
डॉ. आदित्य मोहिते, गौरव कानडे
Poisoning : मोकळे रान, डोंगरपट्ट्यात जनावरे चरतात. या वेळी त्यांच्या खाण्यात नकळतपणे विषारी वनस्पती येतात. त्यामुळे काही वेळा विषबाधा होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन विषारी वनस्पतींची ओळख आणि त्यापासून होणाऱ्या विषबाधेबाबत माहिती आवश्यक आहे.
कुंचला
पूर्वी ही वनस्पती पशुवैद्यकीय आणि मानवी औषधांमध्ये वेदनाशामक मज्जातंतूचे टॉनिक आणि रोमिनोटोरिक म्हणून वापर केला जात असे. परंतु वाढत्या दुष्परिणामामुळे उपचारामध्ये ही वनस्पती वापरली जात नाही. काही वेळा उंदीरनाशक किंवा कीटकनाशक म्हणून याचा वापर केला जातो.
लक्षणे
विषबाधेची सुरुवात जलद गतीने होते. या झाडाचा पाला खाल्ल्यानंतर लगेच दहा ते वीस मिनिटांमध्ये परिणाम दिसून येतात. सुरुवातीला भीती, अस्वस्थता, तणाव जनावरांत जाणवू लागतो.
तीव्र टिटॅनिक झटके उत्स्फूर्तपणे दिसू शकतात किंवा स्पर्श, आवाज यांसारख्या उत्तेजनामुळे सुरू होऊ शकतात. शेश्मल त्वचा सायनोटिक (निळसर) बनते.
दीर्घकाळापर्यंत स्नायूंच्या क्रियाकलपानामुळे रॅबडोमायलिसिस आणि दुय्यम मूत्रपिंड निकामी होऊ शकते. शेवटी मेंदूमधील श्वास केंद्र निकामी होते. श्वासाची गती कमी झाल्यामुळे मृत्यू होतो. उपचार न केल्यास जनावर फक्त १ ते २ तास जगू शकते.
धोतरा
ही एक रानटी वनस्पती आणि विषारी वर्गातील आहे. पांढरा, निळसर काळा व रान धोतरा आपल्या येथे पाहावयास मिळतो. पांढरा आणि काळा धोतऱ्याचा वापर पंचांग औषधांमध्ये करतात.
धोतरा वनस्पती आयुर्वेदामध्ये वापरली जाते. धोत्र्याच्या पानांचा अर्क दमा शांत करतो तसेच सायनुसायटिसचे दुखणे थांबवतो.
विषबाधा
झाडांचे सर्व घटक विषारी आहेत. पण मुख्यतः त्याची पाने आणि बिया जास्त विषारी असतात.
लक्षणे
- या वनस्पतीमुळे होणारी विषबाधा बहुतेक सर्वच पाळीव प्राण्यांमध्ये दिसून येते.
- प्रारंभिक स्वरूपातील लक्षणे जसे की जलद नाडी, अस्वस्थता, नैराश्य, जलद श्वास घेणे, पसरलेले डोळे, स्नायू मुरगळणे, वारंवार मूत्र विसर्जन, वजन कमी होणे.
- श्वसनक्रिया बंद पडल्याने जनावरांचा मृत्यूदेखील होऊ शकतो.
गाजर गवत
जनावरे तसेच माणसांमध्ये याची ॲलर्जी दिसते.
लक्षणे
- गाजर गवताच्या परागकणांमुळे मनुष्यांमध्ये तसेच जनावरांना विविध प्रकारचे ॲलर्जी दिसते.
- सर्दी, शिंका, अंगाला खाज सुटणे, दमा, श्वसनाचा त्रास, त्वचा विकार दिसून येतो.
- वनस्पतीमध्ये आढळणाऱ्या पार्थिनियम ग्लुकोसाइड शिवाय काही अल्कलॉइड्स आढळतात. त्यामुळे कडवट व विशिष्ट घाण वास येतो. यामुळे जनावरे हे गवत खात नाहीत.
