Poultry Feed : ब्रॉयलर कोंबड्यांचे आहार व्यवस्थापन

ब्रॉयलर कोंबडीपालन व्यवसायामध्ये आहार हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. कारण या व्यवसायामध्ये आहारावर ६५ ते ७५ टक्के खर्च होतो. कोंबड्यांना ताजे, पौष्टिक, संतुलित अन्न घटक दिल्याने योग्य वाढ होते. त्यांची रोगप्रतिकार शक्ती उत्तम राहते.
Poultry
Poultry Agrowon

डॉ. के. वाय. देशपांडे, डॉ. आर. सी. कुलकर्णी

जनावरांप्रमाणे ब्रॉयलर कोंबड्यांनासुद्धा (Poultry feed) नियोजित काळात इच्छित वाढ होण्याकरिता संतुलित आहार मिळणे आवश्यक असते. चोवीस तासांत शरीराचे व्यवस्थापन, वजन वाढ, गादीवर फिरणे, शरीर तापमान संतुलन राखणे इत्यादींकरिता लागणारी पोषक तत्त्वांची आवश्यकता ज्या आहारातून पूर्ण होते, अशा आहारास संतुलित आहार म्हणतात. असा आहार विविध पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असतो.

आहारातील मुख्य घटक :

कोंबड्यांना (Chicken) देण्यात येणारा संतुलित आहार मुख्यतः मका आणि तेल विरहित सोयाबीन पेंड यापासून तयार करतात. याचबरोबरीने ऊर्जा, प्रथिने, चरबी/वसा, खनिजे, जीवनसत्त्व असे विविध घटक असलेले स्रोत यामध्ये उपयोगात आणले जातात.

१) ऊर्जा स्रोत :

भरडधान्य जसे की, मका (Maize), ज्वारी (Jowar), बाजरी, गहू, तांदूळ, जव इत्यादी. असे विविध ऊर्जा स्रोत असले तरीही पचनास सोपे आणि कुठलेही अखाद्य घटकापासून मुक्त असल्याने मका पोल्ट्री व्यवसायात ऊर्जा स्रोत म्हणून सर्वांत अधिक पसंत केला जातो.

२) प्रथिने स्रोत :

सोया पेंड, भुईमूग पेंड, सरकी पेंड (कमी प्रमाणात), मोहरी पेंड, गवार पेंड, सूर्यफूल पेंड, तीळ पेंड, जवस पेंड इत्यादी. सोया पेंड व्यतिरिक्त विविध प्रथिनांच्या स्रोतांत कोंबडीच्या पचनासाठी अयोग्य तत्त्व असल्याने सोया पेंडीला सर्वाधिक मागणी पोल्ट्री खाद्य व्यवसायात असते.

३) चरबी/वसा स्रोत :

यामध्ये वनस्पती तथा प्राणिजन्य स्रोतांचा अंतर्भाव असतो. वनस्पतिजन्य स्रोत जसे की, सोया तेल, पाम तेल, शेंगदाणा तेल इ. तसेच प्राणिजन्य स्रोत जसे की, विविध जनावरांच्या चरबीचा यामध्ये समावेश होतो.

Poultry
Poultry Feed : कोंबडी खाद्यात ‘गवार मील' चा वापर

४) क्षार तथा जीवनसत्त्व :

क्षार खनिजापासून मिळतात, तर जीवनसत्त्वाचे स्रोत मोठ्या पशुखाद्य व्यावसायिकांना विदेशातून उपलब्ध होतात. यांचा अंतर्भाव अत्यंत कमी प्रमाणात खाद्यात केला जातो.

५) खाद्य पूरक ः

अनेक खाद्य पूरक पोल्ट्री खाद्य गुणवत्ता, पाचकता इत्यादी वाढविणे तसेच खाद्य साठवण क्षमता वाढविण्याकरिता वापरले जातात.

खाद्य घटकांची गुणवत्ता तपासणी ः

१) मका, सोय डीओसी इत्यादी मोठ्या प्रमाणात खरेदी करताना येणाऱ्या मालाची गुणवत्ता तपासणी करणे अत्यंत गरजेचे असते.

२) खाद्य घटकातील राखेचे प्रमाण (acid insoluble ash) आणि ओलावा तपासणे आवश्यक असते.

३) चांगल्या खाद्य घटकांत राखेचे प्रमाण जास्तीत जास्त २.५ टक्के इतके असू शकते, तर ओलावा १२ टक्क्यांपेक्षा कमी असावा. यापेक्षा जास्त राख किंवा ओलावा असल्यास भेसळ असल्याची शक्यता असते.

४) तयार खाद्यात तंतूचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा कमी असावे.

