
नगर ः लम्पी स्कीनची बाधा (Lumpy Skin) सुरु झाल्यानंतर त्याचा वाढता वेग पाहून प्रशासनाने जिल्ह्यातील जनावरांचे बाजार बंद (Livestock Market) केले. तीन महिन्यांपासून बाजार बंद असल्याचा मोठा फटका दूध उत्पादकांना (Milk Producer) बसला आहे. नगर जिल्ह्यातील जनावरांचे बाजार बंद असल्याने तीन महिन्यांत सुमारे ३५० कोटींपेक्षा अधिक रकमेची उलाढाल थांबली, शिवाय स्थानिकांचा रोजगारही (Employment) बुडाला आहे. बाजार व वाहतूक बंद असल्याने जनावरांच्या दरातही सुमारे ३० टक्क्यांनी घट झाली आहे.
नगर जिल्ह्यात लोणी (ता. राहाता), काष्टी (ता. श्रीगोंदा) हे बाजार गाईंसाठी प्रसिद्ध आहेत. घोडेगाव (ता. नेवासा) येथे गाई-म्हशींची खरेदी-विक्री होत असली तरी हा बाजार म्हशींसाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय वाळकी, राशीन, जामखेड, शेवगाव, कोपरगाव, संगमनेर, अकोले, पाथर्डी, श्रीरामपूर या ठिकाणच्या बाजारात काही प्रमाणात जनावरांचे व्यवहार होतात.
महाराष्ट्र व शेजारच्या राज्यातून या बाजाराच्या ठिकाणी व्यापारी खरेदीसाठी येतात. त्यामुळे स्थानिक पातळीवरील शेतकऱ्यांच्या जनावरांना चांगला दर मिळतो. लोणी, काष्टी आणि घोडेगावच्या बाजारातच दर महिन्याला सुमारे पंधरा ते सतरा हजार जनावरांची खरेदी-विक्री होते. ही खरेदी-विक्री ठप्प आहे. जिल्ह्यात पंधरा लाख १० हजार जनावरांना लसीकरण केले. मात्र तरीही लम्पी स्कीनची बाधा होण्याचे प्रमाण थांबत नाही.
गाईंचे दर घटले
राज्यात गेल्या महिनाभरापासून दूध उत्पादकांना चांगले दिवस येत आहेत. दुधाच्या दरात वाढ होत असली तरी लम्पी स्कीनमुळे या व्यवसायावर गंभीर परिणाम झाला आहे. आजार आणि त्यात बाजार बंदीमुळे खरेदी-विक्रीत शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. आपसूकच गाईंचे दर पडले आहेत. ८० हजार ते एक लाख रुपये किमतीची दुभती गाय ५५ ते ६० हजाराला खरेदी करावी लागत आहे. म्हशीच्या दरातही २० टक्के घट झाली आहे.
बाजार बंदचे परिणाम
- प्रत्येक बाजारावर अवलंबून १०० ते २०० स्थानिक कुटुंबांचा रोजगार बुडाला
- वाहतूक बंदीने सुमारे १० हजार वाहन चालकांचे नुकसान
- बाजार समित्यांना करातून मिळणाऱ्या दीड ते दोन कोटींचे नुकसान
- एक हजार चारा विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान
- गाईंची खरेदी न करता आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.