Poultry Feed Management : लेअर कोंबड्यांचे आहार व्यवस्थापन

चोवीस तासांत शरीराचे व्यवस्थापन, शारीरिक वाढ, अंडी निर्मिती, शरीर तापमान संतुलन राखणे इत्यादी करिता लागणारी पोषक तत्त्वांची आवश्यकता असते.
Poultry Feed
Poultry FeedAgrowon

डॉ. के. वाय. देशपांडे, डॉ. आर. सी. कुलकर्णी

मांसल कोंबड्याप्रमाणेच लेअर कोंबडीपालनात (Layer Poultry Farming) सुद्धा उच्चांकी उत्पादन (Poultry Production), उत्पादनात सातत्य, रोग प्रतिबंध व उत्पादन खर्चात कपात करणे ही महत्त्वाची उद्दिष्ट असतात.

लेअर कुक्कुटपालनात (Layer Poultry Farming) ६५ ते ७५ टक्के खर्च हा खाद्यावर होतो. यामुळे लेअर कोंबड्यांना सातत्याने आणि अवस्थेनुसार संतुलित आहार (Poultry Diet) पुरवणे आवश्यक आहे.

लेअर कोंबड्या वयाच्या ७२ आठवड्यांपर्यंत उत्पादनक्षम असतात, परंतु व्यावसायिक कोंबड्या जवळपास ११० आठवड्यांपर्यंत अंडी (Egg) देऊ शकतात.

त्यामुळे बरेचशे अंडी उत्पादक ११० आठवड्यांपर्यंत त्यांचे संगोपन उत्तमरीत्या करत आहेत. अंडी उत्पादन (Egg Producer) साधारणतः १८ ते २१ आठवड्यांदरम्यान सुरू होते. काही शेतकरी एकदिवसीय पिले घेऊन त्यांना आपल्याच शेडमध्ये वाढवतात.

काही शेतकरी १२ ते १८ आठवडे वयाच्या तलंगा विकत आणतात आणि त्यापासून उत्पादन घ्यायला सुरुवात करतात. लेअर कुक्कुटपालन गादीवर मुक्त संचार पद्धतीने किंवा ३ ते ५ पक्षी एका पिंजऱ्यात ठेवून करता येऊ शकते.

मुक्त संचार पद्धतीमध्ये फिरण्यास मोकळीक असल्याने कोंबडीच्या ऊर्जेचा ऱ्हास अधिक होतो, परिणामतः खाद्य रुपांतरण कमी होते, त्यामुळे पिंजरा पद्धतीत संतुलित आहार देऊन योग्य प्रकारे संगोपन केल्यास अंडी उत्पादनात वाढ होते.

आहारातील मुख्य घटक :

कोंबड्यांना देण्यात येणारा संतुलित आहार मुख्यतः मका आणि तेलविरहित सोयाबीन पेंड यापासून तयार करतात.

तरीही ऊर्जा, प्रथिने, चरबी/वसा, खनिजे, जीवनसत्त्व असे घटक असलेले विविध स्रोत याकरिता उपयोगात आणले जाऊ शकतात.

ऊर्जा स्रोत :

भरडधान्य, जसे की मका, ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, जव इत्यादी. अनेक ऊर्जा स्रोत असले तरीही पचनास सोपे आणि कुठलेही अपायकारक घटकांपासून मुक्त असल्याने मका पोल्ट्री व्यवसायात ऊर्जा स्रोत म्हणून सर्वांत अधिक पसंत केला जातो.

प्रथिने स्रोत :

सोया पेंड, भुईमूग पेंड, सरकी पेंड (कमी प्रमाणात), मोहरी पेंड, गवार पेंड, सूर्यफूल पेंड, तीळ पेंड, जवस पेंड इत्यादी.

सोया पेंड व्यतिरिक्त विविध प्रथिनांच्या स्रोतांत कोंबडीच्या पचनासाठी अयोग्य तत्त्व असल्याने सोया पेंडीला सर्वाधिक मागणी पोल्ट्री खाद्य व्यवसायात असते.

