Poultry Disease : कोंबड्यातील मुख्य जीवाणूजन्य आजार

कोंबडीपालन व्यवसाय फायदेशीर ठेवण्यासाठी आजाराचे निदान योग्य वेळी व अचूक होणे गरजेचे असते. शेडमध्ये जिवाणूंचा प्रादुर्भाव झाल्यास त्यांचा संसर्ग होऊन मरतूकीचे प्रमाण वाढते. हे लक्षात घेऊन कोंबड्यांचे योग्य व्यवस्थापन ठेवावे.
Poultry
Poultry Agrowon

डॉ.आर.सी.कुलकर्णी, डॉ. के.वाय.देशपांडे, डॉ.आकाश मोरे

Bacterial Diseases In Chickens : कोंबड्यांना जिवाणूंपासून होणारे बरेचसे आजार (Poultry Disease) हे व्यवस्थापनातील (Poultry Management) दोषामुळे होत असतात. उदा. पिल्लांना ऊब देताना झालेली चूक, गादी ओली असणे, सडलेल्या धान्याचा खाद्यात वापर कुक्कुटपालनात (Poultry Farming) आजार नियंत्रणामध्ये जैवसुरक्षा महत्त्वाची बाब आहे.

प्रादुर्भावाची लक्षणे ः

१) कोंबड्या खाद्य कमी खातात

२) अंडी उत्पादन (Egg Production) कमी होते

३) मरतुकीचे प्रमाण वाढते, कोंबड्या मलूल पडतात.

४) श्वास घेण्यास त्रास होतो, रात्रीच्यावेळी कोंबड्या खोकतात.

आजार पसरण्याची प्रमुख कारणे :

१) कोंबड्याचे शेड अस्वच्छ असल्यास जंतूंचे प्रमाण जास्त असते. मागील बॅचमधील आजार पुन्हा होण्याची शक्यता अधिक असते.

१) कोंबड्यांना अपुरी जागा दिल्यास , गर्दीमुळे शुद्ध हवेचा पुरवठा व्यवस्थित न झाल्यास

२) विष्ठा व सांडपाणी यांचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन न केल्यास

३) संतुलित खाद्य नसल्यास, २४ तास ताजे, स्वच्छ पाणी न मिळाल्यास

४) हवामानातील बदलांचा परिणाम.

Poultry
Poultry Feed Management : लेअर कोंबड्यांचे आहार व्यवस्थापन

पुलोरम आजार (पांढरी हगवण) :

१) ‘सालमोनेला पुलोरम' जिवाणूंमुळे होतो. लहान कोंबड्यांमध्ये आजाराचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो.

२) आजारात मृत्यूचे प्रमाण कमी असते, परंतु आजारी कोंबडीच्या अंड्यातून तयार होणाऱ्या पिलांना हा आजार होण्याची शक्यता अधिक असते.

प्रसार:

१) रोगजंतू असलेल्या अंड्यापासून मुख्यत्वे प्रसार होतो. शरीरात रोगजंतू असलेल्या मादीच्या अंड्याच्या १० टक्के अंड्यामध्ये रोगजंतू येतात.

२) आजारातून बऱ्या झालेल्या कोंबडीच्या शरीरात हे रोगजंतू कायमचे राहतात. त्याचप्रमाणे अंडी उबवणूक यंत्रामध्ये रोगजंतू असतील तर याचा प्रसार होतो. अशा यंत्रामधून जन्मलेल्या पिलांना एका महिन्यात प्रादुर्भाव होतो. ३) मोठ्या कोंबड्यांपासून लहान कोंबड्यांना आहार होतो.

४) दूषित पाणी आणि खाद्यापासून प्रसार होतो. या व्यतिरिक्त बाधित चपला, कपडे, माशा, उपकरणेसुद्धा प्रसारास कारणीभूत ठरतात.

Poultry
Chicken : चिकनसाठी कोंबडी मागा दीड ते दोन किलो वजनाचीच!

