल्या गीर (गुजरात), साहिवाल व लाल सिंधी (पंजाब) आणि थारपारकर (राजस्थान) सारख्या गोवंशाचे व्यावसायिक आणि हौशी गोपालकांद्वारे संवर्धन केले जाते.

१०) अनेक जातिवंत उमदे गोधन केवळ पुरेसे लक्ष न दिले गेल्याने अस्तित्वाच्या उंबरठ्यावर उभे आहे. उत्तर महाराष्ट्रातील सोनखेडी गोवंश असो किंवा विदर्भातील उमरडा, खामगावी नावाने लोकपरिचित असलेला स्थानिक गोधन आता शास्त्रशुद्ध ओळख आणि अभ्यासाच्या वाटेवर आहे.

शुद्ध गोवंश महत्त्वाचा...

१) शुद्ध वंश हा जातिवंत मादी आणि वळू यांच्या संकरातून निपजला जातो. कळपात एक उत्तम वळू अनेक माद्यांच्या रेतनासाठी पुरेसा आहे. कृत्रिम रेतनाद्वारे एक वळू अनेक पिलांचा पिता ठरू शकतो. पशुपालकांनी वळूच्या प्रजनन गुणधर्माचा लेखाजोखा त्याच्या वीर्यपरीक्षण माध्यमातून करावा. ज्या वळूची निवड करायची आहे त्याच्या विर्यात असलेली शुक्राणू संख्या आणि त्यातही जीवित शुक्राणू संख्या अधिक महत्त्वपूर्ण आहे.

२) वळू ब्रुसेल्लोसिस, प्रोतियोतीस, विब्रुओसिस सारख्या जिवाणूजन्य आजारांपासून मुक्त असावा.

३) नैसर्गिक पद्धतीने गाईंच्या रेतनासाठी वळूचा वापर करताना येणाऱ्या अडचणी (उदा. आंतरपैदास धोके, वीर्यातून संक्रमित होणारे आजार, वळूची उपलब्धता) लक्षात घेता कृत्रिम रेतन तंत्रज्ञान अनेक अंगांनी फायदेशीर आहे.

४) रंगसूत्र आराखडा (क्यारिओटायपिंग, रंगसूत्रातील दोष (संख्या किंवा आकार) तपासणे) ही महत्त्वपूर्ण पशुवैद्यकीय चाचणी आहे.

५) जातिवंत गाईंची बीजांडे, वळूचे शुक्राणू अतिशीत तापमानामध्ये (-१९६ अंश तापमान) जतन केल्यास दीर्घ काळापर्यंत वापरता येतात.

६) अल्ट्रासोनोग्राफी ः हाय फ्रिक्वेंसी ध्वनिलहरीचा वापर करून गाभण गायींची तपासणी केली जाते. त्यायोगे गाभण गायींची प्रजनन अवस्था, गर्भाची वाढ किंवा दोष आदी बाबी तपासल्या जातात.

७) भ्रूण प्रत्यारोपण ः उच्च आनुवंशिकता असलेल्या गाईंपासून फलन झालेले भ्रूण दुसऱ्या निरोगी गायींमध्ये प्रत्यारोपित करण्याचे तंत्र प्रजनन क्षमता वाढविण्यासाठी उपयुक्त ठरते. भाकड किंवा गावठी गायींचा वापर प्रत्यार्पित भ्रूणाच्या वाढीसाठी केला जात असल्याने आनुवंशिक सुधारणा होण्यासाठी महत्त्वाचे ठरते.

८) लिंगनिश्‍चित रेतमात्रा ः संकलित वीर्याद्वारे नर किंवा मादी असे एका विशिष्ट लिंगाचे शुक्राणू वापरून कृत्रिम पद्धतीने रेतन करून कालवडी मिळविण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरले जाते.

गो पैदासकार संघटनांना गती द्या...

लोकसहभागातून झालेल्या पशुधन संवर्धक संघटनेस ‘ब्रीड सोसायटी‘ या नावाने ओळखतो. भारतात विविध जातींच्या अशा संघटना पूर्वीपासून कार्यरत आहेत. स्वातंत्रोत्तर काळात आंध्रप्रदेशामध्ये ओंगोल गोपैदासकार संघटना सर्वप्रथम स्थापित झाली. याच धर्तीवर अमृतमहल (कर्नाटक), गीर (गुजरात), देवणी, गवळावू (महाराष्ट्र) अशा काही पैदासकार संघटना कार्यरत आहेत. याशिवाय अनेक लहानमोठ्या संघटना नजीकच्या काळात स्थापन झाल्या आहेत.

याचप्रमाणे काही राज्यांत बिगर शासकीय संघटनादेखील पशुधन सोसायटी म्हणून पशू संवर्धनाचे महत्त्वपूर्ण काम करतात. उदाहरणार्थ, गुजरातमधील सहजीवन संघटना किंवा तमिळनाडूमधील सेवा संघटना. रात्रीच्या वेळी चराई करणाऱ्या गुजरातमधील प्रसिद्ध बंनी जातीची ओळख बंनी म्हैसपालक संघटनेच्या माध्यमातून झालेली आहे. केरळमध्ये वेचूर गोवंशाच्या संवर्धनासाठी वेचूर संवर्धन ट्रस्ट, केरळ स्थानिक गोपैदासकार संघटना, कासारगोड ड्वार्फ कॉन्झर्वेशन सोसायटी आणि वाडकरा गोसंवर्धन ट्रस्ट अशा काही संघटना कार्यरत आहेत.

संपर्क ः डॉ. प्रवीण बनकर, ९९६०९८६४२९

(सहायक प्राध्यापक, पशुआनुवांशिकी व पैदास शास्त्र विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com