Poultry Management : शेतकरी नियोजन : कुक्कुटपालन

सांगली जिल्ह्यातील ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील सागर झुरे यांच्याकडे २ एकर शेतजमीन आहे. त्यात मका, भोपळा, शेवगा आदी पिकांची लागवड आहे. मात्र, ढालगाव आणि परिसर दुष्काळी पट्टा असल्याने शेतीला पूरक व्यवसायाची जोड देणे अत्यंत आवश्यक होते.
Poultry Management
Poultry ManagementAgrowon

शेतकरी ः सागर आप्पासो झुरे

गाव ः ढालगाव, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली

एकूण शेड ः २ (१२५ बाय ३१ फूट)

सांगली जिल्ह्यातील ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील सागर झुरे (Sagar Zhure) यांच्याकडे २ एकर शेतजमीन आहे. त्यात मका, भोपळा, शेवगा आदी पिकांची लागवड आहे. मात्र, ढालगाव आणि परिसर दुष्काळी पट्टा असल्याने शेतीला पूरक व्यवसायाची (Supplementary Business) जोड देणे अत्यंत आवश्यक होते. जेणेकरून उत्पन्नाचा शाश्‍वत स्रोत निर्माण होईल. त्याच अनुषंगाने २०१४ मध्ये ब्रॉयलर कुक्कुटपालनास (Broiler Poultry Farming) सुरुवात केली.

कुक्कुटपालनाचा श्रीगणेशा ः

पोल्ट्री व्यवसायास सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी विविध ठिकाणच्या पोल्ट्री शेडला भेट देत माहिती गोळा करून अभ्यास केला. त्यातून ब्रॉयलर कुक्कुटपालन व्यवसायातील आर्थिक गणित थोडे बरे वाटल्याने या पद्धतीची निवड केली. बाजारपेठेतील अस्थिर दरामुळे ब्रॉयलर पक्ष्यांची विक्री बऱ्याचवेळा परवडत नाही. त्यामुळे काही वेळा तोटाही पदरात पडतो, हे अभ्यासाअंती त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे खासगी कंपनीसोबत करार करून ब्रॉयलर कुक्कुटपालन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. करार केलेल्या कंपनीकडून पिलांचा पुरवठा होतो. आणि ४५ दिवसांनी साधारण ३ किलो वजनाच्या पक्ष्यांची कंपनीद्वारेच खरेदी केली जाते. त्यामुळे काही प्रमाणात तोटा आणि जोखीम कमी असल्याचे सागरराव सांगतात.

Poultry Management
Kadaknath Poultry : कडकनाथ कोंबडीची वैशिष्ट्ये काय आहेत?

शेडची उभारणी ः

कुक्कुट पक्ष्यांसाठी १२५ बाय ३१ फूट आकाराची दोन शेड उभारली. दोन्ही शेडमध्ये मार्च महिन्यात संपूर्णपणे वातानुकूलित तंत्राचा अवलंब केला आहे. पारंपरिक शेडमधील बॅचमध्ये एका शेडमध्ये साधारण अडीच हजार पक्षी बसतात. मात्र वातानुकूलित पद्धतीच्या शेडमध्ये साधारण ३८०० ते ४ हजार पक्षी बसतात. पक्ष्यांची संख्या वाढल्याने अधिक फायदा होत असल्याचे सागरराव सांगतात.

Poultry Management
Poultry Rate : मागणी घटल्याने चिकनचे दर कमी झाले

व्यवस्थापनातील बाबी ः

- एक बॅच साधारण ४५ दिवसांची असते. अशा वर्षाला साधारण ६ बॅच एका शेडमध्ये घेतल्या जातात. दोन्ही शेडमध्ये एकूण १२ बॅच प्रति वर्ष होतात.

- साधारण १ दिवसाचे पिलू कंपनीमार्फत पुरविले जाते. पक्षी शेडवर आणल्यानंतर त्यांना गूळ पाणी दिले जाते.

- पिलांच्या वाढीसाठी ब्रूडिंग जाळे तयार करून त्यात ठेवले जातात. ब्रूडिंगसाठी एका जाळ्यात २०० व्हॉट चे ५ बल्ब लावले जातात. त्यामुळे लहान पिलांना उष्णता मिळण्यास मदत होते.

