Khilar Cow : खिलार संगोपनातून कुटुंबाला आधार

काळोशी (ता.जि. सातारा) येथील ज्योती शंकर निकम यांनी शेतीच्या बरोबरीने खिलार गाईंच्या संगोपनाला प्राधान्य दिले आहे. गाईंपासून मिळणारे दूध तसेच पंचगव्यापासून त्यांनी विविध उत्पादने तयार केली आहेत. यासाठी महिला बचत गटाची त्यांना चांगली साथ मिळाली आहे. दूध,तूप आणि विविध उत्पादनांच्या विक्रीतून त्यांनी कुटुंबासाठी आर्थिक स्रोत तयार केला आहे.
Khilar Cow
Khilar CowAgrowon

काळोशी हे सातारा शहरापासून जवळच असलेले १५०० लोकसंख्येचे गाव. शिवारात पाण्याची पुरेशी सुविधा नसल्याने गावशिवारातील ९० टक्के क्षेत्र कोरडवाहू (Rain fed Agriculture) आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाहाच्या दृष्टीने शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गाई (Cow Rearing), म्हशी संगोपन, शेळीपालन (Goat Farming) तसेच कुक्कुटपालनाकडे (Poultry) बहुतेक कुटुंबाचा कल आहे.

आठ वर्षांपूर्वी या गावातील १७ महिलांनी एकत्र येत झाशीची राणी महिला बचत गटाची सुरवात केली. या गटामध्ये ज्योती शंकर निकम या सचिव म्हणून जबाबदारी सांभाळतात. निकम कुटुंबाची तीन एकर कोरडवाहू शेती आहे. ज्योतीताईंच्या घरी पारंपरिकपणे खिलार देशी गाई सांभाळल्या जातात. शेतजमीन कोरडवाहू असल्याने गाईंच्या संगोपनातून एकत्र कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला मदत होऊ शकते यादृष्टीने त्यांनी खिलार गाईंच्या संगोपनावर भर दिला आहे.

Khilar Cow
Animal Care : जनावरांना कसा होतो किटोसिस आजार?

ज्योतीताईंच्या माहेरी जनावरे असल्याने त्यांना गाईंच्या संगोपनाचा चांगला अनुभव होता. काळोशी येथील शंकर निकम यांच्याशी लग्न झाल्यावर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच्या दृष्टीने त्यांनी खिलार गाईंच्या संख्येत वाढ करण्याचा विचार मांडला. सासू,सासरे, पती शंकर तसेच दीर संतोष आणि जाऊ मयूरी यांनी या प्रस्तावाला चांगला प्रतिसाद दिला. ॲवॉर्ड संस्थेच्या नीलिमा कदम, किरण कदम यांनी देशी गाईंचे महत्त्‍व आणि त्यापासून आर्थिक मिळकतीबाबत मार्गदर्शन केले.

ज्योतीताईंचे पती शंकर यांना ॲवॉर्ड संस्थेने नागपूर, नाशिक येथील गोपालन संस्थेत प्रशिक्षणासाठी पाठविले. यानंतर निकम दांपत्याने घरातील आठ खिलार गाईद्वारे होणाऱ्या सर्व कालवडी न विकता गोठ्यामध्येच ठेवण्यास सुरुवात केली. यातून आजमितीला लहान मोठ्या जनावरांची संख्या बत्तीसवर गेली आहे. रोटेशन पद्धतीने गाई गाभण राहात असल्याने वर्षभर दुग्ध व्यवसाय सुरू राहण्यास मदत होते. शंकर निकम हे ट्रॅक्टर व्यवसायाबरोबर, शेती सांभाळतात. शेती कामासाठी दोन खिलार बैल आहेत. सासऱ्यांच्याकडे गाईंना चरावयास न्यायची जबाबदारी आहे.

Khilar Cow
Nagar Cow Death : संकट येतात, जिद्दीने काम सुरू ठेवा, पाठीशी आहोत

गोसंगोपनातील महत्त्वाच्या बाबी ः

१) पहाटे साडेपाच पासून कामकाजास सुरुवात. सकाळी पहिल्यांदा गोठा स्वच्छता आणि गाईच्या धारा काढल्या जातात. दहा वाजता गाईंना गावाजवळील डोंगरामध्ये चरावयास सोडले जाते. संध्याकाळी सहा वाजता गाई गोठ्यात येतात.

२) सुमारे ११ महिने गाई डोंगरात चरायला जातात. यामुळे चाऱ्यावरील ७० टक्के खर्चामध्ये बचत.

३) गाईंची रोगप्रतिकारशक्ती चांगली, त्यामुळे उपचारावर फारसा खर्च होत नाही. दरवर्षी लसीकरण केले जाते.