५) खरेदी केलेल्या मका, सोया डीओसीमध्ये कुठलाही काळपटपणा नसावा. बुरशीचा प्रादुर्भाव झालेला नसावा.

६) नुकत्याच खरेदी केलेल्या खाद्य घटकांना लगेच सूर्यप्रकाशात वाळवून घ्यावे. त्यानंतर वापरावे.

कोंबडीची पचन संस्था ः

कोंबड्यांच्या आहाराबद्दल अधिक माहिती घेण्याअगोदर कोंबडीच्या पचनसंस्थेचा अभ्यास करणे आवश्यक आहे. कोंबडीच्या पचन संस्थेमध्ये खालीलप्रमाणे विविध मुख्य इंद्रिये पचनात मदत करतात.

१) चोच :

कोंबड्यांना दात नसतात. अन्न ग्रहण करण्याकरिता चोचीचा वापर करतात. तसेच इतर जनावरांपेक्षा कोंबडीमध्ये अन्नाच्या चवीचे पृथक्करण करण्याची क्षमता कमी असते.

२)अन्न नळी (इसोफेगस) :

अन्न पचन संस्थेत पुढे ढकलण्याचे कार्य अन्ननलिका करते.

३) पिशवी (क्रॉप) :

खाल्लेले अन्न साठवण करण्याचे कार्य ही पिशवी करते.

४) विकर पोट (प्रोवेन्टरीकुलस) :

खाल्लेले अन्न विकरांद्वारे पचविण्याचे कार्य हे मुख्य पोट करते.

५) स्नायुमय पोट (गीझार्ड) :

खाल्लेले अन्न चक्कीसारखे बारीक करण्याचे काम हे पोट करते.

६) लहान व मोठे आतडे :

लहान व मोठ्या आतड्याचे प्रत्येकी तीन भाग असतात. पचन झाल्याने तयार झालेले पोषक तत्त्व शोषण्याचे काम आतड्यातून होते.

७) स्वादुपिंड व यकृत ः

या ग्रंथी विकर तयार करून पोटाकडे सोडणे व प्रथिने, कर्बोदके तसेच चरबीचे पचन घडवून आणण्यात मदत करतात.

८) गुदद्वार (क्लोएका) :

विष्ठा, मूत्र तथा अंडे बाहेर पडण्याकरिता एकाच ठिकाणी एकत्रित येऊन विसर्जित होतात.

खाद्यांचे प्रकार :

साधारणतः खाद्य बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये खाद्याचे विविध प्रकार आहेत. भुकटी खाद्य, गोळी खाद्य, गोळीचा चुरा खाद्य.

मुख्यतः भुकटी खाद्य हे ब्रॉयलर कोंबड्यांना दिले जाते, पण ते खाद्य बनविताना संतुलित अन्नघटक आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे. खाद्यघटकांची खरेदी करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

खाद्य व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी :

१) कोंबड्यांना त्यांच्या वयोमानानुसार विविध प्रकारचे संतुलित अन्नघटक द्यावेत.

२) ऋतुमानानुसार अन्नघटकांमध्ये बदल करावा.

३) ब्रॉयलर कोंबड्यांना तीन प्रकारचे खाद्य द्यावे (भारतीय मानक ब्युरो, २००७ नुसार).

प्रीस्टार्टर खाद्य : प्रमाण २५० ते ४०० ग्रॅम प्रति कोंबडी (पहिले ७ ते १० दिवस)

स्टार्टर खाद्य : प्रमाण ६५० ते १००० ग्रॅम प्रति कोंबडी (११ ते २१ दिवस)

फिनिशर खाद्य : २६०० ते २८०० ग्रॅम प्रति कोंबडी (२२ दिवस ते कोंबडी विक्रीपर्यंत)

४) पहिल्या दिवशी पिलांना शक्यतो भरडलेला मका कागदावरती पसरवून द्यावा. यानंतर खाद्य देण्याकरिता भांड्यांचा वापर करावा.

५) कोंबडी चवीपेक्षा खाद्याचा रंग, आकार व प्रकार हे पाहून खाद्य ग्रहण करते.

६) कोंबडी मुख्यतः ऊर्जेची गरज पूर्ण करण्याकरिता अन्न ग्रहण करते. शेडमध्ये प्रकाश असेपर्यंत खाद्य खात राहते.

७) पिले शेडमध्ये आणलेल्या दिवशी वाहतुकीचा ताण नाहीसा करण्याकरिता गुळाचे पाणी पाजावे.

सुरुवातीस पिलांना १० ते १५ दिवसांकरिता खाद्याची लहान भांडी (चीक फीडर) आणि नंतर पिले मोठी झाल्यावर खाद्याची मोठी भांडी लावावीत.

Poultry
Chicken : चिकनसाठी कोंबडी मागा दीड ते दोन किलो वजनाचीच!

