Goat Farming : शेळीपालनाने थांबविला मोलमजुरीचा संघर्ष

देवठाणा (जि. बीड) येथील सतीश व बाळू या वारकड बंधूंनी पीक पद्धती बदलण्याबरोबर चार वर्षांपासून उस्मानाबादी शेळीपालनाची जोड दिली आहे. एकेकाळी ऊसतोड मजुरीचे जीणे व त्यातील संघर्ष पचविताना कुटुंबाने कष्ट व विचारपूर्वक शेतीत प्रयत्न केले. दरवर्षी ऊसतोडीसाठी हाती येणारा कोयता आता कायमचा सुटला आहे.
Goat Farming
Goat FarmingAgrowon

बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्याअंतर्गत येत असलेल्या देवठाण गावचे सतीश मरीबा वारकड व त्यांचे बंधू बाळू यांची १५ एकर शेती आहे. पूर्वी पारंपारिक (Traditional Agriculture) असलेल्या शेतीला त्यांनी शेवगा (Drumstick), सीताफळ (Custard Apple), पेरू, केशर आंबा (Mango), लिंबू आदी फळपिकांची जोड दिली आहे. तीन वर्षांपासून स्वीकारलेल्या फळपिकांना जवळपास चार वर्षांपासून उस्मानाबादी शेळीपालनाची (Osmanabadi Goat Farming) जोड दिली आहे. एकत्रित असताना शेतीच्या तुलनेत अल्प गुंतवणुकीत हे शेळीपालन (Goat Rearing) सुरू केले. आज दोन्ही बंधूंचे कुटुंब विभक्‍त झाले असतानाही हा व्यवसाय या कुटुंबांचा आधार बनले आहे.

पीकपद्धती बदलली

वारकड बंधू पूर्वी कपाशी, बाजरी, ज्वारी, तूर, मूग, उडीद अशी पिके घ्यायचे. परंतु ग्लोबल परळी या प्रकल्पांतर्गत ते ‘ग्लोबल विकास ट्रस्ट’च्या संपर्कात आले आणि फळपिकांच्या लागवडीला चालना मिळाली. यात सतीश त्यांच्या वाट्यातील साडेसात एकरांपैकी अर्धा एकरात शेवगा, अर्धा एकरात सीताफळ व एक एकरावर केशर आंबा लागवड झाली. बाळू यांनी एक एकरात सीताफळ, एक एकरात शेवगा, अर्धा एकर पेरू व अर्धा एकर लिंबाची लागवड केली. या पीकपध्दतीतून वर्षाला आर्थिक स्थिरसावर होण्यास मदत झाली आहे.

शेळीपालनाची दिशा

वारकड बंधूंचे कुटुंब एकत्र होते त्यावेळी त्यांनी उस्मानाबादी शेळ्यांचे पालन सुरू केले. त्यासाठी ९२ हजारांची गुंतवणूक करून नऊ शेळ्यांची खरेदी केली व शेडसाठी जवळपास एक लाख १० हजार रुपये खर्च आला. अर्धबंदिस्त पद्धतीने शेळीपालन सुरू केले. दरम्यान दीड ते दोन वर्षापूर्वी कुटुंब विभक्‍त झाले. तरीही शेळीपालन सुरूच राहून आजमितीला लहान- मोठ्या धरून १०० शेळ्यांपर्यंत व्यवसाय पोचला आहे. सुमारे ६० शेळ्या सतीश यांच्याकडे तर ४० शेळ्या बाळू यांच्याकडे आहेत.

Goat Farming
शेळीपालन व्यवसाय करत असताना जागेची निवड कशी करावी?

सतीष यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुले असून एका मुलीचा विवाह झाला आहे. दुसरीकडे बाळू यांचा पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहेत. गावातील घरात राहणाऱ्या आई- वडिलांच्या संगोपनाची जबाबदारी दोघे भाऊ एकत्रित सांभाळतात. शेळीपालनाचा विस्तार करणाऱ्या वारकड बंधूंनी चाऱ्याची सोय व्हावी म्हणून गजरा, दशरथ, लसूण घास आदींची लागवड केली आहे. याशिवाय बांधावर सुबाभूळ, बोर, चिंच आदी झाडेही लावली आहेत. यंदा ३० गुंठे तुतीची लागवड सतीश यांनी केली आहे. सोयाबीन, मका, बाजरी, ज्वारी, आदी पिकेही चाऱ्यासाठी उपयोगी ठरतात.