Poultry Feed
ही कोंबडी ठरली आदिवासींचा आधार !

चरबी/वसा स्रोत :

यामध्ये वनस्पती तथा प्राणिजन्य स्रोतांचा अंतर्भाव असतो. वनस्पतिजन्य स्रोत, जसे की सोया तेल, पाम तेल, शेंगदाणा तेल इत्यादी. तसेच प्राणिजन्य स्रोत, जसे की विविध जनावरांची चरबीचा समावेश होतो.

क्षार तथा जीवनसत्त्व :

क्षार खनिजापासून मिळतात, तर जीवनसत्त्वाचे स्रोत मोठ्या पशुखाद्य व्यावसायिकांना विदेशातून उपलब्ध होतात. यांचा अंतर्भाव अत्यंत कमी प्रमाणात खाद्यात केला जातो.

याव्यतिरिक्त अनेक खाद्यपूरक पोल्ट्री खाद्य गुणवत्ता, पाचकता इत्यादी वाढविणे तसेच खाद्य साठवण क्षमता वाढविण्याकरिता वापरले जातात.

लेयर कोंबडी खाद्यात कॅल्शिअमचे महत्त्व :

१) खाद्यातील कॅल्शिअम, जीवनसत्त्व ‘ड’ची कमतरता तसेच फुफ्फुसांचे आजारामुळे कवचाची गुणवत्ता कमी होते.

२) खाद्यातील कॅल्शिअम व फॉस्फरस गुणोत्तराच्या असंतुलनामुळे अंडी कवच कमकुवत होते.

३) अंडी देणाऱ्या कोंबड्यांना कॅल्शिअमची गरज जास्त असते कारण अंड्याचे कवच शरीरात तयार करण्यासाठी दररोज प्रति कोंबडी ४ ते ५ ग्रॅम कॅल्शिअम लागते.

४) खाद्यातून मिळणाऱ्या कॅल्शिअमने ही गरज बरेचदा पूर्ण होऊ शकत नाही.

५) संपूर्ण दिवसाचा विचार केल्यास दुपारच्या वेळी कोंबडीला कॅल्शिअमची गरज अधिक असते कारण याच कालावधीमध्ये अंडे कवच गर्भाशयात तयार होते.

६) लेयर कोंबडी खाद्यात कॅल्शिअमची पूर्तता होण्याकरिता चुनखडी, शिंपले पूड, प्रवाळ भुकटी आणि क्षार मिश्रणाचा वापर करावा.

७) उन्हाळ्याच्या दिवसांत खाद्यात खाण्याचा सोडा वापरावा. खाद्यावर शिंपले पूड किंवा मार्बल तुकडे पसरावेत. त्यामुळे अंडी कवच टणक व घट्ट बनते. अंड्यांचा दर्जा टिकून राहण्यास मदत होते.

प्रमुख नोंदी:

१) दर आठवड्याचे सरासरी वजन. खाद्य पुरवठ्याची नोंद

२) लसीकरण आणि औषधांची नोंद.

३) झालेले आजार व वेळोवेळी केलेल्या उपचारांची नोंद.

४) वीज, मजुरी व तर खर्चाची नोंद.

५) दैनंदिन अंडी उत्पादन.

६) एका वर्षात वेळोवेळी मिळालेला अंडी विक्री दर (अनुभवांची नोंद)

७) प्रत्येक बॅचची सुरवात आणि शेवटची तारीख

८) कोंबडी संख्या, खाद्य, औषधे आणि इतर खर्चाची नोंद.