४) सध्या सात गाई दुधात आहेत. दररोज सुमारे आठ लिटर दुधाचे संकलन. सातारा शहरात शंभर रुपये लिटर दराने विक्री.

५) मागणीनुसार तसेच उन्हाळ्यामध्ये तुपाची निर्मिती. अडीच ते तीन हजार रुपये किलोप्रमाणे विक्री. दरवर्षी १५ किलो तुपाची विक्री.

६) वर्षाकाठी १५ ट्रॉली शेणखताची उपलब्धता. स्वतःच्या शेतीसाठी शेणखताचा वापर. उरलेल्या शेणखताची तीन हजार रुपये प्रति ट्रॉली या दराने शेतकऱ्यांना विक्री.

७) गाई खरेदी न करता गोठ्यातील गाईपासून झालेल्या कालवडीचे संगोपन.यातून मोठ्या प्रमाणात भांडवलाची बचत.

८) ज्योतीताईंकडे गाईंच्या धारा तसेच पंचगव्य निर्मितीची जबाबदारी.

विविध उत्पादनांची निर्मिती ः

नागपूर, नाशिक येथे शंकर निकम यांनी पंचगव्य निर्मिती प्रशिक्षण घेतले. त्यानंतर ज्योतीताईंनी पतीकडून पंचगव्य निर्मितीबाबत संपूर्ण माहिती आणि प्रक्रिया शिकून घेतली. दीड वर्षांपूर्वी टप्याटप्याने विविध उत्पादनांच्या निर्मितीला त्यांनी सुरुवात केली. गेल्या काही वर्षांत नागरिकांना देशी गाईचे शेण, मूत्र तसेच दुधापासून तयार होणाऱ्या उत्पादनांचे तसेच पंचगव्याचे महत्त्‍व कळाले आहे. त्यामुळे दरवर्षी विविध उत्पादनांना मागणी वाढत आहे. सध्या ज्योती निकम यांनी फक्त खिलार गाईंपासून पंचगव्य उत्पादनास प्राधान्य दिले आहे.

ज्योतीताई मागणीनुसार दंतमंजन, केशतेल, फेसपॅक, शाम्पू, साबण, अर्क, काढा कल्प, गोनाईल, अग्निहोत्रासाठी गोवऱ्या, धुपकांड्या, उटणे आदी उत्पादने शास्त्रोक्त पद्धतीने तयार करतात. ही उत्पादने बनविण्यासाठी गटातील महिलांना सामावून घेतले जात असल्याने त्यांनाही रोजगाराच्या चांगल्या संधी तयार झाल्या आहेत. उत्पादनांना परिसरातील नागरिकांकडून सुरुवातीपासूनच प्रतिसाद मिळाला आहे.

तसेच महिला बचत गटांच्या उत्पादनांची विक्री जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी होत असलेल्या प्रदर्शनामध्ये केली जाते. सध्या व्यवसायाची सुरुवात असतानाही लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने दरमहा खर्च वजा जाता तीन हजार रुपयांच्या मिळकतीस सुरुवात झाली आहे. ही उत्पादने लोकांच्या उपयोगी येत असल्याने गोपालन तसेच प्रक्रिया उत्पादनांच्या निर्मितीतून आनंद मिळत असल्याचे ज्योतीताई सांगतात.

कुटुंबाची मिळाली साथ ः

माहेरी गाईचे संगोपन केले जात असल्यामुळे ज्योतीताईंना गाईंच्या व्यवस्थापनाची पूर्ण माहिती आणि गोठ्यातील विविध कामांची सवय होती. सासरी काळोशीतही खिलार गाईंच्या संगोपनाला महत्त्‍व दिले जात होते. यामध्येच वाढ करत कुटुंबाचा आर्थिक आधार झाल्याने खिलार गाई खऱ्या अर्थाने कल्पवृक्ष झाल्या आहेत. सासू, सासरे, दिर,जाऊ तसेच पती शंकर यांची गोपालनामध्ये मोलाची साथ मिळाली आहे. पती शंकर आणि वैद्य युवराज जाधव यांचे पंचगव्य निर्मितीबाबत सातत्याने मार्गदर्शन मिळते. याचबरोबरीने महिला बचत गटामुळे गाई सांभाळण्याची, विविध उत्पादने तयार करण्याची ऊर्जा मिळाली. येत्या काळात देशी गाईंसाठी मुक्तसंचार गोठा तसेच पंचगव्य निर्मिती, विक्री मोठ्या प्रमाणात करणार असल्याची माहिती ज्योती निकम यांनी दिली.

संपर्क ः ज्योती निकम, ९५२९३२२४०४.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com