उष्ण हवामानात टिकून राहणारी पूर्णाथडी म्हैस

मध्यम आकारमान, दुधातील उच्च स्निग्धांश (फॅट), उत्तम प्रजननक्षमता, कमी व्यवस्थापन खर्च आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विदर्भातील उष्ण हवामानात तग धरून राहण्याची क्षमता पूर्णाथडी म्हशीमध्ये आहे. त्यामुळे लहान आणि मध्यम पशुपालकांची या म्हशीला पसंती आहे.
Animal Care
Animal CareAgrowon

डॉ. एस. साजिद अली, डॉ. शैलेंद्र कुरळकर, डॉ. प्रवीण बनकर

---------------------------------------------

भारतीय उपखंडात म्हशींचे एकूण पशुधनातील योगदान लक्षणीय आहे. राष्ट्रीय पातळीवर म्हशींच्या १९ नोंदणीकृत जाती आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात नागपुरी, पंढरपुरी, मराठवाडी या प्रमुख जाती आढळतात. नागपुरी ही महाराष्ट्रातील विदर्भात सर्वदूर आढळणारी म्हशीची जात आहे. नागपुरी म्हशीच्या नागपुरी / वऱ्हाडी, शाही, गवळणी / गवळाऊ, एलीचपुरी आणि पूर्णाथडी अशा उपजातींचा उल्लेख आढळतो.

Animal Care
जाणून घेऊया पूर्णाथडी म्हशींची वैशिष्ट्ये | Characteristics Of Purnathadi Buffalo | ॲग्रोवन

पूर्णाथडी म्हशीची वैशिष्ट्ये ः

१) नागपुरीच्या उपजाती रंगाने नागपुरीप्रमाणे असल्या तरी पूर्णाथडी म्हैस यांच्यापेक्षा वेगळी आहे.

२) फिकट, राखाडी रंगाची ही म्हैस पूर्णानदी काठच्या भागामध्ये भुरी, राखी, पूर्णाकाठी नावाने परिचित.

३) मध्यम आकारमान, दुधातील उच्च स्निग्धांश (फॅट), उत्तम प्रजननक्षमता, कमी व्यवस्थापन खर्च आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विदर्भातील उष्ण तापमानास तग धरून राहण्याची चांगली क्षमता आहे.

४) पूर्णा नदी काठचा परिसर आणि वातावरण या म्हशीस अनुकूल आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर, अचलपूर आणि अंजनगाव हे तालुके, अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा आणि अकोला हे तालुके आणि बुलडाणा जिल्ह्यातील लगतची गावे पैदासक्षेत्रात येतात.

शारीरिक गुणधर्म ः

१) म्हैस फिकट, राखाडी रंगाची आहे. नवजात बछडे पहिल्यांदा पांढरे शुभ्र असतात.

कालांतराने वाढत्या वयाबरोबर ते राखाडी, भुऱ्या रंगाचे होतात. विदर्भातील उष्ण तापमानात जुळवून घेण्यासाठी झालेला हा नैसर्गिक बदल आहे, कारण काळा रंग उष्णता अधिक शोषून घेतो.

२) नाकपुड्यांचा रंग फिकट गुलाबी किंवा काळा असतो. कपाळ, खुरांजवळ आणि शेपटीवर पांढरा रंगाचे पट्टे आढळतात.

३) खांद्यापर्यंत लांब होत गेलेली बारीक शिंगे मागे जाऊन वरच्या दिशेने वळलेली दिसतात.

४) कास मध्यम आकाराची, घट्ट बांधणी आणि गोलाकार असते. सडांचा आकार लांबट व गोलाकार क्वचित टोकदार असतो. या गुणधर्मावरून पूर्णाथडी म्हैस एलीचपूरी, गवळाऊ किंवा नागपुरी उपजातीपेक्षा वेगळी ठरते.

उत्पादनक्षमता ः

१) म्हैस दिवसाला साधारणतः ४ ते ६ लिटर दूध देते. काही म्हशी दररोज ८ ते १० लिटर दूध देतात. एका वेतात (सरासरी २३५ दिवस) ८०० ते १००० लिटर दूध देते.

२) पूर्णाथडी म्हशींच्या दुग्धपान कालावधीबाबत सर्वेक्षणादरम्यान दोन प्रकारचे अनुभव नोंदवले गेले. काही म्हशींमध्ये चांगल्या पुनरुत्पादन कार्यक्षमतेसह १२ ते १३ महिन्यांपर्यंत दीर्घ दुग्धपान कालावधी नोंदविला गेला आहे. काही पशुपालकांनी दुग्धपानाच्या मध्यभागी दुधाचे उत्पादन झपाट्याने कमी झाल्याचे सांगितले. या परिवर्तनशीलतेचा उपयोग या म्हशींच्या आनुवंशिक सुधारणेसाठी करणे शक्य आहे.

