Animal Care : काळजी घ्या, उपचार करा, सतर्क रहा...

बाधित पशुपक्ष्यांच्या निकट सान्निध्यात आल्यानंतर मनुष्यामध्ये या जीवजंतूंचे संक्रमण होऊन सौम्य किंवा गंभीर स्वरूपाचे आजार माणसाला होऊ शकतात. हे पशुसंक्रमित आजार टाळण्यासाठी काळजी घेणे, योग्य तसेच वेळेवर उपचार आणि सतर्क रहाणे गरजेचे आहे.
Animal Care
Animal CareAgrowon

आपण दैनंदिन आहारात दूध (Milk In Diet), मांस, अंडी आणि मासे (Fish) यांचा समावेश आवर्जून करतो. कारण त्यांच्यापासून आपल्या शरीराला आवश्यक सर्व घटक जसे की, कर्बोदके, प्रथिने, मेद, काही जीवनसत्त्वे व खनिजे विपुल प्रमाणात मिळतात. प्राण्यांच्या कातडीपासून कमावलेल्या चामड्याच्या (Animal Skin) अनेक वस्तू आपण दैनंदिन व्यवहारात वापरतो. मानवाला पशुपक्ष्यांपासून बऱ्याच चांगल्या गोष्टी मिळतात, परंतु त्याचबरोबर काही अप्रिय गोष्टीसुद्धा स्वीकाराव्या लागतात.

एकमेकांच्या निकट सान्निध्यामुळे पशुपक्ष्यांच्या शरीरात किंवा शरीरावर असणारे काही जीवजंतू मानवी शरीरात तसेच शरीरावर प्रवेश करून काही आजार निर्माण करतात. यापैकी काही आजार किरकोळ स्वरूपाचे असतात, तर काही प्राणघातक ठरु शकतात. अमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्राच्या अहवालानुसार सध्या अस्तित्वात असलेल्या संसर्गजन्य आजारांपैकी ६० टक्के आजार पशुसंक्रमित असून ७० टक्के आजार प्रथमतः प्राण्यांमध्ये उद्भवतात आणि नैसर्गिक साखळीमधून त्यांचा प्रादुर्भाव मानवाला होऊ शकतो.

Animal Care
पशु उपचार महागले

१) पाळीव तसेच वन्य पशुपक्ष्यांमध्ये नानाविध प्रकारचे जिवाणू, विषाणू, आंतर आणि बाह्यपरोपजीवी नैसर्गिकरित्या अधिवास करून असतात. त्यापैकी काही सुप्तावस्थेत असतात तर काही पशुपक्ष्यांमध्ये रोग निर्माण करतात. अशा बाधित पशुपक्ष्यांच्या निकट सान्निध्यात आल्यानंतर मनुष्यामध्ये या जीवजंतूंचे संक्रमण होऊन सौम्य किंवा गंभीर स्वरूपाचे आजार माणसाला होऊ शकतात.

२) रोग संक्रमणाचे स्वरूप जीवजंतूच्या घातकतेनुसार तसेच मानवाच्या प्रतिकार शक्तीनुसार कमीअधिक होऊ शकते. काळपुळी (अँथ्रॅक्स), संसर्गजन्य गर्भपात (ब्रुसेल्लोसिस) सारखे रोग बाधित पशुपक्ष्यांच्या थेट संपर्कात आल्याने किंवा बाधित अवयव निष्काळजीपणे हाताळल्यामुळे तर लेप्टोस्पायरोसिससारखे काही आजार दूषित पाण्यातून रोगाचे जिवाणू शरिरात शिरल्याने होतात. श्वानदंशामुळे होणारा रेबीज हा आजार सुपरिचित आहे. त्याचबरोबर उंदीर, घुशी व तत्सम प्राण्यांच्या चाव्यामुळे रॅट बाईट फिवरसारखे आजार माणसाला होतात.

