जनावरांतील उष्माघातावर उपाययोजना

जनावरे साधारणत: ३७ ते ४० अंश सेल्सिअस तापमानापर्यंत तग धरु शकतात, परंतु ४५ अंश सेल्सिअस तापमानापुढे मात्र जनावरांमध्ये उष्माघात दिसतो.
जनावरांतील उष्माघातावर उपाययोजना
Animal Heat StrokeAgrowon

जनावरे साधारणत: ३७ ते ४० अंश सेल्सिअस तापमानापर्यंत तग धरु शकतात, परंतु ४५ अंश सेल्सिअस तापमानापुढे मात्र जनावरांमध्ये उष्माघात दिसतो. उष्माघातास वातावरणातील आर्द्रता जबाबदार असते. वातावरणाचे तापमान, आर्द्रता यांचा जास्त इंडेक्स, सूर्यापासून येणारी प्रखर क्ष किरणे आणि उन्हाळ्यात कमी असणारा हवेचा वेग उष्माघातास कारणीभूत ठरतो.

१) उन्हाळ्यात अचानक पाऊस पडल्यामुळे आद्रता वाढते.त्यामुळे जनावरांना घाम येणे आणि श्‍वसनाची प्रक्रिया मंदावते. परिणामी, जनावरे त्यांच्या शरीरातील उष्णता शरीराबाहेर टाकू शकत नाही. त्यामुळे शरीराचे तापमान वाढते.

२) नियमित कमी आणि जास्त होणाऱ्या शारीरिक तापमानात अचानक बदल आणि वातावरणाची आर्द्रता अचानक जास्त झाल्याने उष्माघात होतो.

३) ढग कमी झाल्यामुळे वातावरणात सूर्याच्या क्ष किरणांचा उत्सर्ग अधिक प्रमाणात होतो. परिणामी जनावरांना उष्माघात जाणवतो.

४) वातावरणातील वाढता दमटपणा जनावरांना उष्मा तणावास होण्यास कारणीभूत ठरतो.

५) रात्रीच्या वेळी जनावरे शरीरातील उष्णता शरीराबाहेर टाकतात. परंतु रात्री गरम ढगाळ वातावरण असेल तर अशा वातावरणात जनावरे शरीरातील उष्णता शरीराबाहेर टाकू शकत नाही.

६) तापमान, आर्द्रतेमध्ये अचानक बदल झाल्यास उष्माघात होतो.

७) देशी जातीच्या जनावरांमध्ये उष्माघातास प्रतिरोध करण्याची क्षमता ही संकरित जनावरांपेक्षा जास्त असते.

८) पांढरटसर किंवा फिक्या रंगाची कातडी असलेली जनावरे उष्माघातास कमी बळी पडतात. दाट, राठ केस असलेले तसेच गडद रंग असणाऱ्या जनावरांना उष्मा अधिक जाणवतो.

९) लठ्ठ आणि एकदम सडपातळ जनावरे, उष्मा तणावास अधिक प्रमाणात बळी पडतात. लहान वासरे, वयस्कर आणि आजारी जनावरे उष्मा तणावास अधिक प्रमाणात बळी पडतात.

उष्माघातास लक्षणे ः

१) श्‍वसन, हृदयाच्या ठोक्याचा वेग वाढतो.

२) सुरुवातीला जनावरांमध्ये लाळ गाळणे, धापा टाकणे, उलटी होणे, संडास लागणे ही लक्षणे दिसतात.

३) जनावरे सावलीत जाण्याचा प्रयत्न करतात, सूर्यप्रकाशात येण्याचे टाळतात.

४) जनावरे स्वत:ला पाण्याचा स्रोत असलेल्या जागी किंवा पाणी असेल अशा ठिकाणी उभे राहतात.

५) गाई, म्हशी अचानक दूध देणे आणि खाद्य खाणे कमी करतात. भरपूर पाणी पितात.

७) नाकपुडी कोरडी तसेच डोळे लालजर्द होतात.

८) जनावरे कावरेबावरे झालेले, अशक्त, थकलेले दिसते.

९) जनावराच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइटचे प्रमाण कमी होते.

१०) जनावरांना चक्कर येते.कोमात जातात.

प्रतिबंधात्मक उपाययोजना:

१) जनावरांना नियमित स्वच्छ व थंड पाणी पिण्यास उपलब्ध असावे. पिण्याचे पाणी सावलीत असावे. पाण्याची टाकी स्वच्छ करून त्याला चुना मारावा.

२) उन्हाळ्यात जनावरांकडून भरपूर किंवा नेहमीपेक्षा जास्त काम करावयाचे असल्यास विशिष्ट आराम तसेच भरपूर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.

३) जनावरांना प्रवासादरम्यान जीवनसत्वे तसेच खनिज मिश्रण पशुवैद्यकाच्या सल्ल्याने द्यावे.

४) जनावरांना सावलीत उभे राहण्याकरिता जागा व पाण्याची उपलब्धता करावी.

५) रोगग्रस्त जनावरांची वेगळी देखभाल करावी.

६) जनावरांचा गोठा स्वच्छ आणि हवेशीर असावा. गोठ्याच्या छतावर गवत किंवा कडबा टाकावा.

७) उष्मा तणाव झालेल्या जनावरांच्या मांसल पेशी तसेच इतर अवयवांना इजा होत असते. अशा जनावरांना वेळेवर पशुतज्ज्ञांच्या

सल्ल्याने औषधोपचार करावेत.

संपर्क ः डॉ. रणजित इंगोले, ९८२२८६६५४४ (पशुविकृती शास्त्र विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.