गाभण कालवडीची काळजी अन् संगोपनाचे अर्थकारण

गाभण कालवडीचे आरोग्य व्यवस्थापन हे तिच्या पुढच्या वेतातील दूध उत्पादनावर आणि जन्माला येणाऱ्या कालवडीच्या आरोग्यावर परिणाम करत असते. यासाठी गाभण काळात कालवडीचे योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे.
Pregnant Heifer
Pregnant Heifer Agrowon

एका कालवडीचे उत्तम दुधाळ गाईत रूपांतर करण्यासाठी ती गाभण असताना योग्य नियोजन होणे खूप गरजेचे आहे. कृत्रिम रेतन केल्यानंतर १८ ते २२ दिवसांच्या दरम्यान कालवड पुन्हा माज करते का? यावर लक्ष ठेवावे. माज न केल्यास दोन महिन्यांनी तज्ज्ञ पशुवैद्यकांकडून गर्भधारणा झाली किंवा नाही याची तपासणी करून घ्यावी. गर्भधारणा झाली असल्यास पुढील प्रमाणे नियोजन करावे.

गाभण कालवडीचे आहार नियोजन ः

१) कालवड प्रौढ वजनाच्या ६५ टक्के वजन असताना वयात येते आणि गाभण राहते. विताना तिचे वजन प्रौढ वजनाच्या ८५ टक्के असले पाहिजे. परंतु तिचे शरीर गुणांकन हे ३.५ ते ४ पेक्षा अधिक सुद्धा असायला नको.

२) गर्भधारणा निश्‍चित झाल्यानंतर कालवडीला गाभण काळासाठीचे पशुखाद्य सकाळी १ किलो आणि संध्याकाळी १ किलो द्यायला सुरवात करावी. त्यातून ४० ते ५० ग्राम क्षार खनिज मिश्रण द्यावे.

३) गाभण काळात शेवटच्या १५ दिवसांत क्षार खनिज मिश्रण बंद करून अनिओनिक मिश्रण द्यायला सुरू करावे. शेवटच्या महिन्यात कालवडीला आहारातील मीठ आणि रुमेन बफरचा वापर करू नये, यामुळे विताना शरीरात लागणारे कॅल्शिअमची गरज हाडातील साठवलेल्या कॅल्शिअम मधून भागवली जाईल.

४) कुठल्याही परिस्थितीत गाभण कालवडीला दुधासाठीचे पशुखाद्य खायला घालू नये.

५) पहिल्या वेतात कासेतील पेशींची ८० ते ९० टक्केनिर्मिती आणि वाढ होत असते त्यासाठी गाभण काळातील शेवटच्या तीन महिन्यात कासेच्या वाढीसाठीचे आवश्यक जीवनसत्त्वे अ,डी-३, इ आणि एचचे टॉनिक द्यावे.

गाभण कालवडीचे आरोग्य व्यवस्थापन

१) गाभण कालवडीचे आरोग्य व्यवस्थापन हे तिच्या पुढच्या वेतातील दूध उत्पादनावर आणि जन्माला येणाऱ्या कालवडीच्या आरोग्यावर परिणाम करत असते. यासाठी गाभण काळात कालवडीला वार्षिक वेळापत्रकानुसार जंतनिर्मूलन व लसीकरण करून घ्यावे.

२) गाभण कालवडीचे लसीकरण केल्याने निर्माण होणारी रोगप्रतिकारक शक्ती चिकात उतरते. कालवडीचे सुरुवातीचे २१ दिवस विविध आजारांपासून संरक्षण करते.

गाभण कालवडीची काळजी ः

१) गाभण कालवडींना रोज व्यायाम देण्यात यावा, जेणेकरून विण्याची प्रक्रिया सुलभ होईल. कालवडी एकमेकांत मारामारी करणार नाहीत तसेच गाभण कालवडींच्या मागे कुत्रा किंवा इतर प्राणी लागून त्या धावणार नाहीत याची काळजी घ्यावी.

२) गाभण कालवडी घसरड्या जागेवर बांधू नयेत. त्यामुळे घसरून पडून पाय मोडण्याची किंवा खुब्यातून हाड निसटण्याची शक्यता असते.

३) व्यायला झाल्यावर गाभण कालवडीची स्वतंत्र जागेत राहण्याची व्यवस्था करावी. तिच्यावर लक्ष असू द्यावे. विताना कालवडीला त्रास झाला तर पुढे तिच्या दूध उत्पादनात नक्कीच घट झालेली दिसून येते.

४) नैसर्गिक सुलभ प्रसूती होत नसेल तर तज्ज्ञ पशुवैद्यकांकडून वेळेत मदत द्यावी.

अशा प्रकारे उत्तम नियोजन केल्यास कालवड ते गाय हा प्रवास दोन वर्षांच्या आत पूर्ण करणे शक्य आहे. दोन पिढीतील अंतर कमी झाल्याने आपल्या गोठ्यात कमी वेळेत आनुवंशिक सुधारणा घडवून आणून प्रति गाय दूध उत्पादन वाढविणे शक्य होईल आणि दुग्ध व्यवसाय फायदेशीर होईल.

