शेतकरी नियोजन: गोपालन

सध्या गोठ्यामध्ये एकूण २५ गायी आहेत. गाईंसाठी दोन मुक्त संचार आणि एक बंदिस्त गोठा बांधला आहे. मुक्त संचार गोठा प्रत्येकी ४५ बाय ७० फूट आणि ३५ बाय ७० फूट, तर बंदिस्त गोठा ३३ बाय ७० फूट आकाराचा आहे.
शेतकरी नियोजन: गोपालन
Indian CowAgrowon

शेतकरीः महेश अप्पासाहेब पाटील

गावः अलकुड (एम) ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली

एकूण गायीः २५

गीरः १२

सहिवालः १३

माझी कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड (एम) येथे १२ एकर शेती आहे. अधिकतम क्षेत्रामध्ये मका, कडवळ, ज्वारी, हत्ती गवत, ऊस इत्यादी चारा पिकांची लागवड केली जाते. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून २०१७ रोजी दोन गीर गायी विकत घेत दुग्ध व्यवसायास सुरुवात केली. त्यानंतर गुजरातमधून १२ गीर आणि हरियानातून १३ सहिवाल गायी विकत आणल्या. सध्या गोठ्यामध्ये एकूण २५ गायी आहेत. गाईंसाठी दोन मुक्त संचार आणि एक बंदिस्त गोठा बांधला आहे. मुक्त संचार गोठा प्रत्येकी ४५ बाय ७० फूट आणि ३५ बाय ७० फूट, तर बंदिस्त गोठा ३३ बाय ७० फूट आकाराचा आहे.

व्यवसायास सुरुवात केल्यानंतर साधारण २०१८ पासून व्यावसायिक स्तरावर दूध उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली. मागील पाच ते सहा वर्षांपासून गोपालनाचा व्यवसाय विविध अनुभवांतून यशस्वी केला आहे. प्रतिदिन साधारण ७० ते १०० लिटर दूध उत्पादन मिळते. संपूर्ण उपलब्ध दुधाची ‘यळकोट’ या ब्रॅंडने विक्री केली जाते. त्यासाठी फार्ममध्ये अद्ययावत पॅकिंग यंत्रणा बसविली आहे. दुधाच्या घरपोच विक्रीतून आत्तापर्यंत विविध ग्राहक जोडले गेले आहेत. विक्रीतून शिल्लक राहिलेल्या दुधापासून दही, ताक, लोणी आणि तूप अशा विविध दुग्ध पदार्थांची निर्मिती होते. तसेच गोठ्यातून मिळणारे शेण आणि गोमूत्र देखील विकले जाते. त्यामुळे अधिकचे उत्पन्न मिळण्यास मदत होते.

व्यवस्थापनातील बाबीः

 • दररोज पहाटे ५ वाजल्यापासून गोठ्यातील कामांना सुरुवात होते.

 • प्रथम शेण, मलमूत्र काढून गोठा स्वच्छ केला जातो.

 • त्यानंतर यंत्राद्वारे दूध काढले जाते. २५ गायींचे दूध काढण्यासाठी साधारण दीड तासाचा अवधी पुरेसा होतो.

 • दूध काढताना स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन केले जाते.

 • दूध काढल्यानंतर गायींना मिश्र चारा, भरडा आणि पशुखाद्य दिले जातो.

 • काढलेल्या दुधाचे व्यवस्थित पॅकिंग करून विक्रीसाठी पाठविले जाते.

 • दिवसातून किमान २ वेळा चारा दिला जातो. त्यात ओला तसेच सुका चारा, पशुखाद्य, मका, ऊस, ज्वारी आणि हत्ती गवत यांचा उपलब्धतेनुसार वापर केला जातो.

 • चारा, खाद्य, पाणी आणि स्वच्छता व्यवस्थापनावर विशेष भर दिला जातो. त्यामुळे गायींचे आरोग्य चांगले राहून उत्पादनात भर पडते.

