Animal Diet : पशू आहारात फॉस्फरसचे महत्त्व

आहारात फॉस्फरसची कमतरता असल्यास भूक कमी होणे, रक्त कमी होणे, कमी वाढ आणि पाइका यांसारखी लक्षणे दिसतात. जनावरांच्या शरीरातील जैव रासायनिक क्रियांमध्ये फॉस्फरस सहकारी घटक आहे. पुनरुत्पादन, गर्भधारणा आणि दूध उत्पादनासाठी फॉस्फरसची आवश्यकता असते.
Animal Diet
Animal Diet Agrowon

डॉ. आर. बी. अंबादे, डॉ. पी. पी. घोरपडे

जनावरांच्या शरीरात सुमारे ८० टक्के फॉस्फरस सापडतो. त्याची प्रमुख भूमिका शरीरातील हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी आहे. उर्वरित २० टक्के फॉस्फरस हा संपूर्ण शरीरात प्रथिने, चरबी आणि अजैविक क्षारांचे संयोजनाद्वारे मोठ्या प्रमाणात वितरित केला जातो. फॉस्फरस हा सर्व जनावरांसाठी आवश्यक पोषक घटक आहे. फॉस्फरसची कमतरता ही सर्व खनिजांमध्ये सर्वात जास्त व्यापक असून, त्याच्या कमतरतेमुळे जनावरांवर विपरीत परिणाम होतो. जनावरांचा संतुलित आहार (Balanced Animal Diet) आणि पुरेशा वाढीसाठी जीवनसत्त्व ड, कॅल्शिअमसह फॉस्फरस हे घटक असणे आवश्यक आहे. पुनरुत्पादन, गर्भधारणा आणि दूध उत्पादनासाठी (Milk Production) फॉस्फरसची आवश्यकता असते.

Animal Diet
Poultry Feed : संतुलित कोंबडी खाद्य निर्मितीचे तंत्र

फॉस्फरसची गरज ः

१) जनावरांच्या शरीरातील चयापचय क्रियेमध्ये फॉस्फरस आणि कॅल्शिअम यांचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे.

२) पशू आहारात पुरेसे कॅल्शिअम आणि फॉस्फरस यांचे पोषण तीन घटकांवर अवलंबून आहे, जसे की कॅल्शिअम व फॉस्फरस यांचा पुरेसा पुरवठा, त्यांच्या दरम्यान योग्य गुणोत्तर आणि जीवनसत्त्व ‘ड’ची उपस्थिती.

३) कॅल्शिअम आणि फॉस्फरस हे घटक जनावरांच्या शरीरात एकमेकांशी २:१ किंवा १:१ या गुणोत्तराचे संबंधित आहेत.

४) पशू आहारात कॅल्शिअम आणि फॉस्फरसचा पुरवठा गाई - म्हशीच्या दूधवाढीसाठी आवश्यक आहे.

५) आहारात फॉस्फरसची कमतरता असल्यास भूक कमी होणे, रक्त कमी होणे, कमी

वाढीचा दर, आणि पाइका यासारखी सुरुवातीची लक्षणे आढळून दिसतात.

६) खाद्यात फॉस्फरसची गंभीर कमतरता आढळल्यास, दुधाचे उत्पादन कमी होते आणि खाद्य वापरण्याची कार्यक्षमता वाढते. दीर्घकालीन फॉस्फरसची कमतरता निर्माण झाल्यास हाडे ठिसूळ होणे, लंगडेपणा आणि ताठ सांधे होणे इत्यादी लक्षणे आढळून येतात.

Animal Diet
Animal Care : पशुआहारात कॅल्शिअम महत्त्वाचे...

फॉस्फरसचे कार्य :

१) जनावरांच्या स्केलेटल टिश्यूचा विकास आणि देखभाल: जनावरांच्या शरीरात फॉस्फरसचे सर्वांत मोठे प्रमाण सांगाड्याची देखभालीसाठी आवश्यक आहे.

२) पशू आहारात कॅल्शिअम आणि फॉस्फरस हे खाद्याचे शोषण आणि सोडण्याची सतत प्रक्रिया पार पाडतात. जनावरांच्या गर्भधारणेदरम्यान आणि दूध निर्मिती दरम्यान महत्त्वाचे कार्य होते.

३) फॉस्फरस हे जनावरांच्या शरीरातील ऑस्मोटिक प्रेशर आणि आम्ल - अल्कली संतुलन राखते, ऑस्मोटिक प्रेशर राखते, बफर क्षमता राखण्याचे कार्य होते.

४) फॉस्फरस जनावरांच्या शरीरातील ऊर्जा नियमनात महत्त्वाची भूमिका बजावते. एटीपी (एडिनोसीन ट्रायफॉस्फेट) सारखे काही फॉस्फेट हे सार्वत्रिक संचयक आणि ऊर्जेचे दाता आहेत, ते शरीराच्या सर्व पेशींमध्ये असते. ऊर्जेची साठवण आणि त्याचा उपयोग दोन्ही सुनिश्‍चित करतात. एटीपीला स्नायूंच्या क्रियाकलापांमध्ये मुख्य महत्त्व आहे, ज्या दरम्यान रासायनिक ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर होते.

५) फॉस्फरस हे खनिज प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, सर्व प्रमुख शारीरिक कार्यामध्ये गुंतलेले असते. फॉस्फोरिलेशन हे आतड्यातील शोषण, ग्लायकोलिसिस आणि कर्बोदकांमध्ये थेट ऑक्सिडेशन, रीनल उत्सर्जन, लिपिड्सचे वाहतूक, अमिनो ॲसिडची देवाणघेवाण इत्यादीसाठी जबाबदार आहे.