३) दोन वेतांतील अंतर सरासरी ४५० दिवस असून पहिल्यांदा विण्याचे वय सुमारे ५ ते ६ वर्षे आहे.

४) दुधातील स्निग्धांशाचे उच्च प्रमाण (सरासरी ८ टक्के) आहे. यामुळे पूर्णाथडी दुधासाठी फायदेशीर दिसून येते.

५) म्हशींच्या दुधातील एकत्रित सरासरी दुग्धशर्करा ४.२६±०.०५ टक्के, प्रथिने ३.६८±०.०७ टक्के आणि एस. एन. एफ. ८.८६± ०.०९ टक्का नोंदवले गेले.

व्यवस्थापनाबाबत संशोधन ः

पूर्णाथडीचे व्यवस्थापन कसे केले जाते, ते करणाऱ्या पशुपालकांचे सामाजिक व आर्थिक स्थितीमान अभ्यासण्यासाठी पशुअनुवांशिकी व पैदासशास्त्र विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला आणि राष्ट्रीय पशू अनुवांशिकी संसाधन ब्युरो, कर्नाल (हरियाना) यांच्या संयुक्त विद्यमाने एक पीएच.डी. संशोधन प्रकल्प राबविण्यात आला. त्यामधील निरीक्षणे पुढीलप्रमाणे ः

१) व्यवस्थापन ः

- पैदास क्षेत्रात पूर्णाथडी म्हशींचे व्यवस्थापन कसे केले जाते याचा अभ्यास करण्यात आला, तेव्हा असे लक्षात आले, की साधारणतः तीन ते चार म्हशी पशुपालक पाळतात.

- गोठा बहुतांशी कच्च्या स्वरूपाचा आणि राहत्या घराजवळ बांधलेला होता.

- सर्वच पशुपालक हिरवा चारा आणि जोडीला ढेप देताना आढळले.

- बंदिस्त पालनाबरोबर बहुतेक करून चराईसाठी दिवसा मोकळे सोडण्यावर पशुपालकांचा भर दिसला.

- व्यवस्थापनात महिलांचा सहभाग लक्षणीय स्वरूपाचा आहे.

२) पशुपालकांचा सामाजिक - आर्थिक पैलू ः

- पैदासक्षेत्रात पूर्णाथडी ही सर्वच समाजाच्या पशुपालकांकडे दिसून येते. विशेषतः मुस्लिम, बारी, कुणबी, माळी, गवळी तथा धनगर पशुपालकांचा मोठा वाटा आहे.

- पशुपालक हे सुशिक्षित आणि मध्यम कुटुंबसंख्येचे आहेत.

- भूमिहीन ते सरासरी ७ एकर जमीन धारणा असलेल्या सर्वच पशुपालकांची पसंती म्हैसपालनास आहे.

- निम्म्याहून अधिक पशुपालक हे शेती आणि पूरक व्यवसायाशी निगडित आहेत.

पूर्णाथडीमधील आव्हाने :

- विदर्भातील उष्ण तापमानामध्ये योग्य आहार व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.

- साधारणतः वर्षातील ६ महिने हिरव्या चाऱ्याचा तुटवडा, सुका चारा (कडबा, कुट्टी) आणि ढेप इत्यादीचे चढे दर आणि दुधास मिळणारा कमी दर यामुळे ग्रामीण भागातील म्हैसपालकांचा इतर व्यवसायाकडे झुकता कल दिसतो.

- पैदास व्यवस्थापनात रेड्याची भूमिका महत्त्वाची असते. मात्र म्हैसपालनामध्ये रेडा (हेला) पालन करण्यात पशुपालकांत विशेष उत्साह दिसत नाही. त्यामुळे नैसर्गिक रेतन करण्यासाठी जातिवंत रेडे फारसे उपलब्ध नाहीत. कृत्रिम रेतन करण्यासाठी शासकीय स्तरावर पूर्णाथडी जातीच्या रेतमात्रा उपलब्ध नाहीत.

पूर्णाथडीचे संवर्धन:

- जातिवंत पूर्णाथडी म्हशीस त्याच जातीच्या रेड्याकडून नैसर्गिक किंवा कृत्रिम रेतन करावे.

यातून जातिवंत म्हशींचे संकरीकरण टाळणे शक्य आहे.

- पूर्णाथडी स्वतंत्र जातिवंत पशुधन म्हणून राष्ट्रीय स्तरावर नोंद होण्याकरिता अकोला येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था प्रयत्न करत आहे. यामुळे पूर्णाथडी पशुपालकांना एक सन्माननीय सामाजिक स्थान मिळेल. तसेच शासकीय पातळीवर मदत मिळू शकेल.

संपर्क ः

- डॉ. एस. साजिद अली, ७३५०३०२३२३

(सहायक प्राध्यापक, पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी)

- डॉ. शैलेंद्र कुरळकर, ९८२२९२३९९७

(स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com