कालवड संगोपनाचे अर्थकारण ः

१) आज परराज्यांतून पाहिलारू व्यायला झालेली कालवड विकत आणायची झाली, तर मोठी किंमत मोजावी लागते. वाहतुकीदरम्यान जनावरे आजारी पडतात, विताना त्रास होतो, प्रवासातून आलेल्या गाई आपल्याकडे व्यवस्थित दूध उत्पादनावर येण्यास वेळ लागतो. कधी कधी संपूर्ण एका वेताच्या दूध उत्पादनाचे नुकसान होऊ शकते.

२) आपल्याच गोठ्यात कालवड तयार केल्यास स्थानिक वातावरणात वाढलेली, प्रवासाचा ताण नसलेल्या गायीला विताना किंवा विल्यावर काही त्रास होत नाही. तिचे योग्य पोषण झाले किंवा नाही याकडे लक्ष देता येते. तिला वातावरणाची व गोठ्यातील कामगारांची सवय असल्याने दूध काढण्यात अडथळा येत नाहीत, कालवडीला सहज दुधावर आणता येतात.

३) कालवड आपल्याच गोठ्यात तयार केल्यास तिची वंशावळ माहिती असते. तिला सुद्धा उत्तम आनुवंशिकतेने लिंग वर्गीकृत रेतमात्रा वापरून आणखी एक उत्तम पिढी आपल्या गोठ्यात तयार होऊ शकते. बाहेरून खरेदी केलेल्या कालवडीच्या आनुवांशिकतेबद्दल खात्री देता येत नाही. तिला कृत्रिम रेतन करताना लिंग वर्गीकृत रेतमात्रा वापरली नसेल, तर नर वासरे जन्माला येऊन आणखीन अधिक नुकसान होऊ शकते.

४) कमी दूध उत्पादन क्षमता असलेल्या किंवा किंवा उच्च आनुवंशिकता आणि दूध उत्पादन क्षमता असलेल्या दोन्ही प्रकारच्या कालवडीचा संगोपन खर्च सारखाच येतो, त्यामुळे कालवडी तयार करण्यासाठी कृत्रिम रेतन करताना उच्च आनुवंशिकता असलेली रेतमात्रा वापरणे फायद्याचे ठरते.

५) कालवडीचे लहान असल्यापासून योग्य संगोपन न झाल्यास, तिची वाढ योग्य प्रकारे होत नाही. ती वेळेवर माजावर येत नाही आणि गाभण राहण्यास उशीर होतो. कालवड गाभण राहण्यास जितका उशीर होईल तितका तिच्या संगोपनावरचा खर्च वाढत जातो.

कालवड संगोपनाचे अर्थकारण

अ.क्र.---बाब ---खर्च (रुपये)

१---दूध (२०० लिटर x३० रु)---६०००

२---मिल्क रिप्लेसर (३०० लिटर x १५रु)---४५००

३---काल्फ स्टार्टर (२२० किलो x ३० रु)---६६००

४---काल्फ ग्रोवर (६६० किलो x २८ रु)---१८४८०

५---हिफर फीड (४२० किलो x २६ रु) ---१०९२०

६---सुका चारा (१००० किलो x ५ रु)---५०००

७---हिरवा चारा (५००० किलो x ३ रु)---१५०००

८---औषधे आणि लसीकरण ---२०००

एकूण ---६८३००/-

अ.क्र.---बाब ---उत्पन्न (रुपये)

१---शेणखत ---६०००

एकूण --- ६०००

६८,३०० (खर्च) - ६,००० (उत्पन्न) = ६२३०० (कालवड संगोपनाचा खर्च)

फायदेशीर दुग्ध व्यवसाय करण्यासाठी प्रत्येक गोष्टीचे अर्थकारण पहिले पाहिजे. एक उत्तम नवजात कालवड ते दुभती गाय या दोन वर्षांच्या प्रवासाला साधारणतः वरील प्रमाणे खर्च येतो, जो नक्कीच बाहेरून गाय विकत आणण्यापेक्षा कमी आहे. कालवड संगोपन शास्त्रीय पद्धतीने केल्यास गोठ्यात उत्तम गाई तयार होतील, तसेच दूध उत्पादनात चांगली वाढ होऊन, एकूणच दुग्ध व्यवसाय फायदेशीर होईल यात शंका नाही. उत्तम कालवड संगोपन करून दुग्ध व्यवसाय फायदेशीर होतो.

डॉ. सचिन रहाणे, ९९७५१७५२०५ (डॉ. रहाणे हे पशुवैद्यकीय दवाखाना, डिंगोरे, जि. पुणे येथे पशुधन विकास अधिकारी आहेत. डॉ. भोसले हे एबी व्हिस्टा कंपनीचे विभागीय विक्री संचालक (दक्षिण आशिया) आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com