Lumpy Skin : सिंधुदुर्ग जिल्हा पशुसंवर्धन विभाग दक्ष

देश आणि राज्याच्या अनेक भागांत लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्ह्यात अद्याप या आजाराचा प्रादुर्भाव झालेला नाही.
Lumpy Skin Disease
Lumpy Skin DiseaseAgrowon

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात अद्याप जनावरांमध्ये लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Outbreak Sindhudurg) झालेला नसला तरी जिल्हा पशुसंवर्धन विभागाने (Department Of Animal Husbandry Sindhudurg) खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्याबाहेरून होणारी जनावरे, चारा वाहतूक पोलिसांमार्फत बंद केली आहे. याशिवाय तालुकानिहाय पथके तयार करण्यात आली आहेत. जिल्ह्यात १० हजार लसी (Lumpy Skin Vaccination) उपलब्ध असून आणखी लसी खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र पशुसंवर्धन विभागातील ५० टक्के पदे रिक्त असल्यामुळे या संकटाचा सामना करताना अधिकारी-कर्मचाऱ्यांची तारांबळ उडणार आहे.

देश आणि राज्याच्या अनेक भागांत लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्ह्यात अद्याप या आजाराचा प्रादुर्भाव झालेला नाही. त्यामुळे हा प्रादुर्भाव जनावरांना होऊ नये आणि झाल्यास उपाययोजना करताना कोणतीही कमतरता राहू नये या दृष्टीने जिल्हा पशुसंवर्धन विभागाची जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विद्यानंद देसाई यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला तालुका पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत तालुकानिहाय पथके तयार करण्यात आली. याशिवाय एखाद्या भागात प्रादुर्भाव जाणवल्यास सर्वांनी सांधिकपणे काम करण्याचा निश्चय केला. या बैठकीनंतर पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची भेट घेऊन जिल्ह्यातील सर्व तपासणी नाक्यांवर जिल्ह्याबाहेरून होणारी जनावरांची वाहतूक थांबविण्यात यावी असे पत्र दिले.

त्यानुसार मंगळवारपासून (ता. १३) आंबोली, करूळ आणि फोंडा या तीन तपासणी नाक्यांवर वाहतूक थांबविण्यास सुरुवात झाली. चारा वाहतूकदेखील बंद करण्यात आली आहे. एकीकडे लम्पीबाबत उपाययोजनांसाठी पशुसंवर्धन विभाग दक्ष असला तरी विभागातील ५० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे संकटाचा सामना अधिकारी-कर्मचारी करणार कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पशुसंवर्धन विभागातील पदांची स्थिती

पदनाम एकूण पदे रिक्त पदे

पशुसंवर्धन अधिकारी ३३ ८

सहायक पशुधन अधिकारी ५१ २७

पशुधन पर्यवेक्षक ७२ ३६

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com