देशी गोवंशाच्या दुग्धजन्य पदार्थांचा ‘फुले अमृत’ ब्रॅण्ड

कृषी महाविद्यालयातील बीएससी (कृषी) पदवीच्या आठव्या सत्रातील विद्यार्थी ‘अनुभव प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत’ दररोज सरासरी ९० लिटर दुधावर प्रक्रियाकरून दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती आणि विक्रीदेखील करतात. या ठिकाणी दररोज ४० लिटर दही, १० लिटर लस्सी निर्मिती होते.
Desi Cow
Desi CowAgrowon

पुणे ः बाजारपेठेत उत्पादनांची वेगळी ओळख व्हायची असेल तर गुणवत्तेच्या बरोबरीने ब्रॅण्ड देखील महत्त्वाचा ठरतो. पुणे कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन विभागातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये दुधाळ देशी गाईंचे संगोपन करण्यात येते. या केंद्रामध्ये देशी गाईंच्या दुधापासून तयार होणाऱ्या दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ‘फुले अमृत’ हा ब्रॅण्ड तयार केला आहे. लवकरच ही प्रक्रिया उत्पादने बाजारपेठेत दाखल होत आहेत.

दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीबाबत माहिती देताना देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे तांत्रिक प्रमुख डॉ. धीरज कणखरे म्हणाले, की कृषी महाविद्यालयातील बीएससी (कृषी) पदवीच्या आठव्या सत्रातील विद्यार्थी ‘अनुभव प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत’ दररोज सरासरी ९० लिटर दुधावर प्रक्रियाकरून दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती आणि विक्रीदेखील करतात. या ठिकाणी दररोज ४० लिटर दही, १० लिटर लस्सी निर्मिती होते.

दुधाची उपलब्धता आणि सणाची मागणी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांकडून खवा, बासुंदी, पेढानिर्मिती केली जाते. सध्या देशी गाईच्या दुधापासून दर आठवड्याला ३० किलो तूपनिर्मिती होते. महाविद्यालयाच्या विक्री केंद्रावरून प्रक्रिया उत्पादनांची विक्री होते. काही विद्यार्थी परिसरातील रहिवासी सोसायटी, शासकीय कार्यालयात मागणीनुसार उत्पादनांचा पुरवठा करतात. देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने म्हणाले, की महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन विभागामध्ये सध्या दहा साहिवाल, दहा राठी, दहा गीर, सहा रेड सिंधी, चार थारपारकर गाई, सात म्हशी आणि २८ संकरित गाई आणि वासरे आहेत. विभागामध्ये दररोज देशी गाईंचे १९० लिटर आणि संकरित गाईंचे ६५ लिटर दुधाचे उत्पादन होते. यातील सरासरी ११० लिटर दुधाची विक्री महाविद्यालयाच्या विक्री केंद्रावर होते.

उर्वरित दुधापासून विद्यार्थी दर्जेदार प्रक्रिया उत्पादने बनवितात. दुधापासून दही, बासुंदी, खवा, लस्सी, पनीर, पेढा आणि तूपनिर्मिती करतात. येत्या काळात दूध उत्पादन तसेच प्रक्रिया पदार्थांमध्ये वाढ होणार असल्याने महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या पुढाकारातून आम्ही देशी गाईंच्या दुधापासून तयार केलेले दुग्धजन्य पदार्थ ‘फुले अमृत’ या ब्रॅण्ड बाजारपेठेत आणत आहोत. या उत्पादनांसाठी आम्ही ट्रेड मार्क आणि एफएसएसआय प्रमाणपत्र घेतले आहे. त्यामुळे ग्राहकांना उत्पादनांची शुद्धता आणि गुणवत्तेची खात्री मिळणार आहे.

सध्या देशी गाईचे दूध ७० रुपये आणि संकरित गाईचे दूध ४५ रुपये लिटर दराने विकले जाते. खवा ६०० रुपये किलो, पेढा ६६० रुपये किलो, पनीर ५६० रुपये किलो, दही ५०० मिलि ५० रुपये आणि देशी गाईच्या दुधापासून तयार केलेले तूप २४०० रुपये किलो दराने विकले जाते. आकर्षक आणि गुणवत्तापूर्ण पॅकिंगमध्ये या उत्पादनांची विक्री होते. गेल्या चार महिन्यांत विद्यार्थ्यांनी विविध दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीतून तीन लाख रुपयांची उलाढाल केली आहे.

कृषी पदवीधरांना कृषी आणि प्रक्रिया उद्योजक बनविण्यासाठी ‘विद्यार्थी अनुभव प्रशिक्षण कार्यक्रम’ अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे विद्यार्थांना प्रक्रिया उत्पादने निर्मिती, बाजारपेठ आणि विक्री तंत्राची माहिती होण्यास मदत मिळत आहे.

डॉ. सुनील मासाळकर, सहयोगी अधिष्ठाता, कृषी महाविद्यालय, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com