
शेतकरी ः
जितेंद्र दत्तात्रय पाटे
गाव ः नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे
एकूण देशी गायी ः २१
चारा पिके ः अडीच एकर
पुणे जिल्ह्यातील पाटे खैरे मळा, नारायणगाव (जि. जुन्नर) येथील जितेंद्र दत्तात्रय पाटे यांनी आवड आणि देशी गोवंश संवर्धन (Desi Cow Farming) या विचारातून एका खिलार गायीपासून (Khilar Cow) सुरू केलेले देशी गोवंश संगोपन (Cow Farming) आज २१ गायीपर्यंत पोहोचले आहे. गोसंगोपनातून दूध, तुपाच्या उत्पादनासह उपलब्ध शेणापासून गोवऱ्यांची निर्मिती करून विक्री केली जाते. या देशी गोवंश उत्पादनांना (Milk Production) ग्राहकांकडूनही चांगली मागणी असते. त्यामुळे अतिरिक्त उत्पन्नाचा शाश्वत स्रोत त्यांना उपलब्ध झाला आहे.
जितेंद्र यांनी ६ वर्षांपूर्वी एका खिलार गायीपासून देशी गोवंश संगोपनास सुरुवात केली. सध्या गोठ्यामध्ये लहान मोठ्या मिळून सुमारे २१ गायी आहेत. त्यात गीर ८, साहिवाल ५, खिलार १ आणि हरियानवी १आणि उर्वरित वासरांचा समावेश आहे. गायीसाठी मुक्त आणि बंदिस्त अशा दोन्ही गोठ्यांची उभारणी केली आहे. साधारण ३० बाय ३२ चौरस फुटांचा बंदिस्त गोठा, तर तेवढ्याच आकाराचा मुक्त गोठा उभारला आहे. सध्या तीन गायींपासून दैनंदिन २५ ते ३० लिटर दूध संकलन सुरू आहे.
...असे आहे व्यवस्थापन
दररोज सकाळी साडेपाच वाजता गोठ्यातील कामांना सुरुवात होते.
साडेपाच ते आठ या दरम्यान गोठा स्वच्छ करणे, दूध काढणे, चारा देणे इत्यादी कामे केली जातात.
साधारण ८ वाजता गायींना बंदिस्त गोठ्यातून मुक्त संचार गोठ्यात सोडले जाते.
दिवसभर गायी मुक्त संचार गोठ्यातच ठेवल्या जातात. तेथे त्यांना चारा आणि पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे.
सायंकाळी ५ वाजता गायी पुन्हा बंदिस्त गोठ्यात आणून त्यांना चारा आणि पाणी दिले जाते. बंदिस्त गोठ्यामध्ये प्रत्येक गायींना खाद्यासाठी स्वतंत्र केली आहे.
सायंकाळी सात वाजता पुन्हा दूध काढले जाते.
खाद्य व्यवस्थापन
गायींसाठी संपूर्ण अडीच एकरांमध्ये चारा पिकांची लागवड केली आहे. त्यात नेपिअर, मका, ज्वारी, बाजरी इत्यादी पिकांची लागवड केली आहे. यासह खनिज मिश्रणे, गोळी पेंड आणि पशुखाद्य दिले जाते.
ओल्या चाऱ्यामध्ये नेपिअर, ज्वारी, मका तर सुक्या चाऱ्यामध्ये सोयाबीन भुस्सा, भाताचा पेंढा यांची कुट्टी करून दिली जाते. गायींना वयानुसार प्रतिदिन साधारण १५ ते २० किलो चारा दिला जातो.
देशी गोवंश उत्पादनांना मागणी
दूध विक्री
देशी गायींच्या दुधाला लहान मुलांसाठी चांगली मागणी असते. त्यामुळे निवडक आणि ठरलेले ग्राहक मागणीनुसार दररोज दूध खरेदी करतात. प्रतिलिटर दुधाला साधारण ७० रुपये दर मिळतो. दिवसाला ३० लिटर दूध विक्रीतून साधारण २ हजार १०० रुपयांचे उत्पन्न मिळते.
देशी तूप निर्मिती
सध्या केवळ तीनच गायींपासून दूध उत्पादन सुरू आहे. प्रतिदिन साधारण २५ ते ३० लिटर दूध संकलन होत आहे. जास्त गायी दुधावर असल्यानंतर दररोज ४० लिटरपर्यंत दूध उत्पादन मिळते.
त्यावेळी दूध विक्री करून शिल्लक राहिलेल्या दुधाचे तूप तयार केले जाते. महिनाभरात साधारण ३ ते ४ किलो तूप तयार होते. देशी गायींचे तूप
असल्यामुळे दरही चांगला मिळतो. सध्या प्रति किलो तुपाला अडीच हजार रुपयांपर्यंत दर मिळतो आहे.
गोवऱ्यांची देखील विक्री
दररोज उपलब्ध होणाऱ्या शेणापासून गोवऱ्या तयार केल्या जातात. देशी गोवंशाच्या शेणापासून बनलेल्या गोवऱ्यांची चांगली मागणी असते. वर्षभरात साधारण १० हजार गोवऱ्यांची निर्मिती होते. विक्रीसाठी गोवऱ्यांची पॅकिंग केली जाते. साधारण १६ गोवऱ्यांची पॅकिंग २५ रुपये आणि ३६ गोवऱ्यांची पॅकिंग ५० रुपये दराने विक्री होते. वर्षभरात गोवऱ्यांच्या विक्रीतून साधारण ५० हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त उत्पन्न मिळत असल्याचे पाटे सांगतात.
औषधोपचारावर नगण्य खर्च
यशस्वी दुग्धोत्पादनासाठी गायींचे आरोग्य उत्तम असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी दैनंदिन संतुलित आहार, गोठ्याची स्वच्छता आणि मुक्त संचार पद्धतीवर लक्ष केंद्रित केले जाते. त्यामुळे गायी आजारी पडण्याचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. ग्राहकांकडून देशी गायींचे दूध प्रामुख्याने लहान मुलांना पिण्यासाठी विकत घेतले जाते. ग्राहकांकडून निर्भेळ दुधाची मागणी होत असल्याने गायींवर अत्यंत कमी प्रमाणात औषधोपचार केले जातात. त्याऐवजी आयुर्वेदिक उपचारांवर भर दिला जातो, असे पाटे यांनी सांगितले.
मजुरांविना गोठा व्यवस्थापन
एकवीस गायींच्या गोठ्याच्या व्यवस्थापनासाठी एकही मजूर लावलेला नाही. गोठ्यातील सर्व कामांमध्ये आई कुसुम आणि पत्नी निवेदिता यांची मोलाची मदत मिळते. त्यामुळे मजुरीवरील खर्चात बचत होत असून, तेच उत्पन्नवाढीसाठी फायदेशीर ठरत असल्याचे जितेंद्र पाटे सांगतात.
- जितेंद्र पाटे, ८९९९०९२४३९
(शब्दांकन ः गणेश कोरे)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.