
Milk Rate Update : आज टीव्हीवरील स्पर्धात्मक कार्यक्रमातून गाणी, विनोद, नृत्य अशा अनेक बाबींची स्पर्धा आयोजित करून प्रतिभावंत निवडले जातात. तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय खेळांच्या स्पर्धेतून अनेक चांगले खेळाडू निवडले जातात. त्यांना पुढे राष्ट्रीय पातळीवर संधी दिली जाते.
त्याद्वारे हे खेळाडू पुढे वेगवेगळ्या जागतिक स्पर्धेत उतरतात, यश मिळवतात, देशाचे नाव उज्ज्वल करतात. यातून यशस्वी स्पर्धकांनी काय केले, काय नियोजन केले याची चर्चा होते आणि मग त्याचा प्रचार आणि प्रसार होऊन संबंधित बाब वाढीस लागून सर्वांचा फायदा होतो.
पशुसंवर्धन विभागात अनेक स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यामध्ये संकरित वासरांचा मेळावा, पशुप्रदर्शन, प्रदर्शनातील जातीनिहाय उत्कृष्ट पशुधनाची निवड, प्रजातीनिहाय दुग्ध स्पर्धा, पशुसंवर्धन विभागाचा सहभाग असणारी बैलगाडी शर्यत आपल्याला माहिती आहे.
उत्कृष्ट दवाखाना सजावट, लोकसहभागातून दवाखान्यासाठी केलेले कामकाज अशा स्पर्धेतून पशुपालकांना एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न पशुसंवर्धन विभागामार्फत नियमित केला जातो. त्यामुळे एक आरोग्यदायी स्पर्धा निर्माण होऊन गावागावांत चांगली संकरित वासरे, जातीनिहाय सर्व गुणवैशिष्ट्ये असणारे पशुधन, चांगल्या दूध उत्पादनातील गाई,म्हशीचे व्यवस्थापन पशुपालकांच्या समोर येते. त्यातून चांगले पशुधन पशुपालकांच्या गोठ्यात निर्माण व्हायला मदत व्हायची ही वस्तुस्थिती आहे.
संकरित गाईचे प्रति जनावर दूध उत्पादन वाढवणे आणि देशी गोवंश संगोपन जर वाढवायचे असेल तर त्यांच्या दूध उत्पादनाकडे लक्ष द्यायला हवे ही बाब अधोरेखित आहे. त्यादृष्टीने धोरणकर्ते, पशुसंवर्धन विभाग पावले टाकत आहेत. केंद्र, राज्य सरकार राष्ट्रीय गोकुळ मिशनसारख्या योजनेद्वारे प्रयत्न करत आहे.
अनेक सेवाभावी संस्था, विद्यापीठ, खासगी क्षेत्रातील मंडळी याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन प्रयत्न करताना दिसतात. कृत्रिम रेतनापासून ते बाह्य फलन तंत्रज्ञान, भ्रूण प्रत्यारोपण कार्यक्रमापर्यंत वेगवेगळे प्रयोग आज देशात सुरू आहेत.
जैवतंत्रज्ञानाचा वापर जसा जसा वाढत गेला तसा तसा लिंगवर्गीकृत रेतमात्रा, भ्रूण प्रत्यारोपण, बाह्य फलन तंत्रज्ञान आणि भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला. त्याचे चांगले परिणाम दिसण्यास सुरुवात झाली.
याबाबतीत ज्या वेळी संबंधित शास्त्रज्ञांशी चर्चा केली, त्या वेळी असे कळते, की या तंत्रज्ञानाच्या वापरात सर्वांत मोठी अडचण कोणती असेल तर ती उच्च वंशावळीच्या गाई, म्हशीची उपलब्धता. कारण मुळातच दूध उत्पादन वाढ करायची असेल तर या सर्व आधुनिक तंत्रज्ञान वापरासाठी उच्च वंशावळीच्या गाई, म्हशींची गरज आहे.
हे तंत्रज्ञान खर्चिक असले तरी उद्या पशुपालकांपर्यंत घेऊन जाऊ शकतो असा तज्ज्ञांना विश्वास आहे. जादा दूध देणाऱ्या निरोगी, चांगल्या वंशावळीच्या दुधाळ गाई, म्हशींची उपलब्धता झाली तर दूध उत्पादनाचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून आनुवंशिक सुधारणा करता येतील. त्यांची संख्या वेगाने वाढवता येईल.
मुळातच अशा गाई, म्हशी पशुपालकांच्या गोठ्यामध्ये असतील तर निश्चितपणे त्यांच्याकडे असणाऱ्या व्यवस्थापनाच्या परिणामाचा अभ्यास करता येईल. त्याप्रमाणे दूध उत्पादनाचे लक्ष्य ठरवता येईल, जे दीर्घकालीन फायदेशीर ठरेल.
