
शेतकरी : ओंकार दिलीप कुंभार
गाव : कुंडल, ता. पलूस, जि. सांगली.
एकूण गाई : ४१ (एचएफ)
सांगली जिल्ह्यातील कुंडल (ता. पलूस) येथील ओंकार कुंभार हे अल्पभूधारक असून कुटुंबाची १० गुंठे एवढीच शेती आहे. शाश्वत उत्पन्नासाठी त्यांनी शेतीला पूरक व्यवसाय करण्याच्या दृष्टीने २००५ मध्ये एका एचएफ गाईपासून गोपालनास सुरवात केली.
आज त्यांच्या गोठ्यात ४० दुधाळ गाई आहेत. दुग्ध व्यवसायातून कुटुंबाची आर्थिक प्रगती करत टप्प्याटप्प्याने शेतजमीन विकत घेण्यास सुरवात केली.
जमीनधारणा क्षेत्र फक्त १० गुंठे इतकेच असल्याने त्यात करायचे काय असा प्रश्न ओंकार यांचे वडील दिलीप यांना कायम पडत असे. परंतु, पोटाची खळगी भरण्यासाठी काहीतरी केले पाहिजे या विचाराने ओंकार यांचे वडील दिलीप यांनी औद्योगिक वसाहतीत काम सुरु केले. पण त्यावर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे मुश्कील बनत होते.
त्यामुळे ओंकार यांच्या आई नीलम यांनी घरात पिठाची चक्की आणि चटणीचा डंक असा व्यवसाय सुरु केला. जोडीला दावणीला दोन म्हशी देखील होत्या. दिलीप यांना नोकरीतून मिळणारा पगार, पत्नीला व्यवसायातून मिळणारे उत्पन्न आणि म्हशींच्या दूध विक्रीतून हातात पडणारे चार पैसे यावर कुंभार कुटुंबाचा जेमतेम खर्च चालू होता.
मात्र, शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून आपल्या कुटुंबाची आर्थिक घडी बसवण्याचा विचार कायम मनात घर करीत असे. त्यातूनच ओंकार यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली गोपालन करण्याचा निर्णय घेतला.
गोपालनास सुरवात
शाश्वत उत्पन्नासाठी पूरक व्यवसाय करायचे अशी खूणगाठ मनाशी पक्की बांधली. त्यातून २००५ मध्ये एचएफ गाईंचा गोठा उभारून दुग्ध व्यवसाय करण्याचा विचार मनात आला. परंतु, गाईंच्या खरेदीसाठी आर्थिक भांडवल जवळ नव्हते. त्यामुळे सुरवातीला दावणीला बांधलेली एक म्हैस २० हजार रुपयांना विकली.
पुढे गाईच्या खरेदीसाठी भटकंती सुरु झाली. त्यासाठी तीन हजार रुपये खर्च झाले. १७ हजार रुपयांची एक गाई खरेदी केली. त्या गाईला झालेल्या कालवडींचे संगोपन केले. पलूस येथील बाजारातून आणखी दोन कालवडी खरेदी केल्या. गाईंच्या दुधाच्या विक्रीतून उत्पन्न मिळण्यास सुरवात झाली. पुढे दीड वर्षांत गाईंची संख्या १० पर्यंत पोहोचली.
अनुभवातून दुग्ध व्यवसायातील बारकावे समजत गेले. सध्या गोठ्यात सुमारे ५० एचएफ गायी आहेत. त्यापैकी ४० गाई दुधाळ आहेत. यासह १० लहान वासरे आहेत. त्यांच्यासाठी सात गुंठ्यात मुक्त संचार आणि बंदिस्त पद्धतीची उभारणी केली आहे.
चारा पिकांची लागवड
दुग्ध व्यवसायातून मिळालेल्या उत्पन्नातून मागील दोन वर्षांपूर्वी दीड एकर शेतजमिनीची खरेदी केली आहे. त्यात १ एकरांत चाऱ्यासाठी हत्ती गवताची लागवड केली आहे.
गाईंना चाऱ्यामध्ये मुख्यतः ओल्या चाऱ्यामध्ये हत्ती गवत, ऊस, मका यांचा वापर केला जातो. तर सुक्या चाऱ्यामध्ये कडबा, हरभरा भुसकट, मुरघास यांचा वापर होतो.
व्यवस्थापनातील बाबी
- दररोज सकाळी पाच वाजल्यापासून गोठ्यातील कामकाजाला सुरवात होते.
- सकाळी सहा वाजता गोठ्याची स्वच्छता केली जाते. त्यानंतर यंत्राद्वारे दूध काढले जाते.
- गाईंना सकाळी आणि सायंकाळी दोन्ही वेळी ओला आणि सुका चारा एकत्रित साधारण ३५ किलो प्रति गाय याप्रमाणे दिला जातो.
- प्रति गाई ३० किलो ओला चारा तर ५ किलो सुका चारा दिला जातो.
- दूध उत्पादनानुसार गाईंना पूरक खाद्य दिले जाते. साधारण १ लिटर दूध देणाऱ्या गाईला ३०० ग्रॅम गोळी पेंड दिली जाते. आवश्यकतेनुसार खाद्याचे प्रमाण वाढवले जाते.
- गोठ्यात गोचीड व चावणाऱ्या माश्यांचा प्रादुर्भाव झाल्यास गाई आजारी पडण्याची शक्यता असते. त्यासाठी महिन्यातून एक वेळ फवारणी केली जाते.
- गव्हाणीमध्येच स्वच्छ पाणी पाइपद्वारे चोवीस तास देण्याची सोय
केली आहे.
- उन्हाळ्यात तापमान चांगलेच वाढते. त्यामुळे गाई दिवसभर बंदिस्त गोठ्यात बांधल्या जातात. सायंकाळी ऊन कमी झाल्यावर मुक्तसंचार गोठ्यात सोडल्या जातात.
लसीकरणावर भर
- गाईंना नियमितपणे लम्पी, लाळ्या खुरकूत आणि इतर आजारांचे प्रतिबंधात्मक लसीकरण केले जाते.
- लहान वासरे आणि गाईंना जंतनाशकाची मात्रा दिली जाते. नियमित लसीकरणासह त्यांची विशेष काळजी घेतली जाते.
- गोठ्यातील सर्व गाई आणि वासरांचे लसीकरण, गाभणकाळ, आजारपण यांच्या नियमित नोंदी ठेवल्या जातात.
- जनावरांची नियमितपणे डॉ. पवन कुंभार या पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून आरोग्यविषयक तपासणी केली जाते. त्यांच्या सल्ल्यानुसार व्यवस्थापनात तंत्रात बदल केले जातात.
दूध उत्पादन
प्रति दिन दोन्ही वेळचे मिळून ४५० लिटर दुधाचे संकलन होते. उत्पादित दुधाची साधारण ३९ रुपये प्रति लिटर दराने विक्री होते.
शेणखत विक्रीस सुरवात
गोठ्यातून दरवर्षी सुमारे ४८ ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. शेणखताची विक्री करण्याचा निर्णय घेतला. परिसरात द्राक्ष आणि ऊस शेती मोठ्या प्रमाणात आहे. या पिकांच्या लागवडीत बरेच शेतकरी शेणखताचा वापर करतात.
शेणखताला चांगले दर असल्या खत विक्रीस सुरवात केली. परिसरातील शेतकरी गोठ्यावर येऊन शेणखत खरेदी करू लागले. प्रति ट्रॉली ३६०० रुपये दराने शेणखत विक्री होते.
संपर्क - ओंकार कुंभार, ९५६१६४७३६४, (शब्दांकन - अभिजित डाके)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.