३) विविध प्रकारचे कीटकसुद्धा पशुसंक्रमित आजार पसरविण्यात मोलाची भूमिका बजावतात. पिसवांद्वारे प्लेग, डासांमुळे जापनीज इन्सेफेलायटिस, मलेरिया, गोचीडांच्या माध्यमातून माकड ताप, इन्सेफेलायटिस, घरमाश्यांमुळे उलट्या-जुलाब, विषमज्वर (टायफॉईड) तसेच एकेकाळी पूर्वेकडील राज्यांत पसरलेला काला आजार (लिश्मानियासिस) हा विशिष्ट प्रकारच्या सँडफ्लाईसद्वारे पसरतो.

४) दूषित प्राणीजन्य अन्नपदार्थ उदा. दूध, मांस, दूषित अंडी खाल्ल्याने कावीळ, विषमज्वर आणि पोटाचे विकार उद्भवतात. दैनंदिन वापरातील वस्तूंचा संपर्क अशा जीवजंतूंशी झाल्यास त्याद्वारे देखील पशुसंक्रमित आजार पसरतात.

पशु प्रजनन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वंध्यत्व निवारण शिबीर

नैसर्गिक साखळीत मानवाचा हस्तक्षेप ः

१) पशुसंक्रमित आजार पसरविण्यासाठी पशुपक्ष्यांना दोष देण्यात अर्थ नाही. माणसांचे काही आजार पशुपक्ष्यांमध्येदेखील संक्रमित होतात. क्षयरोग ही माणसाने प्राण्यांना दिलेली घातक देणगी आहे. मूलतः क्षयरोग हा मानवी आजार असून पाळीव प्राण्यांच्या निकट संपर्काने आजार गायी-म्हशींसारख्या प्राण्यांना झाला. आता त्याचे संक्रमण बाधित प्राण्यांद्वारे तसेच माणसांद्वारे निरोगी व्यक्तींना होते.

२) असह्य पोटदुखीमुळे माणसाला त्रस्त करणारा आमांश (अमिबीओसिस) हा आजारसुद्धा याच प्रकारात मोडतो. अशा आजारांचे प्रमाण जरी अत्यल्प असले तरी, बऱ्याच पशुसंक्रमित आजारांचे बदलते स्वरूप लक्षात घेता रोगाबद्दल सावधानता बाळगणे आवश्यक आहे.

३) कोविड-१९ ला कारणीभूत असणारा कोरोना विषाणू किंवा आफ्रिकेतील काही देशांत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी करणारा इबोला हिमोरेजिक फिवरच्या विषाणूचे नैसर्गिकरित्या संक्रमण वन्य पशुपक्षी-वटवाघुळ-पशुपक्षी या साखळीमध्ये होते. या नैसर्गिक साखळीत मानवाचा अधिक्षेप झाला की विषाणू माणसांमध्ये संक्रमित होतात. त्यानंतर या विषाणूंचा प्रवास बाधित व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीकडे होतो, त्यानंतर विषाणूंच्या संक्रमणासाठी वन्यजीवांची आवश्यकता भासत नाही. अशा प्रकारे माणसांमध्ये जीवघेण्या आजारांचा प्रसार होतो.

४) आधुनिक विज्ञानाला ज्ञात नसणाऱ्या जीवजंतूंच्या अनेक जाती-प्रजाती वन्य पशुपक्ष्यांमध्ये अधिवास करून आहेत. त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण चक्र वन्यजीवांमध्ये अव्याहतपणे चालू असते, तथापि माणसे जेव्हा या चक्राच्या सानिध्यात येतात किंवा हस्तक्षेप करतात तेव्हा अशा जीवजंतूंचे संक्रमण माणसांमध्ये होऊ शकते. उदाहरणार्थ माकड ताप. हा आजार गोचीडांद्वारे माणसांमध्ये पसरला असून सद्य परिस्थितीत कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, गोवा तसेच महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये याचा प्रादुर्भाव सातत्याने वाढताना दिसत आहे.