- एका जाळीत साधारण ५०० पिल्ले ठेवली जातात. पिलांच्या वाढीनुसार जाळ्याचा आकार वाढवीत नेऊन पिलांना पुरेशी जागा उपलब्ध करून दिली जाते.

- साधारण ४५ दिवसांनी योग्य खाद्य व्यवस्थापन आणि काळजी घेतल्यानंतर साधारण ३ किलो वजनाचे पक्षी मिळतात. कंपनीमार्फत जागेवरच वजन करून पक्ष्यांची खरेदी केली जाते.

- मोठ्या पक्ष्यांना साधारण १६० ते १८० ग्रॅम, तर लहान पिलांना १० ते १५ ग्रॅम खाद्य प्रतिदिन लागते.

- प्रत्येक बॅच गेल्यानंतर शेड पूर्ण धुऊन स्वच्छ केले जाते. पक्ष्यांसाठी वापरलेली शेडमधील सर्व भांडी स्वच्छ धुऊन त्यांचे निर्जंतुकीकरण केले जाते.

- त्यानंतर शेडमधील जमिनीचे गॅस बर्निंग केले जाते. आणि चुना मारून भाताचे तूस पसरविले जाते.

- प्रत्येक बॅच गेल्यानंतर साधारण साडेतीन ते ४ ट्रॉली खत उपलब्ध होते. त्याची साधारण ६ हजार रुपये प्रति ट्रॉली दराने विक्री होते.

आरोग्यावर विशेष भर ः

- सहाव्या दिवशी डोळ्यातून पहिली लस.

- नवव्या दिवशी पुन्हा डोळ्यातून दुसरी लस.

- तिसरी लस १८ ते २० व्या दिवशी पाण्यातून दिली जाते.

- लसीकरणाचे नियोजन करून त्यानुसार लसीकरणापूर्वी ६ तास आणि लस दिल्यानंतर ६ तासांनी पक्ष्यांना साधे पाणी दिले जाते.

- वेळोवेळी पाण्याची गुणवत्ता तपासली जाते.

- कंपनीमार्फत दर १५ दिवसांनी आरोग्य तपासणी होते.

निवारा व्यवस्थापन ः

- कुक्कुटपालन शेडमध्ये वातानुकूलित (इन्व्हयर्न्मेंट कन्ट्रोलर सिस्टीम) तंत्राचा अवलंब केला आहे. शेडच्या आतमध्ये उष्ण किंवा थंड वारे येऊ नये यासाठी शेडच्या बाजूने २०० मायक्रॉनचा कागद तर सिलिंगसाठी ३०० मायक्रॉनचा कागद लावला आहे.

- शेडमध्ये पक्ष्यांना शुद्ध हवेचा पुरवठा होण्यासाठी २ एक्झॉस्ट फॅन बसविले आहेत. जेणेकरून शेडमधील उष्ण वारा आणि कुबट वास बाहेर जाऊन ताजी हवा आत येईल. एक्झॉस्ट फॅनच्या विरुद्ध बाजूला ६ कूलिंग पॅड बसविले आहेत. वातावरणाचा अंदाज घेऊन शेडमधील तापमान नियंत्रित केले जाते.

फायदे ः

- पक्ष्यांची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत झाली.

- पक्ष्यांची मरतुक कमी झाली.

- नेहमीच्या कुक्कुटपालन पद्धतीमध्ये एका शेडमध्ये साधारण २४०० ते २६०० पक्षी बसतात. मात्र वातानुकूलित शेडमध्ये दीड पट म्हणजेच ३८०० ते ४०० पक्ष्यांची बॅच घेणे शक्य होते.

- शेडमधील तापमान व आर्द्रता योग्य राखण्यास मदत झाली.

- लहान पिलांच्या वाढीसाठी २७ अंश सेल्सिअस ,तर मोठ्या पक्ष्यांसाठी ३३ अंश सेल्सिअस तापमान नियंत्रित केले जाते.

- पक्ष्यांचे वजन वाढण्यास मदत होते. त्यामुळे करार केलेल्या कंपनीकडून प्रतिकिलोस १ रुपया अधिक दर दिला जातो.

- खाद्यात पाच टक्के बचत होते

-----------------

- सागर झुरे, ९४०५८६०३८४

(शब्दांकन ः अभिजित डाके)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com