- जनावरांच्या खाण्यात गाजर गवत आल्यास अंगावर विविध भागांत खपल्या पडणे, मान व खांद्याच्या भागावरील केस जाणे आणि त्वचा पांढरी पडणे, पापण्या आणि चेहऱ्याच्या स्नायूभोवती खाज येणे, अतिसार, त्यानंतर त्वचेवर सूज सुटणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. वेळेवर उपचार न झाल्यास जनावर दगावण्याची शक्यता असते.
ज्वारी
ज्वारीच्या कोवळ्या पोंग्यांमध्ये धुरीन नावाचा विषारी घटक असतो. जनावरांनी कोवळे पोंगे खाल्ल्यानंतर पोटात धुरीनपासून सायनाइड तयार होते. त्यामुळे जनावरांना विषबाधा होते.
लक्षणे
कमी प्रमाणात पोंगे खाल्ले तर पोट दुखणे, जनावर अस्वस्थ होणे, श्वासोच्छ्वास व हृदयाचे ठोके वाढणे, श्वसनाला त्रास होणे, जनावरांचे पोट फुगणे ही लक्षणे आढळतात.
सायनाइडचा प्रभाव ०.५ ते १ ग्रॅम प्रति मिलि या दरम्यान असल्यास; त्वचेचा हायपरिमिया आणि हृदयाचे ठोके वाढतात. १ ते २.५ ग्रॅम प्रति मिलि या दरम्यान उत्तेजना आणि बेशुद्ध पडतात. या स्तरावरील जनावर कोमात जाते, दगावते.
गुंज
ही वनस्पती त्यांच्या बियांसाठी प्रसिद्ध आहेत. यामध्ये एब्रीन हा विषारी घटक आहे. बी चघळल्यामुळे जनावरांसाठी घातक ठरू शकते.
लक्षणे
- अखंड बी जनावराने ग्रहण केल्यावर कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. कारण ती शेणामधून पूर्णपणे बाहेर टाकली जाते. जेव्हा जनावर बिया चघळून पूर्णपणे गिळते, तेव्हा विषबाधा दिसून येते.
- तीव्र वेदना, सतत उलट्या, जुलाब यासह गंभीर गॅस्ट्रो इंटरायटीस होऊ शकतो; नंतर रक्ताभिसरण कोलमडणे असे बदल होऊ शकतात.
- लवकर उपचार न मिळाल्यास जनावर कोमात जाते.
विषबाधा टाळण्यासाठी उपाययोजना
विषारी वनस्पती असलेल्या ठिकाणी जनावरे चरावयास सोडू नयेत. जनावराला पूरक चारा, पाणी द्यावे. काही वेळा चाऱ्याच्या कमतरतेमुळे भूक भागविण्यासाठी जनावरे घातक वनस्पती खातात. घातक रसायने किंवा औषधे जनावरांच्या पाणी पिण्याच्या बादलीत भरू नका.
चारा कापताना घातक वनस्पती चांगल्या चाऱ्यांमध्ये येणार नाहीत, याची काळजी घ्यावी. बुरशीयुक्त कडबा किंवा शेतात उपटून टाकलेले तण जनावराला खाण्यास देऊ नका.
प्रथमोपचार
- विषबाधेची लक्षणे दिसून आल्यास, तातडीने पशुवैद्यकास संपर्क करावा.
- शक्य झाल्यास जनावराने कोणती वनस्पती खाल्ली आहे, याचा नमुना पशुतज्ज्ञास दाखवावा.
- जनावरास तुळशी, मेथी दाण्याचे द्रावण पाजावे.
- जनावरास थोड्या फार प्रमाणात लसूण खाऊ घालावा. लसूण खाण्यामुळे पोट दुखण्याची समस्या तसेच जुलाब कमी होतात.
संपर्क - डॉ. आदित्य मोहिते, ७०८३८५२२१३, (पशुवैद्यकीय औषध शास्त्र व विषशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.