परसबागेतील कोंबडीपालन

शेळीपालनासोबत ग्राहकांची मागणी ओळखून स्थानिक गावरान व कावेरी जातीच्या कोंबड्यांचे पालनही सुरू केले आहे. साधारणतः: ४० ते ५० कोंबड्या प्रत्येक भावांकडे आहेत. या माध्यमातून कोंबडी व अंडी विक्रीतून कुटुंबाचा बराच खर्च भागविण्याचे काम होते आहे.

Goat Farming
Poultry : अल्पभूधारकाचे ‘हॅचरी’सह कुक्कुट व शेळीपालन

पूरक उद्योगातील ठळक बाबी

-उत्पादित शेतमालाची प्रसंगी थेट विक्री तसेच जागेवरूनच शेळ्या, कोंबड्या व अंडी यांचीही विक्री. -चराई तसेच बंदिस्त पद्धतीनेही शेळीपालन. वर्षाकाठी २ ते ५ पर्यंत गाभण व व्यालेल्या शेळ्यांची विक्री. मुख्यतः पैदाशीसाठी मागणी. १५ हजांरापासून ते ३५ हजारांपर्यंत दर.

-वय वाढलेल्या शेळ्या कमी करून नव्या दमाच्या शेळ्या ठेवण्याची

सवय.

-३० ते ५० पिल्लांची दरवर्षी सिरसाळा व पातोडच्या बाजारात विक्री. ५ ते १२ हजारांपर्यंत मिळाला प्रति नगाला आजवर दर

-वर्षातून तीन वेळा केले जाते लसीकरण

-सिंचनासाठी तीन बोअरवेल व एक विहीर. संपूर्ण फळपिकांचे क्षेत्र ठिबकवर

-गाय, म्हैस, बैलांचेही संगोपन.

दरवर्षी मुबलक लेंडीखत

दोन्ही भावांकडे प्रत्येकी ४० ते ५० बैलगाड्या लेंडीखत जमा होते. ज्याचा वापर शेतात चांगल्या प्रमाणात करणे शक्य होते. त्यामुळे दरवर्षी रासायनिक खतांवर होणारा किमान एक लाख रुपयांपर्यंतचा खर्च आता ३० ते ४० हजारांपर्यंत खाली आला आहे. जमिनीचा पोतही मोठ्या प्रमाणात सुधारण्यास मदत झाली आहे.

मोलमजुरी संपली, शेतीत प्रगती झाली

वारकड यांच्या गणितानुसार त्यांच्याकडील एक शेळी वर्षातून दोन वेळा विते. त्यातून ती दोन ते चार पिल्ले देते. एक पिल्लू ४ ते ६ महिन्यापर्यंत सांभाळण्यात येते. त्याला ५ ते १० हजारांपर्यंतचा प्रति नग दर मिळतो. एका वर्षात किमान १० ते २० हजार रुपयांचे उत्पन्न हाती पडते. चारा शक्यतो घरचाच असतो. त्यामुळे त्यावर होणार खर्च कमी होतो. दुसरीकडे उत्पादन खर्च व त्या तुलनेत पीक उत्पादन पाहात निसर्ग व बाजाराच्या भरवशावर त्याचं गणित ठरतं. त्यामुळे शेळीपालन अर्थकारण सक्षम करणारा व्यवसाय ठरतो असे वारकड यांच्या अनुभवास आले आहे.

एकेकाळी ऊस कोड करून मोलमजुरी करून शेतीत प्रगती करणाऱ्या या कुटुंबाने पाच एकर जमीनही घेतली आहे. बदललेली पीक पद्धती व उस्मानाबादी शेळीपालनाने आमच्या हातचा कोयता कायमचा सोडण्याची तजवीज केल्याचं सतीश अभिमानाने सांगतात.

संपर्क- सतीश वारकड- ९५४५००४६१४

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com