लहान पिल्लांमधील लक्षणे ः

१) अंड्यातून बाहेर पडलेली पिल्ले कोणतेही लक्षणे न दाखविता अचानक मरण पावतात.अशी मरतुक महिनाभर व त्याहून अधिक काळ दिसून येते.

२) मृत्यूचे प्रमाण २० ते ८० टक्क्यांपर्यंत असते, पिसे राठ होतात, पंख गेल्यासारखे दिसतात.

३) पिल्ले एका जागी जखडून बसतात, हालचाल मंदावते, खाद्य खाणे कमी किंवा बंद होते.

४) पातळ चिकट पांढरी संडास करतात.गुद्दद्वारास पिसे चिकटून बसतात. काही वेळेस तपकिरी रंगाची विष्ठा दिसून येते.

५) पिल्लांचे पोट मोठे होते. पिल्लांच्या तोंडातून विशिष्ट प्रकारचा आवाज येतो. ३ ते ८ आठवडे वयाची पिल्ले लंगडतात.

Poultry
Poultry Feed : वयानुसार कोंबड्यांना खाद्य कस द्यायच?

मोठ्या कोंबड्यांमधील लक्षणे ः

१) वजन घटते, सजीव अंड्याचे प्रमाण कमी होते.

२) पंख ढिले होतात,मान झुरलेली दिसून येते.

३) काही आजारी कोंबड्यांची भूक मंदावते, पिसे राठ होतात आणि हिरवट तपकिरी पातळ विष्ठा दिसून येते.

४) कोंबडी मलूल पडते.तुरा बारीक व फिकट होतो

प्रतिबंधक उपाय ः

१) अंडी देणाऱ्या कोंबड्यांची नियमित तपासणी करावी, पैदाशीसाठीच्या कोंबड्या तपासाव्यात.

टायफॅाईड आजार:

१) सर्व वयातील कोंबड्यांमध्ये होऊ शकतो. तलंगा आणि पूर्ण वाढलेल्या कोंबड्यांमध्ये हा आजार अधिक प्रमाणात दिसून येतो.

प्रसार :

१) आजारी कोंबडीच्या विष्ठेचा पाणी आणि खाद्य यांच्याशी संपर्क.

२) आजारातून बरे झालेल्या कोंबड्यांच्या शरीरात रोगजंतू असतात. त्यांनी घातलेल्या अंड्यातून रोगजंतू प्रसार वाढतो

३) मृत पावलेल्या कोंबड्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावल्यास

४) कामगार, अनोळखी व्यक्तींमार्फत प्रसार.

लक्षणे :

१)कोंबड्या कोणतीही लक्षणे न दाखवता अचानक मरतात.

२) साधारणपणे आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर ३ ते ६ दिवसात मरतात.

३) पिसे गळून पडतात, खूप कमजोर होतात. डोळे बंद होतात ,श्वास जड होतो.

४) कोंबडी हळू-हळू अशक्त बनते, वजन घटते.

नियंत्रण :

१) आजारी कोंबडीवर त्वरित उपचार करावेत

२) नवीन कोंबड्या फार्म वर आणण्यापूर्वी चाचणी केली आहे का याची खात्री करावी.

पॅराटायफॅाईड (सालमोनेलोसीस):

प्रसार :

१) आजारी कोंबडीची अंडी उबवणूकीसाठी वापरल्यास जन्मणारी पिल्ले रोगजंतू शरीरात घेऊन जन्मतात. अशी पिल्ले कळपात सोडल्यास निरोगी कोंबड्यांना प्रादुर्भाव होतो.

२) रोगजंतू असणारे पाणी, खाद्यापासून प्रसार होतो.

३) खाद्यामध्ये प्राणीजन्य पदार्थ वापरल्यास उदा. मांस व हाडाची भुकटी, हाडाची भुकटी, मासळी भुकटी, रक्ताची भुकटी यामध्ये रोगजंतूंचा प्रादुर्भाव लवकर होतो.

४) उंदीर, घुशी, कीटक प्रसार करतात. फार्मवर वापरात असलेल्या चपला, कपडे, कामगार, अनोळखी व्यक्ती इ. मार्फत प्रसार होतो.