Poultry Feed
Poultry Feed : कोंबडी खाद्यात ‘गवार मील' चा वापर

लेअर कोंबड्यांचे उत्पादन चक्र

अवस्था---अंडी उत्पादन---अंड्याचे वजन---कोंबडीचे वजन

१ (३६ आठवड्यांपर्यंत)---वाढते व उच्चांक गाठते---हळूहळू वाढते ---हळूहळू वाढते

२ (३७-५६ आठवडे)---उत्पादन स्थिर राहते ---हळूहळू वाढते ---हळूहळू वाढते

३ (५७ आठवडे ते पुढे)---उत्पादन घटते ---हळूहळू वाढते ---थोडेसे वाढते

अंडी उत्पादनाकरिता कोंबडीला ७२ आठवड्यांपर्यंत विविध अवस्थेनुसार लागणारे खाद्य ः

आठवडे------खाद्य---खाद्याची गरज (किलो)

० ते ८---चीक खाद्य---१.५

९ ते २०---ग्रोअर खाद्य---६.५ ते ७.०

२१ ते ७२---लेयर खाद्य---३७ ते ४०

खाद्य व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी :

१) लेअर कोंबड्यांना त्यांच्या वयोमानानुसार विविध प्रकारचे संतुलित अन्नघटक द्यावेत.

२) ऋतुमानानुसार अन्नघटकांमध्ये बदल करावा.

३) मुख्यत्वे लेअर कोंबड्यांना (भारतीय मानक ब्युरो-२००७) नुसार खाद्य द्यावे.

पोषण मूल्यांतील आवश्यकता.

पोषण मूल्ये - आवश्यकता

चीक खाद्य (१ ते ८ आठवडे)---ग्रोवर खाद्य (९ ते २०आठवडे)---लेअर खाद्य टप्पा-१ (२१ ते ५० आठवडे)---- लेअर खाद्य टप्पा-२ (५१ ते ७२ आठवडे)

आर्द्रता (कमाल टक्के)---११---११---११---११

प्रथिने (किमान टक्के)---२०---१६---१८---१६

ऊर्जा चयापचय (किमान) टक्के (किलो कॅलरी)---२८००---२५००---२६००---२४००

तंतुमय पदार्थ (कमाल टक्के)---७---९---९---१०

वसा/चरबी (किमान टक्के)---२---२---२---२

मीठ (कमाल टक्के)---०.५---०.५---०.५---०.५

कॅल्शिअम (किमान टक्के)---१---१---३---३.५

एकूण फॉस्फरस (किमान टक्के) ---०.७---०.६५---०.६५---०.६५

उपलब्ध फॉस्फरस (किमान टक्के) ---०.४५----०.४०---०.४०---०.४०

खाद्य बनविण्यासाठी लक्षात घेण्याच्या बाबी ः

१) कोंबडीची पोषण मूल्यांची गरज.

२) विविध खाद्य घटकांमध्ये असलेली पोषण मूल्ये.

३) एक टन खाद्य बनविण्याकरीता विविध खाद्य घटकांच्या वापराचे प्रमाण.

४) खाद्य घटकांच्या किमती.

खाद्य देण्याचे वेळापत्रक

वय आठवडे---प्रति कोंबडी प्रति दिवस खाद्याचे प्रमाण (ग्रॅम)

१---९

२---१६

३---२६

४---३५

५---४२

Poultry Feed
Poultry Farming : अर्धबंदिस्त कोंबडीपालन ठरला उत्पन्नाचा भक्कम आधार

६---४८

७---५६

८---६२

९---६५

१०---७०

११---७५

१२---८०

१३ ते १६---८५-९०

१६ ते १८---९५-१००

१९ ते २०---१००-१०५

२० ते पुढे---११०

टीप ः १) प्रथम १ ते २ दिवस पिलांना फक्त भरडलेला मका द्यावा. तसेच पिले आलेल्या दिवशी वाहतुकीचा ताण नाहीसा करण्याकरिता गुळाचे पाणी पाजावे.

२) ४ ते ५ दिवस पिलांना खाद्य कागदावर पसरवून द्यावे. यानंतर खाद्य देण्याकरिता भांड्यांचा वापर करावा.

३) लसीकरण, खाद्यपूरक औषधे, चोच कापणे/जाळणे इत्यादी नियमानुसार सुरू ठेवावे.

डॉ. कुलदीप देशपांडे, ८००७८६०६७२, (विभाग प्रमुख, पशू पोषण विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

डॉ. आर. सी. कुलकर्णी, ७७७६८७१८००, (सहायक प्राध्यापक, कुक्कुटपालन शास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com