
किटोसिस किंवा कितनबाधा (ketosis disease) हा आजार विशेषत: जास्त दूध देणाऱ्या गाई, म्हशींमध्ये आढळून येतो. गाय-म्हशी व्यायल्यानंतर पहिल्या २ ते ३ महिन्यांत हा आजार उद्भवतो. यामध्ये जनावर सहसा मृत्यूमुखी पडत नाही. परंतु दूध उत्पादनात (Milk Production) जवळपास २५ ते ३० टक्के घट येते. परिणामी, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. योग्यवेळी आहार व्यवस्थापनात बदल केल्यास किटोसिस आजार टाळता येतो. जनावर विल्यानंतर त्याच्या शरीरावर अधिक दुग्धोत्पादनाचा ताण असतो. या काळात असमतोल आहार मिळाल्यास किटोसिस उद्भवण्याची शक्यता असते. जनावरांना किटोसिस आजार कसा होतो आणि त्याची कारणे काय आहेत याविषय़ी पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर येथील डॉ. प्रफुल्लकुमार पाटील यांनी दिलेली माहिती पाहुया.
किटोसिस आजार कसा होतो?
गाभण काळात गाईला योग्य आहार न दिल्यास, तसेच गाय विल्यानंतर कर्बोदकांच्या कमतरतेमुळे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी होते. गरजेपुरती ऊर्जा तयार होत नाही. त्यामुळे चरबीपासून ऊर्जा मिळविण्याचा प्रयत्न गाईच्या शरीराकडून होतो. यामध्ये चरबी फॅटी ॲसिडच्या स्वरूपात यकृतात आणली जाऊन त्यापासून ॲसिटेट तयार होते. आवश्यक ती ऊर्जा तयार केली जाते. परंतु प्रोपिओनेटची खूपच कमतरता झाल्यास ॲसिटेटपासून किटोन बॉडीज तयार होतात, त्यांचे रक्तातील प्रमाण वाढते. त्यामुळे आम्लता वाढून किटोसिस आजाराची लक्षणे दिसतात.
किटोसिस आजार होण्याची कारणे काय आहेत?
आहारात पिष्टमय पदार्थांची कमतरता असणे.वाढत्या दूध उत्पादनामुळे आहारातून पुरवठा केल्या जाणाऱ्या कर्बोदकांच्या तुलनेत गरज वाढल्यामुळे.आहारात जास्त प्रथिनयुक्त घटक म्हणजेच शेंगदाणा / सरकी पेंड चा वापर जास्त प्रमाणात केल्यामुळे. आहारात मुरघास अधिक प्रमाणात दिल्यामुळेही जनावरांना किटोसिस होतो. जनावर वितेवेळी अति लठ्ठ असणे.आहारात स्फुरद व कोबाल्ट इत्यादी क्षारांची किंवा जीवनसत्त्व ‘ब’ची कमतरता निर्माण झाल्यामुळेजनावरांना व्यायाम न मिळणे आणि अतिथंड वातावरणात बांधून ठेवणे. कमी आहार दिल्यामुळे जनावरांमध्ये दुय्यम स्वरुपाची कितनबाधा दिसून येते. त्याच प्रमाणे वार अडकणे, गर्भाशयदाह, फुफ्फुसदाह, थायलेरीओसिस, पोटात खिळा किंवा तार असणे, अपचन, यकृताचे आजार, कासदाह यांसारख्या आजारातही दुय्यम स्वरूपाची कितनबाधा आढळून येते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.