लक्षणे:

१) विशिष्ट लक्षणे दिसून येत नाहीत.

२) कोंबड्या घोळका करून उष्णतेच्या दिव्याच्या खाली एकत्र जमतात. आसपास गर्दी करतात

३) कोंबडीची तहान वाढते. पाणी पिताना मागे तोल जाऊन कोंबडी पडते. भूक मंदावते.

४) कोंबडी हिरव्या रंगाची पातळ संडास करतात, पंखे लुळे पडतात

नियंत्रण:

१) मेलेल्या कोंबडीची योग्य विल्हेवाट लावावी.

२) नवीन कोंबडी फार्म वर आणण्यापूर्वी आजाराची चाचणी करावी.

फुफ्फुसांचा प्रदीर्घ विकार (सीआरडी) ः

१) मायकोप्लाजमा पासून होणारा दीर्घ मुदतीचा मोठ्या प्रमाणात पसरणारा व एकाच वेळी अनेक कोंबड्यांना होणारा आजार आहे.

२) हिवाळ्यात अधिक प्रमाणात दिसून येतो. आजारी कोंबडीमध्ये ३० ते ४० टक्के मृत्यूचे प्रमाण दिसून येते.

प्रसार ः

१) अंडी आणि वातावरणातून प्रसार.

२) कोंबड्यांची गर्दी, अस्वच्छता, रक्ती हगवण यामुळे आजार असल्यास प्रसार अधिक प्रमाणात होतो.

३) आजारी कोंबडीच्या शेंबडातून, विष्ठेतून रोगजंतू जमिनीवर पडतात. श्वासावाटे निरोगी कोंबडीच्या शरीरात जातात.

लक्षणे

१) सतत खोकणे, श्वासनलिका सुजणे, श्वासाची घरघर, तोंडाने श्वास घेणे.

२) काही काळानंतर खोकला व नाकातून पिवळसर चिकटस्त्राव वाहणे, भूक मंदावणे.

३) डोळे लालसर होणे, डोळ्यातून पाणी येते.

४) अंड्यावरील कोंबड्यांचे अंडी उत्पादन ४० टक्के घटते परंतु इतर आजारांप्रमाणे अंड्याचा आकार बदलत नाही

५) अंडी उबवणूक क्षमता कमी होते, वजन घटते.

नियंत्रण:

१) नियमितपणे पाच ते दहा टक्के कोंबड्यांची तपासणी करावी. आजारी कोंबड्या वेगळ्या काढाव्यात.

२) पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार आजारी कोंबड्यांचे उपचार करावे.

Poultry
Poultry Feed : संतुलित कोंबडी खाद्य निर्मितीचे तंत्र

कॉलरा:

प्रसार

१) आजारी कोंबड्यांमुळे जलद प्रसार.

२) आजारी कोंबडीच्या लाळेमधून, नाकातून वाहणाऱ्या स्त्रावांमध्ये रोगजंतू असतात. ते पाण्यात मिसळले जाऊन प्रसार होतो.

३) डोळे, जखमा यामधून रोगजंतू शरीरात जातात.

४) गादी (लिटर) मध्ये रोगजंतू असतात. कामगारांचे कपडे, चपला इत्यादी मधून रोगजंतूंचा प्रसार.

लक्षणे ः

१) निमोनिया स्वरूपात रोग आल्यास श्वसनेंद्रियाची लक्षणे दिसून येतात.

२) नाकातून पाणी येते, कोंबड्या खोकतात, चोच उघडी ठेवून श्वास घेतात.

३) विषारी स्वरूपात आजार असल्यास पातळ संडास होते.

४) तुरा काळपट दिसू लागतो, तुरा व गलोल सुजते, त्यावर दाब दिल्यास खड्डा पडतो.

५) सांधे सुजून कोंबड्या लंगडतात.

नियंत्रण:

१) उच्च पातळीच्या जैव सुरक्षेसह चांगल्या व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा.