आरोग्याबाबत जागरूक रहा...

पशू-पक्ष्यांचे सर्वच आजार माणसांमध्ये संक्रमित होतात, असे नाही. परंतु रोगग्रस्त जनावरांपासून दूर रहा, बालके, स्त्रिया व वृद्ध व्यक्तीनी विशेष काळजी घ्यावी. मानवाच्या अतिक्रमणामुळे निसर्गातील जैवविविधतेचा समतोल ढासळत असून नवनवीन आजारांना मनुष्यजातीला सामोरे जावे लागणार आहे असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.

१) आजारी पशू-पक्ष्यांवर तज्ञ पशुवैद्यकांकडून योग्य उपचार करून घ्यावेत. ज्या आजारांवर लसीकरण उपलब्ध असेल तेव्हा वेळेवर करावे. विषाणूजन्य आजारांवर लसीकरण हाच असे आजार टाळण्याचा प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे.

२) रोगग्रस्त जनावरांच्या संपर्कात आल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. विशेषतः रेबीज सारख्या १०० टक्के जीवघेण्या पण योग्य लसीकरण केल्यास टाळता येण्यासारख्या रोगांवर त्वरित उपचार करून घ्यावेत. आजाराची काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांना दाखवताना घरात पाळीव प्राणी असले तर त्याची कल्पना द्यावी.

३) कोणत्याही परिस्थितीत प्राणिजन्य अन्नपदार्थ कच्चे खाऊ नयेत.दूध योग्यरीत्या उकळून तर मांस/अंडी/मासे पूर्णपणे शिजवूनच खावीत.

४) काही अपरिहार्य कारणांमुळे जंगलात जाण्याचा प्रसंग ओढवल्यास शरीर झाकेल असे कपडे घालावेत. शक्य असल्यास कीटकनाशक मलमांचा वापर करावा. जंगलामध्ये वावरताना पुरेशी काळजी घ्यावी. अनावश्यक साहस करू नये, ते अंगलटसुद्धा येऊ शकते.

५) कीटकजन्य आजारांचा सामना करण्यासाठी डास, पिसवा, गोचीड इत्यादी कीटकांचे निर्मूलन करणे हा एकमेव उपाय आहे. पुरेशी काळजी घेऊन कीटकनाशकांचा नियंत्रित वापर करावा. कीटकनाशके फवारताना त्यांचा संपर्क थेट प्राणी किंवा खाद्याशी येणार नाही याची खात्री करा. पाण्याचे स्तोत्र, साठ्याचे संरक्षण करावे.

६) वैयक्तिक स्वच्छता अनेक आजारांना दूर ठेवते, त्यामुळे पशू-पक्षी किंवा त्यांच्या मल-मूत्राचा संपर्क आल्यास साबणाने हात स्वच्छ धुवावेत, खराब कपडे त्वरित बदलावेत. तसेच खाण्या-पिण्याच्या जागा गोठ्यापासून दूर ठेवाव्यात.

७) गरज नसेल तर वन्य पशुपक्ष्यापासून दूर राहावे. नैसर्गिक जीवनसाखळी तोडण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःचे व इतरांचेही संरक्षण करावे.

६ जुलै चे महत्त्व ः

विख्यात शास्त्रज्ञ लुईस पाश्चर यांनी श्वानदंशावरील पहिली लस ६ जुलै १८८५ रोजी टोचली होती. त्या स्मृतीप्रित्यर्थ तसेच २०० पेक्षा जास्त पशुसंक्रमित आजारांविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी ६ जुलै हा दिवस जागतिक प्राणिजन्य रोग दिवस म्हणून साजरा केला जातो.

--------

संपर्क ः

डॉ. विकास वासकर,९४०३१८४५४१

( पशुवैद्यकीय सामूहिक स्वास्थ्य विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ,जि.सातारा)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com