
गोठ्यामध्ये किंवा जनावरे बांधण्याच्या ठिकाणी जास्त ओलावा असल्यास, जनावरांमध्ये अनेक प्रकारचे संसर्गजन्य आणि खुरांचे आजार बळावतात. खुरांमध्ये जखमा होऊन, त्यात आसडी पडते. पावसाळ्यात जनावरांना घटसर्प, फऱ्या, लाळ्या - खुरकुत यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. पावसाळ्याच्या सुरुवातीला उगवणारे हिरवे, कोवळे गवत जनावरांनी मोठ्या प्रमाणात खाल्ल्याने त्यांना पोटफुगी, अपचन यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव होतो. हे आजार टाळण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापिठाने सांगीतलेली लक्षणे ओळखून उपाययोजना कराव्यात .
काळपुळी
लक्षणे ः
कान, तोंड, योनी मार्ग व गुदद्वार यातून रक्तस्राव होतो. जनावर एकाएकी आजारी पडते. खाणे, पिणे, रवंथ करणे बंद होते. या रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्यास लस टोचून घ्यावी.
फऱ्या
एकाएकी ताप येतो मागचा पाय लंगडतो. मांसल भागाला सूज येते. दाबल्यास चरचर आवाज येतो. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला जनावरांना प्रतिबंधात्मक लस टोचून घ्यावी.
घटसर्प
जनावर अचानक अजारी पडते. खाणे, पिणे बंद होते. अंगात ताप भरतो. गळ्याला सूज येते. डोळे खोल जातात. डोळ्यातून पाणी गळते. घशाची घरघर सुरू होते. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी निरोगी जनावरांना लस टोचून घ्यावी.
कासदाह
सडाला तसेच कासेला सूज येते. दूध अतिपातळ, रक्त अगर पुमिश्रित येते. जनावर कासेला हात लावू देत नाही. दूध काढण्यापूर्वी जंतुनाशकाच्या द्रावणाने कास धुवावी. अधून मधून कासदाह रोगासाठी दुधाची तपासणी करून घ्यावी. गाई किंवा म्हशी आटवण्याच्या शेवटच्या दिवशी सडात अँटिबायोटिक्स ट्यूब सोडाव्यात.
बुळकांड्या
जनावराला ताप येतो. खाणे बंद होते. सुरुवातीला बद्धकोष्टता व नंतर दुर्गंधीयुक्त जुलाब होतात. लाळ गळते. डोळे खोल जातात व आठ ते दहा दिवसात जनावर दगावते. सर्व निरोगी जनावरांना दोन वर्षातून एकदा पावसाळ्यापूर्वी प्रतिबंधात्मक लस टोचून घ्यावी.
लाळ खुरकूत
तोंडातून लाळ गळते. जनावर खाणे, पिणे आणि रवंथ करणे मंदावते. जिभेला चट्टे पडतात. पायाच्या खुरात जखमा होतात. जनावर लंगडते. सर्व निरोगी जनावरांना लाळ खुरकूत रोगाची प्रतिबंधक लस वर्षातून दोन वेळा टोचावी.
पोट फुगणे
जनावराची डावी कुस फुगते. जनावर बेचैन होते. खाणे, रवंथ करणे बंद करते. जनावर सारखे उठवस करते. पावसाळ्यात व थंडीत ओला व कोवळा चारा अती प्रमाणात देऊ नये.
थायलेरिओसिस
जनावरांना सतत एक दोन आठवडे ताप येतो. जनावर खंगत जाते. अंबोन किंवा खुराक खात नाही. घट्ट जुलाब होतात. इलाज न झाल्यास मृत्यू येतो. गोचीड माशा वगैरे मुळे या रोगाचा प्रसार होतो. म्हणून गोठे स्वच्छ ठेवावेत. जनावरांच्या अंगावर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने गोचीड प्रतिबंधक पावडर लावावी.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.