 • बंदिस्त गोठ्यात हवा खेळती राहावी, यासाठी ३ फूट उंचीच्या भिंती बांधल्या आहेत.

 • महिन्यातून किमान २ वेळा पशुवैद्यक गोठ्यावर येऊन गायींची तपासणी करतात.

 • पशुवैद्यकांद्वारे वेळोवेळी लसीकरण केले जाते. त्यामुळे गायींचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

 • लसीकरण, गाभणकाळ आदी बाबींची तपशीलवार नोंद ठेवली जाते. नोंदी ठेवल्यामुळे गायींच्या आरोग्याची माहिती आणि वेतनकाळ याबाबत योग्य माहिती मिळण्यास मदत होते.

 • एका गायीला प्रतिदिन साधारण २० ते २५ किलो खाद्य दिले जाते.

 • गायींना पिण्यासाठी गोठ्यातच पाण्याची सोय केली आहे.

उन्हाळ्यातील व्यवस्थापनः

 • उन्हाळ्यातील वाढत्या तापमानात गायींची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते.

 • उन्हाळ्यात गायींच्या संगोपनासाठी मुक्त संचार गोठ्याचा वापर केला जातो.

 • मुक्त संचार गोठ्याची दररोज स्वच्छता केली जाते.

 • मुक्त संचार गोठ्यामध्येच गायींना सावलीसाठी शेड, झाडे लावली आहेत.

 • मुक्त संचार गोठ्यामध्ये चारा, पाण्याची योग्य व्यवस्था केली आहे.

 • गायी सकाळी आणि संध्याकाळी फक्त दोन तास बंदिस्त गोठ्यामध्ये दूध काढणे, चारा आणि भरडा खायला घालण्यासाठी आणल्या जातात. नंतर पुन्हा मुक्त संचार गोठ्यामध्ये सोडल्या जातात.

 • हिरवा चारा ७० टक्के, तर सुका चारा ३० टक्के याप्रमाणे प्रतिदिन चारा दिला जातो.

 • उन्हाळ्यात गायी मोकळ्या सोडल्यामुळे त्यांची पचनक्रिया उत्तम राहते.

आगामी नियोजनः

 • पावसाळ्यात गायी शक्यतो गोठ्यातच बांधल्या जातात. पाऊस नसेल आणि वातावरण चांगले असेल तेव्हाच मुक्त संचार गोठ्यात सोडल्या जातात.

 • बंदिस्त गोठ्यात गव्हाणीमध्येच पाइपलाइनच्या माध्यमातून पाण्याची उपलब्धता केली जाईल. पाणी दिल्यानंतर गव्हाण पूर्ण कोरडी झाल्यानंतर चारा दिला जाईल.

 • पावसाळ्यात गायींच्या आहारात हिरवा, सुका चारा आणि पशुखाद्याचा समावेश केला जातो. त्यानुसार चाऱ्याची आणि पशुखाद्याची उपलब्धता करून ठेवली जाईल.

 • येत्या काळात पशुवैद्यकांकडून लाळ्या खुरकूतसाठी लसीकरण केले जाईल.

दूध उत्पादन, विक्रीः

 • प्रतिदिन साधारण ६० ते ७० लिटर दूध उत्पादन मिळते.

 • दुधाची विक्री पाऊच पॅकिंगद्वारे ग्राहकांना घरपोच केली जाते.

 • दुधाची प्रतिलिटर ९० रुपये दराने तर तुपाची २६०० रुपये दराने केली जाते.

 • विक्रीतून शिल्लक राहिलेल्या दुधापासून विविध दुग्धपदार्थांची निर्मिती केली जाते.

 • दूध आणि दुग्ध पदार्थांच्या विक्रीसाठी ‘यळकोट’ नावाचा ब्रॅण्ड तयार केला आहे.

महेश पाटील, ८४५९६३१३६३

(शब्दांकनः अभिजित डाके)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com