Lumpy Skin : ‘लम्पी’विरुद्ध खासगी डेअरी प्रकल्पांची मोहीम

राज्यातील खासगी डेअरी प्रकल्पांकडून ‘लम्पी स्कीन’ नियंत्रणासाठी जोरदार अभियान उघडण्यात आले आहे. तथापि, लसींच्या मात्रा कमी प्रमाणात उपलब्ध होत आहेत.
Lumpy Skin Disease
Lumpy Skin DiseaseAgrowon

पुणे ः राज्यातील खासगी डेअरी प्रकल्पांकडून (Private Dairy Project) ‘लम्पी स्कीन’ नियंत्रणासाठी (Lumpy Skin Disease Control) जोरदार अभियान उघडण्यात आले आहे. तथापि, लसींच्या मात्रा (Lumpy skin Vaccine) कमी प्रमाणात उपलब्ध होत आहेत. दुर्गम भागांत अद्यापही लसीकरणाची सेवा न पोहोचल्यामुळे डेअरी उद्योगातून चिंता व्यक्त केली जात आहे.

चितळे डेअरी उद्योग समूहाचे संचालक श्रीपाद चितळे म्हणाले, ‘‘शासन पातळीवर ‘लम्पी’ विरोधात उघडलेली मोहीम सामान्य पशुपालकांसाठी दिलासादायक आहे. खासगी डेअरीचालक देखील आपल्या कार्यक्षेत्रात पशुपालकांमध्ये जागृतीसाठी दिवसरात्र प्रयत्न करीत आहेत. सांगली भागांत जिल्हाधिकाऱ्यांकडून लसीच्या एक लाख मात्रा दिल्या जातील. मात्र चितळे डेअरी उद्योग समूहदेखील २० हजार शेतकऱ्यांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो आहे. देशात ‘लम्पी’ विषाणू प्रतिबंधक मात्रा तयार करणारे दोनच उत्पादक आहेत. त्यामुळे मात्रा मिळण्यात अडचणी येत आहेत. अर्थात, हवामान अनुकूल राहिल्यास राज्यात या आजाराचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाही.”

Lumpy Skin Disease
Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’ चा आता मांडवे, नंदूरमध्ये प्रादुर्भाव

महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांच्या म्हणण्यानुसार, ‘‘रोगनियंत्रणासाठी पशुपालक शेतकऱ्यांनी गोठ्यांची स्वच्छता राखावी. निरोगी जनावरांना प्रादुर्भावग्रस्त जनावरांपासून वेगळे बांधावे. तसेच गायी व म्हशींना एकत्रित ठेवू नये. ‘लम्पी’ नियंत्रणासाठी राज्य शासनाने लसीकरण चालू केलेले आहे. मात्र लसीकरणाची सुविधा सर्व भागांमध्ये पोहोचण्यास मर्यादा येत आहेत. त्यामुळे कल्याणकारी संघाच्या खासगी व सहकारी दूध प्रकल्पांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये लसीकरण जागृती मोहीम सुरू केली आहे.’’

Lumpy Skin Disease
Lumpy Skin: तीन लाख जनावरांना ‘लम्पी स्कीन’चे लसीकरण

पंचकृष्णा डेअरीचे संचालक संतोष भवर म्हणाले, “सरकारी यंत्रणा, खासगी व सहकारी डेअरी उद्योग अशा तीन घटकांकडून लसीकरण चालू आहे. जंत व गोचीड निर्मूलनासाठी काळजी घेतली जात आहे. पशुपालकांमध्ये वेळीच जागृती आणल्यामुळे गोठ्यांची स्वच्छता तसेच जनावरांना चांगला व भरपूर पोषण आहार देण्याकडे पशुपालकांचा कल आहे.’’

पराग मिल्क फूड्स प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक प्रीतम शहा यांनी, जनावरांचे बाजार बंद करण्यात आल्यामुळे ‘लम्पी’चा प्रसार रोखला जाणार असल्याचे सांगितले. “खासगी व सरकारी अशा दोन्ही यंत्रणा ‘लम्पी’विरोधात पुढे आल्या आहेत. शेतकऱ्यांना या आजाराची लक्षणे व उपाययोजना या बाबत वेळोवेळी माहिती दिली जाते आहे. ‘लम्पी’चे संकट लवकरच कमी होण्याची शक्यता आहे.”

महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या म्हणण्यानुसार...

- जनावरांना ‘लम्पी’ मुख्यत्वे विषाणूजन्य तापापासून होत आहे.

- दूध उत्पादकांनी दक्ष राहून रोगाच्या लक्षणांचा अभ्यास करावा.

- जनावरांचे चारा खाण्याचे प्रमाण कमी होते

- ताप येतो तसेच नाकाडोळ्यांतून पाणी येते

- लसिकाग्रंथींना सूज येते

- दूध उत्पादन कमी होते

- चारा खाणे व पाणी पिणेही कमी होते

- पोट, मानेवर, कास, डोके या भागांतील त्वचेवर १०-१५ मिलिमीटर व्यासाच्या गाठी येतात

- डास, माशी, गोचिडांपासून गाई, बैल, म्हैस वर्गातील जनावरांना या आजाराचा प्रादुर्भाव होतो.

- जनावरांच्या आसपास स्वच्छता ठेवावी

“‘लम्पी’चे संकट राज्यात वाढण्याची शक्यता कमी आहे. राज्यभर मोफत लसीकरण सुरू आहे. पशुपालकांनी काळजी घेत गोठे स्वच्छ ठेवावेत. सहकारी व खासगी संघांनी लसीकरण मोहीम राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुढाकार घ्यावा. लसीकरणासाठी केवळ ६०० रुपयांची बाटली मिळते. त्यातून ६०-७० जनावरांचे लसीकरण होते. त्यामुळे पशुपालकांच्या प्रतिसादाकडे न बघता फारसे खर्चिक नसलेल्या या अभियानात सर्व डेअरीचालकांनी स्वतःहून आर्थिक नियोजन करावे.”
गोपाळराव म्हस्के, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघ

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com