Animal Care : जनावरांतील आनुवंशिक आजार

आनुवंशिक आजार संसर्गजन्य नसले तरी यांचा जनावरांच्या उत्पादनक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. प्रजननक्षम जनावरांची गुणसूत्र चाचणी करून आनुवंशिक आजाराचे वाहक असणारे जनावर ओळखता येते.
Animal care
Animal careAgrowon

डॉ. बी. सी. घुमरे, डॉ. तेजस शेंडे

जनावरांना जिवाणू, विषाणू यांच्या प्रादुर्भावामुळे (Virus Outbreak) किंवा जीवनसत्त्व, खनिजांच्या कमतरतेमुळे (Mineral) प्रामुख्याने लाळ्या खुरकूत (Foot And Mouth Disease), घटसर्प, फऱ्या, धनुर्वात असे आजार होतात. यासोबतच जनावरांना आपल्याला माहीत नसलेले अनेक आनुवंशिक आजारही (Animal Genetic Disease) होतात. जे त्यांच्या माता-पित्याकडून त्यांच्यामध्ये येतात. अशा वंशपरंपरेने पुढच्या पिढीत चालत आलेल्या आजारांना आनुवंशिक आजार असे म्हणतात.

Animal care
Lumpy Skin : सरपंचाचे स्वखर्चातून ५०० जनावरांना लसीकरण

- आनुवंशिक आजार हे गुणसूत्रातील जनुकीय बदलामुळे एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित होतात.

- प्रादुर्भावग्रस्त जनावरे स्वतः या आजाराची लक्षणे न दाखवता केवळ वाहकाची भूमिका बजावतात. ही वाहक जनावरे प्रजननक्षम झाल्यावर पुढच्या पिढीत हे जनुकीय दोष संक्रमित करून आजार निर्माण करतात.

- गाई, म्हशींमध्ये प्रजननासाठी वापरण्यात येणाऱ्या वळूंमध्ये जर काही आनुवंशिक आजार असेल तर तो आजार वीर्यामार्फत अनेक वासरांमध्ये येऊ शकतो.

- आनुवंशिक आजार हे जरी संसर्गजन्य नसले तरी या आजारांचा जनावरांच्या उत्पादनक्षमतेवर विपरीत परिणाम होतो.

- एखादे जनावर बाह्यरूपाने जरी सुदृढ दिसत असले तरी कोणत्याही प्रकारचा आनुवंशिक आजार त्याला झालेला नाही, असे निश्‍चितपणे सांगता येत नाही. ते जनावर एखाद्या आनुवंशिक आजाराचा वाहक असू शकते.

Animal care
Lumpy skin : ‘लम्पी स्किन'चा होतोय प्रसार

आनुवंशिक रोगांचे संक्रमण ः

- जनावरांच्या प्रत्येक पेशींमध्ये गुणसूत्रे असतात, या गुणसूत्रांमध्ये असंख्य जनुके असतात.

- जनावरांच्या शरीरातील निरनिराळ्या अवयवांची वाढ, उत्पादनक्षमता, अन्न पचविण्यासाठी, पचलेले अन्न शोषून घेण्यासाठी असलेली विकरे त्यांचा स्राव, संप्रेरके या सर्व गोष्टी निरनिराळी जनुके नियंत्रित करीत असतात.

- एखाद्या जनावराच्या शरीरातील जनुकात काही दोष निर्माण झाल्यास आणि हा दोष जर आनुवंशिक स्वरूपाचा असेल तर पुढच्या पिढीत हा दोष संक्रमित होतो. त्या आजाराचा प्रसार होतो.

- काही जनावरांमध्ये जनुकीय दोष असूनही ही जनावरे बाह्यतः इतर जनावरांसारखीच दिसतात, परंतु आनुवंशिक आजार पुढच्या पिढीत संक्रमित करण्याची क्षमता त्यांच्यात असते.

Animal care
Poultry Farming : कोंबडीपालनाने दिली बचत गटाला साथ

आनुवंशिक आजार झालेल्या जनावरांतील लक्षणे ः

- जनावरांमध्ये वेगवेगळ्या अवयवांवर आनुवंशिक आजाराचा विपरीत परिणाम होतो. त्यामध्ये प्रामुख्याने हाडांची योग्य वाढ न होणे, मज्जासंस्थेवर परिणाम होणे, रक्तदोष निर्माण होणे, त्वचा आणि डोळ्यांच्या आजारांचा समावेश होतो.