कोलाय-बॅसिलोसिस ः

१) ‘ईकोलाय’ नावाच्या जिवाणूंमुळे होतो.अंड्यातील पिवळा बलक पिशवीचा संसर्ग प्रामुख्याने पाहण्यास मिळतो. अंड्यातील पिवळा बलक पिशवीच्या संसर्गाचे नियंत्रण हॅचरीमधील स्वच्छता विषयक परिस्थिती आणि ब्रूडिंग दरम्यान योग्य उबदारपणा यावर अवलंबून असते.

२) लेयर कोंबड्या तसेच ब्रॉयलर तीव्र किंवा दीर्घ गर्भपिशवीच्या आजाराने ग्रस्त असू शकतात. यामुळे अंडी घालण्याची क्षमता कमी होऊ शकते.

प्रसार ः

१) प्रामुख्याने याचे जंतू माती, पाणी, धुळीमध्ये आढळून येतात. आजाराचा प्रादुर्भाव वर्षभरात केव्हाही होऊ शकतो. २) हिवाळा, पावसाळ्यामध्ये प्रादुर्भावाची जास्त शक्यता.

३) दूषित पाणी, खाद्याद्वारे प्रसार.

४) प्रसार प्रामुख्याने अंडी केंद्रामधून होण्याची शक्यता अधिक असते

५) उंदराची विष्ठेतून प्रसार. यामध्ये जिवाणूंचे प्रमाण अधिक असते.

६) जिवाणू कचरा आणि विष्ठेमध्ये दिसून येतात. विहिरीच्या दूषित पाण्यातून देखील येऊ शकतात

७) शेडमधील दमट हवामान, कोंबड्यांची गर्दी, आर्द्रता, वायुविजन, धूळ आणि अमोनिया यांचे प्रमाण अधिक असल्यास आजार वाढतो.

लक्षणे ः

१) कोंबड्यांमध्ये सुस्ती आणि अतिसार दिसून येतो

२) कोंबडीची भूक मंदावते. त्यामुळे अपेक्षित वजन मिळत नाही, वाढ खुंटते.

३) रात्रीच्या वेळी श्वासाची घरघर, तोंडाने श्वास घेण्यामध्ये अडथळे.

४) पिसे विस्कटलेली दिसतात, कोंबड्या मलूल होऊन बसतात.

५) शवविच्छेदन केल्यास ह्रदयावर पांढऱ्या रंगाचे आच्छादन आढळते.

जैवसुरक्षेचे महत्त्व ः

१) नवीन कोंबड्या येण्या अगोदर शेडची व्यवस्थित स्वच्छता करावी.

२) योग्य प्रमाणात निर्जंतुकीकरण करावे. योग्य वायुवीजन असावे

३) कोंबड्यांना पिण्यास स्वच्छ व ताजे पाणी द्यावे. पिण्याच्या पाण्याची क्लोरीनची प्रक्रिया करावी.

४) उच्च पातळीच्या जैव सुरक्षेसह चांगल्या व्यवस्थापन पद्धती प्रतिबंधासाठी आवश्यक आहेत.

५) उंदीर, वन्य पक्षी, पाळीव व इतर प्राणी या जिवाणूंचे वाहक असतात. त्यामुळे योग्य नियंत्रण करावे.

६) फार्मवर नवीन कोंबड्या आणताना अंडी ऊबवणूक केंद्रातील व्यवस्थापन योग्य आहे किंवा नाही याची खात्री करावी.

७) रोगजंतू असलेली अंडी उबवणूकीसाठी वापरू नयेत.

८) सामान्य जंतुनाशक, पुरेसा सूर्यप्रकाश, कोरडेपणा आणि उष्णता यांचे व्यवस्थापन योग्य असेल तर जीवाणूजन्य आजारावर नियंत्रण केले जाऊ शकते.

९) उपचारापेक्षा आजार नियंत्रण व प्रतिबंध करावा.

डॉ. कुलदीप देशपांडे - ८००७८६०६७२ (विभाग प्रमुख, पशु पोषण विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला.)

डॉ. आर. सी. कुलकर्णी - ७७७६८७१८०० (सहायक प्राध्यापक, कुक्कुटपालन शास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com