
डॉ.सी.एस.मामडे,डॉ.ए.के वानकर,डॉ.एन.एम.मार्कंडेय
मराठवाडी म्हशीचे मूळस्थान हे मराठवाडा विभागात आहे. या म्हशी प्रामुख्याने बीड, परभणी, जालना, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद या भागात कमी अधिक प्रमाणात आढळतात. मराठवाडी म्हशी (Marathwadi buffalo) मध्यम बांधा, कंद कपाळ, लहान मान आणि खांद्यापर्यंत शिंगे असलेल्या आहेत. या म्हशी इतर जातींपेक्षा वेगळ्या आहेत.
त्यांचा रंग राखाडी ते पूर्ण काळा या प्रमाणे बदलत जातो. काही टक्के म्हशींमध्ये समोरच्या आणि मागच्या पायावर तसेच शेपटीच्या खालच्या भागात पांढऱ्या रंगाच्या खुणा आढळतात. मराठवाडी म्हशी स्थानिक तसेच बदलत्या हवामानाशी अतिशय उत्तम प्रकारे जुळवून घेतात. रोगप्रतिकारक क्षमता तुलनेने जास्त आढळते. दुय्यम प्रतीच्या चाऱ्यावर सुद्धा व्यवस्थित वाढतात. त्याचमुळे इतर म्हशींच्या तुलनेत यांना कमी खर्च लागतो.
मराठवाडी म्हशींचे (Marathwadi buffalo) संगोपन प्रामुख्याने लहान किंवा अल्पभूधारक शेतकरी करतात. या म्हशींचे दूध उत्पादन (Milk Production) कमी असल्यामुळे पशुपालक योग्य प्रकारे व्यवस्थापन राखत नाहीत त्यामुळे त्यांची योग्य प्रमाणात वाढ होत नाही.
या म्हशींच्या बाबतीत शेतकऱ्यांमधील निरक्षरता, प्रजनन केंद्राचा अभाव तसेच या जातींच्या संवर्धनासाठी योग्य सरकारी धोरण नसल्यामुळे यामध्ये जलद गतीने सुधारणा होत नाहीत. या जातीच्या संवर्धनासाठी शेतकऱ्यांचा तांत्रिक दृष्टिकोन, पैदासकारांची उपलब्धता आणि योग्य सरकारी धोरण राबविल्यास जातिवंत दुधाळ मराठवाडी म्हशींचे संगोपन करणे शक्य होईल.
मराठवाडी म्हशीची वैशिष्टेः
१) मध्यम आकाराची जात, लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन.
२) स्थानिक वातावरणाशी जुळवून घेणारी तसेच चांगली रोग प्रतिरोधक क्षमता असलेली जात.
३) पौष्टिक पोषणमूल्ययुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या खाद्याचे उच्च दर्जाच्या पशू उत्पादनांमध्ये रूपांतर करण्याची कार्यक्षमता.
४) दुय्यम प्रतीचे खाद्य आणि हवामान बदलात शाश्वत दूध उत्पादन देणारी जात.
५) नर जनावरांचा मांस उत्पादनासाठी स्रोत. मांस निर्यातीला संधी.
६) म्हशींच्या इतर जातींच्या तुलनेत किमान प्रजनन समस्या आणि विकार.
७) भारतीय कृषी संशोधन परिषदेद्वारे मान्यताप्राप्त स्थानिक जात.
संगोपनातील अडचणीः
१) जातिवंत म्हशी, रेड्यांची मर्यादित संख्या.
२) पंढरपुरी आणि नागपुरी जातीसोबत संकर झाल्याने शुद्धता कमी.
३) पैदासकार संघटनेचा अभाव.
४) संपूर्ण प्रदेशात जातीसाठी फक्त एक नोंदणीकृत सरकारी फार्म.
५) संवर्धनासाठी सरकारी धोरणाचा अभाव.
६) जातीच्या प्रसाराकरीता रेतमात्रांची अनुपलब्धता.
७) या म्हशीचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थाची स्थानिक किंवा राष्ट्रीय स्तरावर कमी मागणी.
८) जातिवंत म्हैस,रेड्याची अस्पष्ट नोंदणी, चुकीची नोंदणी पध्दत.
९) प्रजनन दोष असणाऱ्या रेड्यांचा रेतनासाठी वापर.
१०) योग्य व्यवस्थापनाचा अभाव.
११) कत्तलीसाठी साधारणत: ४ ते ६ वेतानंतर विल्हेवाट.
मराठवाडी म्हैस संगोपनातील संधीः
१) अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत म्हणून मध्यमवर्गीय, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त जात.
२) शुध्द आणि उच्च वंशावळीच्या नोंदीची गरज.
३) नियंत्रित प्रजनन धोरणाची आवश्यकता.
४) किमान व्यवस्थापन आवश्यकतांसह जातीचा प्रसार.
५) रोग प्रतिरोधक जातीचा प्रसार.
६) दुधाचा प्रसार, विशेष दूध उत्पादनांचा विकास करणे आवश्यक.
७) कमी खर्चात नफा वाढवण्यासाठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी स्थानिक बाजारपेठेची निर्मिती.
संपर्कः डॉ.सी.एस.मामडे, ९४२३४४३३३५
(पशुशरीररचना शास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.