६) फॉस्फरस हे खनिज प्राण्यांच्या शरीरामध्ये प्रथिने संश्‍लेषण, फॅटी ॲसिडची वाहतूक, अमिनो ॲसिड विनिमयाचे महत्त्वाचे कार्य करते.

७) जनावरांच्या शरीरातील जैव रासायनिक क्रियांमध्ये फॉस्फरस सहकारी घटक आहे.

फॉस्फरसच्या कमतरतेचा परिणाम :

१) जनावरांच्या शरीराची वाढ आणि पेशी भिन्नतेसाठी आवश्यक असते. फॉस्फरस न्यूक्लिक अॅसिडच्या संरचनेचा भाग बनतो, जे आनुवंशिक माहितीचे वाहक असतात. प्रथिने जैवसंश्लेषण आणि प्रतिकारशक्तीचे नियमन करतात.

२) जनावरांच्या शरीरात सर्वसाधारणपणे फॉस्फरसचे प्रमाण ४.६४ ते ६.५५ मिलिग्रॅम /डेसिलिटर इतके असते.

३) फॉस्फरस हे जनावरांची भूक नियंत्रण करते, खाद्य वापराची कार्यक्षमता वाढवते. गाई, म्हशींची प्रजनन क्षमता वाढवते.

३) रक्तातील फॉस्फरसच्या वाढणाऱ्या पातळीला हायपरफॉस्फेटमिया असे म्हणतात. यामुळे मूत्रपिंड निकामी होते. हायपो-पॅराथायरॉईडीझम आणि जास्त प्रमाणात जीवनसत्त्व ड घेणे सुद्धा हायपरफॉस्फेटमिया यांसारख्या मूत्रपिंडाच्या आजारांसाठी कारणीभूत ठरते..

४) अति कमतरतेमुळे लहान जनावरांत मुडदूस आणि प्रौढ जनावरांत ऑस्टियोमॅलेशिया हे आजार दिसून येतात. यामध्ये जनावरांचे वजन कमी होणे, सांधे कडक होणे आणि स्नायू कमकुवत होणे यांचा समावेश होतो.

५) फॉस्फरसच्या कमतरतेमुळे हाडांच्या वाढ खुंटलेल्या आणि तुटलेल्या हाडांसह हाडांची खराब निर्मित होते.

फॉस्फरसच्या कमतरतेचे (हायपोफॉस्फटेमिया) निदान :

१) पशू तज्ज्ञ जनावरांची शारीरिक हालचाल बघून रोग निदान करतो.

२) रक्तातील जैवरासायनिक विश्लेषणाद्वारे हायपोफॉस्फेटमियाचे सहज निदान केले जाते; रक्तातील फॉस्फरसची मात्रा साधारणपणे ४.६४ ते ६.५५ मिलिग्रॅम /डेसिलिटर इतके असते. जर ही फॉस्फरसची मात्रा ४. ६४ मिलिग्रॅम /डेसिलिटरपेक्षा कमी आढळून आली तर जनावराला हायपोफॉस्फटेमिया हा आजार झाला असे समजावे.

उपचार :

१) जनावरांमध्ये फॉस्फरसची कमी होणे आणि हायपोफॉस्फेटमिया नियंत्रणासाठी पुरेशा प्रमाणात फॉस्फरस सामग्रीसह पुरेसा आहार देऊन सर्वांत प्रभावी उपचार केला जाऊ शकतो.

२) पशू आहारात हिरवा द्विदल डाळ वर्गीय चार मुबलक प्रमाणात द्यावा.

३) पशू वैद्यकाच्या सल्ल्याने पूरक खनिज मिश्रण असलेले पशुखाद्य द्यावे जसे : बाय कॅल्शिअम फॉस्फेट ५० ग्रॅम /दिन

४) पशुतज्ज्ञाच्या सल्ल्याने पूरक खनिज मिश्रण असलेले पशुखाद्य द्यावे.

५) पशुतज्ज्ञाच्या सल्ल्याने शिफारशीत इंजेक्शन शिरेद्वारे द्यावे.

६) रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये विशेषतः दुधाळ गाई, म्हशीमध्ये २५ ग्रॅम ते ५० ग्रॅम कॅल्शिअम

- फॉस्फरस क्षार मिश्रण द्यावे.

७) गाई, म्हशीच्या गाभण काळाच्या शेवटच्या १ ते २ आठवड्यांत कमी फॉस्फरस युक्त आहार द्यावा.

८) जनावरांना नियमित व्यायाम होईल याची काळजी घ्यावी.

फॉस्फरसचे दुष्परिणाम टाळण्यासाठी उपाय :

१) फॉस्फरस युक्त द्रावणामध्ये कचरा, बुरशीजन्य वाढ नसावी.

२) फॉस्फरसच्या द्रावणाची बाटली जनावराच्या शरीर तापमानाबरोबर गरम असावी.

३) फॉस्फरसचे इंजेक्शन पशुतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार योग्य प्रमाणात द्यावे.

४) फॉस्फरसची अति मात्रा देणे टाळावे.

५) फॉस्फरसचे इंजेक्शन शिरेतून देतेवेळी जनावर शांत उभे राहील याची काळजी घ्यावी.

६) विनाकारण वारंवार फॉस्फरसचे इंजेक्शन देणे टाळावे.

--------------------------------------------------------

- डॉ. आर. बी. अंबादे, ८३५५९४२५४ ६

(पशू जीवरसायन शास्त्र विभाग, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परेल, मुंबई येथे कार्यरत आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com