जर आपण वेगवेगळ्या उच्च व्यवस्थापन असणाऱ्या प्रक्षेत्रावरील प्रयोग आणि परिणाम विचारात घेतले तर ते प्रत्येक वेळी पशुपालकांच्या दारात यशस्वी होतीलच असे नाही. त्यासाठी मोठ्या प्रमाणात उच्च वंशावळीच्या गाई, म्हशींचा शोध, नोंद आणि त्यांच्या दूध उत्पादनाच्या शास्त्रीय नोंदी उपलब्ध असल्या पाहिजेत.
पशुसंवर्धन विभागामार्फत पूर्वी दुग्ध स्पर्धा घेतल्या जायच्या. त्यांचे २४ तासांतील दूध उत्पादन मोजले जायचे. पशुपालकास प्रमाणपत्र व काही रक्कम बक्षीस म्हणून दिली जायची. वेगवेगळ्या योजनांतर्गतसुद्धा दुग्ध स्पर्धा घेणे अनिवार्य केले जायचे. उदाहरणार्थ, आनुवंशिक सुधारणा कार्यक्रमांतर्गत दुग्ध स्पर्धेचे आयोजन हे अत्यावश्यक होते.
तालुका, जिल्हा स्तरांवर ही स्पर्धा आयोजित करून सहभागी स्पर्धक पशुपालकांना विशेष प्रशिक्षणदेखील आयोजित करण्यात येत असे. याद्वारे नामवंत देशी जातीच्या उत्पादनक्षम गाई, म्हशी शोधून त्यामध्ये निवड पद्धतीने आनुवंशिक सुधारणा केली जायची.
त्यांच्यात दूध उत्पादन वाढ करणे, पैदाशीसाठी वळू निर्मिती प्रक्रियेत पशुपालकांना पैदासकार पशुपालक म्हणून सहभागी करून घेणे, त्याद्वारे पशुपालकांची उन्नती आणि नामवंत जातीच्या संवर्धनाकडे वळणे इत्यादी बाबी साध्य केल्या जायच्या. पुढील पिढीत जास्तीत जास्त दूध उत्पादन कसे वाढेल याकडे लक्ष दिले जायचे.
कामधेनू दत्तक ग्राम योजनेमध्ये दुग्ध स्पर्धेचे आयोजन करून एक आरोग्यदायी स्पर्धा निर्माण होऊन चांगल्या वंशावळीच्या गाई, म्हशींची यादी तयार व्हायची. या पशुपालकांना गरजेनुसार विशेष तांत्रिक मार्गदर्शन दिले जायचे.
एकंदरीत यातून जादा दूध उत्पादन देणाऱ्या गाई, म्हशी आणि त्या सांभाळणाऱ्या पशुपालकांची यादी दूध उत्पादन आकडेवारीनुसार उपलब्ध होत असे. अलीकडे वाढलेल्या रिक्त जागा व वेगवेगळ्या कारणाने अद्ययावत याद्या उपलब्ध होतीलच असे नाही.
जैवतंत्रज्ञानाच्या वापरासाठी उच्च वंशावळीच्या गाई, म्हशींची निवड अपेक्षित आहे. उच्च वंशावळीच्या वळूपासून लिंग वर्गीकृत रेतमात्रा उत्पादित करणे, स्त्रीबीज गोळा करणे, यासाठी उच्च वंशावळीची दाता गाय, म्हैस महत्त्वाची आहे. अशा उच्च वंशावळीच्या गाई, म्हशी सांभाळणाऱ्या पशुपालकांची यादी, गाव, पत्ता, भ्रमणध्वनीसह उपलब्ध असेल तर या तंत्रज्ञानाचा वापर वेगाने करता येईल.
सद्यःस्थितीत दुधाच्या नोंदी पशुपालकाकडे नसल्याने भ्रूण निर्मितीसाठी आवश्यक दाता गाय, म्हैस मिळणे कठीण आहे. काही पशुपालकाकडे चांगल्या दूध उत्पादक गाई, म्हशी आहेत, परंतु त्यांची नोंद नसल्याने निवड अवघड झाली आहे. हे सर्व लक्षात घेता दुग्ध स्पर्धा आयोजित केल्या तर नक्कीच जातिवंत, दुधाळ गाई, म्हशींची समिती मार्फत निवड करून त्यांचा वापर दाता म्हणून करणे शक्य होणार आहे.
यासाठी पशुसंवर्धन विभागासह सेवाभावी संस्था, गावातील दूध संस्था, तालुका-जिल्हा सहकारी दूध संघ, गावातील शेतकरी गटांनी पशुसंवर्धन विभागाच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पातळीवर दूध स्पर्धा घेण्यासाठी पुढे यायला हवे.
यास मोठ्या कार्यक्रमाचे स्वरूप देऊन, लोकसहभाग वाढवून जास्तीत जास्त गाई, म्हशी, वळूची निवड होईल. याचा वापर तंत्रज्ञान प्रक्रियेत केला, तर याचे यश लवकरात लवकर दृष्टिक्षेपात आणता येईल. त्याचा फायदा सर्वांना व्हायला वेळ लागणार नाही हे निश्चित.
(लेखक सेवानिवृत्त सहायक पशुसंवर्धन आयुक्त आहेत.)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.