खरीपात बहुवार्षिक संकरित नेपिअरची लागवड कशी करावी ?

संकरित नेपिअर हे उंच वाढणारे बहुवार्षिक चारा पिक आहे. याचे खोड बाजरीच्या खोडासारखे असते कारण संकरित नेपिअर हे आफ्रिकन बाजरी आणि नेपियर गवताचे संकर आहे. संकरित नेपिअर गवताची लागवड एकदा केल्यानंतर तीन वर्षापर्यंत त्याच्यापासून उत्पादन घेता येते.
खरीपात बहुवार्षिक संकरित नेपिअरची लागवड कशी करावी ?

हे पिक साधारणपणे २ ते ३ मीटर उंचीपर्यंत वाढते. त्यामुळे संकरित नेपिअरलाच (Hybrid Nepiyar) गजराज म्हणजे हत्तीगवत असे म्हंटले जाते. जमिनीलगत खोडाच्याभोवती पहिल्या वर्षापासून फुटवे फुटण्यास सुरुवात होते. वर्षभरामध्ये फुटव्याची संख्या ३० ते ४० पर्यंत जाते. संकरित नेपिअरचे क्षेत्र वाढवायचे झाल्यास या फुटव्यांचा वापर केला जातो. या चाऱ्यात प्रथिनांचे (protein) प्रमाण ९ ते ११ टक्क्यापर्यंत आढळून येते.

संकरित नेपिअरच्या लागवडीसाठी तापमान २५ अंश सेल्सिअसच्या वर असणे गरजेचं आहे. थंडीच्या दिवसात या पिकाला फुटवे फुटण्याचे प्रमाण कमी असते. संकरित नेपिअरचे उत्पादन शेतकरी कोणत्याही प्रकारच्या जमिनीत (soil) घेऊ शकतात. पण पाण्याचा निचरा होणाऱ्या भारी जमिनीत चांगले उत्पादन मिळते. जास्त पावसाच्या प्रदेशातदेखील हे पिक उत्तम प्रकारे तग धरून राहते.

खरीपात बहुवार्षिक संकरित नेपिअरची लागवड कशी करावी ?
मका लागवड कशी करावी?

पिकाची लागवड करण्यापूर्वी जमिनीची खोलवर मशागत केली पाहिजे. वखरणीच्या सहाय्याने शेतातील ढेकळे फोडून घेतली पाहिजेत. लागवडीपूर्वी जमीन खोलवर भुसभुशीत करून घ्यावी. जास्त उत्पादनासाठी एन. बी.-२१, बी. एन.-६, यशवंत या सुधारित वाणांचा वापर करावा. एक हेक्टर क्षेत्रासाठी १०,००० ते १२,००० ठोब्यांची गरज असते. या पिकाची लागवड मार्च ते जुलै दरम्यान कधीही करू शकता. मात्र लागवड करताना जमीन ओली असणे गरजेचं आहे. लागवड करताना साधारणपणे दोन ओळीतील आणि थोब्यातील अंतर ९०× ९० सेमी असले पाहिजे. जमीन भारी असल्यास हे अंतर वाढवून १ × १ मीटर अंतरावर लागवड करावी.

खरीपात बहुवार्षिक संकरित नेपिअरची लागवड कशी करावी ?
खरिपात करा या चारापिकांची लागवड

चाऱ्याचे उत्पादन घेताना लागवडीच्या वेळी काही प्रमाणात नत्रयुक्त खतांची मात्रा द्यावी. प्रत्येक कापणीनंतर २५ किलो नत्राची मात्रा द्यावी. प्रत्येक कापणीनंतर नत्रयुक्त खत आणि सेंद्रिय खताची मात्रा आलटून पालटून द्यावी. जमिनीचा प्रकार आणि हवामानानुसार पाण्याच्या पाळ्या ठरवाव्यात. सर्वसाधारणपणे १० ते १५ दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

कोणत्याही बहुवार्षिक चारा पिकाची वाढ पहिली कापणी होईपर्यंत वाढ संथ गतीने होत असते. लागवडीनंतरची पहिली कापणी दीड ते दोन महिन्यांनी करावी लागते. जेव्हा पिकाची उंची दीड ते दोन मीटर झालेली असते. संकरित नेपियर हे बहुवार्षिक पिक असल्याने पहिल्या कापणीनंतरच्या पुढील कापण्या पाच ते सहा आठवड्याच्या अंतराने करत राहाव्यात. असे केल्याने पिकाची वाढ जोमाने होण्यास मदत होईल. पहिल्या कापणीतून मिळणारे चाऱ्याचे उत्पादन कमी असते. मात्र त्यापुढील कापण्यामध्ये उत्पादन वाढत जाते. बहुवार्षिक संकरित नेपिअरपासून वर्षभरात साधारणपणे १० ते ११ कापण्या घेतल्या जाऊ शकतात. वर्षभरामध्ये २५० ते ३०० टन चाऱ्याचे उत्पादन मिळते. अतिरिक्त चाऱ्याचा मुरघास बनवून तो चारा टंचाईच्या काळात वापरता येऊ शकतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com