८) खाद्य भांडी काठोकाठ न भरता बांध्याच्या क्षमतेनुसार पाऊणपट इतकीच भरावीत, त्यामुळे खाद्य वाया जाणार नाही, सांडणार नाही.

९) प्रति कोंबडी कमीत कमी एक खाद्याचे आणि एक पाण्याचे भांडे असावे. उन्हाळ्यात हे प्रमाण एक खाद्य व एक पाण्याचे भांडे प्रति ४० कोंबड्या इतके असावे. असे केल्याने कोंबड्यांमधील खाद्य मिळण्याकरिता होणारी चढाओढ टाळता येते. वजने एकसारखी येतात.

१०) कोंबड्यांना खाद्य खाता येईल इतक्या उंचीवर आणि योग्य जागेवर खाद्य भांडी ठेवावीत. दररोज किती खाद्य देण्यात आले याची नोंद करावी.

११) लसीकरण, खाद्यपूरक औषधांचा वापर नियमानुसार करावा.

१२) कोंबडी खाद्याच्या दुप्पट पाणी पिते, त्यामुळे पाण्याची कमतरता कधीच पडू नये अशी व्यवस्था असावी. पहिले १० ते १५ दिवस प्रति ४० ते ५० कोंबड्यांसाठी एक पाण्याचे भांडे कमीत कमी असावे. उन्हाळ्यात पाणीपुरवठा निरंतर असावा.

भांड्यातील पाणी थंड आहे की नाही हे विशेषतः दुपारी तपासावे. उन्हाळ्यात सकाळी साधारणतः ११ वाजल्यापासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत १ किलोपेक्षा अधिक वजनाच्या कोंबडीस खाद्य देणे टाळावे, असे केल्याने खाद्य खाल्यानंतर लगेचच वाढणारी उष्णता व त्यामुळे येऊ घातलेला उष्मा ताण टाळता येतो.

या वेळी खाद्यऐवजी इलेक्ट्रोलाइट मिश्रित पाणी देण्यात यावे. परिणामतः उन्हाळ्यात उष्मा ताणाने मोठ्या कोंबड्या दगावण्याची संभावना कमी होते व आर्थिक नुकसान टळते.

घरच्या घरी खाद्यनिर्मिती ः

साहित्य ः दळण यंत्र, खाद्य मिक्सर, मका, तेलविरहित सोया पेंड (डीओसी), कॉन्सनट्रेट (३ टक्के, ५ टक्के, १० टक्के, ३७ टक्के आणि ६५ टक्के इत्यादी)

खाद्य फॉर्म्यूला ः

१) ३ टक्के कॉन्सनट्रेट+ मका + सोया डीओसी + तेल

२) ५ टक्के कॉन्सनट्रेट+ मका + सोया डीओसी + तेल

३) १० टक्के कॉन्सनट्रेट+ मका + सोया डीओसी

४) ३७.५ टक्के कॉन्सनट्रेट+ ६२.५ टक्के मका

५) ६५ टक्के कॉन्सनट्रेट + ३५ टक्के मका

टीप ः घरच्या घरी खाद्यनिर्मिती करणे शक्य नसल्यास अथवा तयार कोंबडी खाद्य वापरायचे असल्यास व्यावसायिक कोंबडी खाद्य उत्पादक कंपनी नामांकित असावी.

तसेच पुरवठादाराला खाद्य रूपांतर गुणोत्तर विचारून खरेदी करत असलेल्या कोंबडी खाद्याची गुणवत्ता जाणून घ्यावी.

प्रमुख नोंदी :

१) दर आठवड्याचे सरासरी वजन (७ मादी व ३ नर एकत्र मोजून त्याची सरासरी नोंद करावी.)

२) खाद्य पुरवठ्याची नोंद.

३) एफसीआर गुणोत्तर = प्रति कोंबडी खाल्लेले एकूण खाद्य / प्रति कोंबडी सरासरी वजन

४) लसीकरणाची नोंद.

५) औषधांची नोंद.

६) झालेले आजार व वेळोवेळी केलेले उपचाराची नोंद.

७) वीज, मजुरी व इतर खर्चाची नोंद.

८) एक वर्षात वेळोवेळी कोंबडी विक्री दर (अनुभवांची नोंद)

९) प्रत्येक बॅचची सुरवातीची व शेवटची तारीख.

१०) कोंबडी, खाद्य, औषध व इतर खर्चाची नोंद.

-डॉ. कुलदीप देशपांडे, ८००७८६०६७२, (सहायक प्राध्यापक तथा विभाग प्रमुख, पशु पोषण विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

-डॉ. आर. सी. कुलकर्णी, ७७७६८७१८००, (सहायक प्राध्यापक, कुक्कुटपालन शास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com