- हाडांच्या वाढीसंबंधी आनुवंशिक आजारामध्ये काँड्रोप्लासिया म्हणजे हाडांची पूर्ण वाढ न झाल्याने खुजेपणा येतो.

- काही जनावरांमध्ये पाठीचा मणका, खुरांची वाढ योग्य तऱ्हेने होत नाही. त्यामुळे त्यांना नीट चालता येत नाही.

- काही जनावरांमध्ये सांधे, सांधा आणि हाडांना जोडणारे स्नायू कमकुवत होऊन अस्थिभंग होण्याचे प्रमाण वाढते.

- ऑस्टिओ प्रेट्रॉसिस या आजारामुळे वासरे १० ते ३० दिवस अगोदर जन्माला येतात. त्यांचे डोके, जीभ, दात, जबडा हे विचित्र दिसते.

- मज्जासंस्थेच्या आनुवंशिक आजारांमध्ये जनावरांचे चारही पाय कमकुवत होऊन त्यांची नैसर्गिक चाल बदलते.

- काही जनावरांमध्ये मांसपेशींची वाढ योग्य तऱ्हेने होत नाही. त्यामुळे कालांतराने त्यांचे चारही पाय कमकुवत होतात. ते एकाच जागी बसून राहतात.

- बोव्हाईन ल्युकोसाइट ॲडहेजन डीफिसीएन्सी नावाच्या रक्तदोषामुळे होणाऱ्या आजारांमध्ये जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन ते संसर्गजन्य आजाराला बळी पडतात. या संसर्गजन्य आजारात तोंड, दात, हिरड्यांमध्ये संसर्ग आढळून येतो. त्यामुळे अशी जनावरे खाद्य खाऊ शकत नाहीत. परिणामी, त्यांच्या वाढीवर आणि उत्पादनक्षमतेवर विपरीत परिणाम दिसतो.

- भारतामध्ये एचएफ आणि तिच्या संकरित गाईमध्ये या रोगाच्या वाहकाचे प्रमाण ३.२३ टक्के, तर रेतनाकरिता वापरल्या जाणाऱ्या वळूंमध्ये १.५९ टक्का इतके आढळून आले आहे.

- रक्तातील हिमोग्लोबीन निर्माण होण्याकरिता आवश्यक असलेल्या विकराच्या कमतरतेमुळे जनावरांचे दात आणि हाडे तपकिरी रंगाची होतात.

- काही जनावरांमध्ये आहारातून योग्य प्रमाणात जस्त हे खनिज मिश्रण देऊनही त्याची कमतरता दिसून येते. या आजारात आतड्याची जस्त शोषून घेण्याची क्षमता कमी होते.

- जस्ताच्या कमतरतेमुळे जनावरांच्या तोंडजवळ, डोळ्यांभोवती, कानाजवळ सर्व सांध्यावर, पायावर तसेच छाती आणि पोटाखालील कातडीवर जखमा दिसून येतात. त्वचेवर कोंडा दिसून येतो. अशा जखमांवर माश्‍या बसून अळ्या तयार होतात.

- काही आनुवंशिक आजारात जनावरांना जन्मतः डोळे नसणे, मोतीबिंदू होणे, अंधत्व यांसारखे आजारही दिसून येतात.

- काही आनुवंशिक आजारात गाभण जनावरांचा गर्भपात होतो किंवा मृत वासरे जन्मास येतात. काहींमध्ये विकृती असलेली जिवंत वासरे जन्मास येतात आणि काही तासातच ती मरतात. वासरे मेल्यामुळे गाई पान्हा सोडत नाहीत. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते.

- अशा प्रकारची आर्थिक हानी टाळण्यासाठी आनुवंशिक रोगाची वाहक जनावरे प्रजननासाठी योग्य नाहीत म्हणून त्यांना प्रजननापासून दूर ठेवणे आवश्यक आहे.

- वाहक जनावरे ओळखण्यासाठी सर्व प्रजननक्षम जनावरांची गुणसूत्र चाचणी करून घेणे अतिशय आवश्यक आहे.

संपर्क ः

डॉ. बी. सी. घुमरे, ९४२१९८४६८१

डॉ. तेजस शेंडे, ९४२४८०२६३

(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com