गोधन प्रदर्शनाला मिळतोय पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मोफत प्रदर्शन पाहण्यासाठी आज अखेरचा दिवस
गोधन प्रदर्शनाला मिळतोय पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Godhan ExhibitionAgrowon

पुणे : पुणे कृषी महाविद्यालयातील देशी गाय (Desi Gowansh) संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये गोधन प्रदर्शनास (Godhan Exhibition) दुसऱ्या दिवशी सुमधुर बासरी वादनाने दिमाखदारपणे सुरूवात झाली. ‘सकाळ अॅग्रोवन’ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रदर्शन शुक्रवारपासून (ता. २७) सुरुवात झाली. पुणे शहर, मावळ, मुळशी, खेड यासह विविध भागांतील पशुपालंकानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आज (ता. २९) प्रदर्शन पाहण्यासाठीचा अखेरचा दिवस आहे. याद्वारे दूधप्रक्रिया (Milk Processing), शेण गोमूत्रापासून तयार केलेली सेंद्रिय खते, गाईच्या विविध जाती, शासकीय योजना, महात्मा फुले कृषी विद्यापीठातील विविध तंत्रज्ञान सांगणारा स्टॉल अशा बाबी नागरिकांना पाहण्याची संधी आहे.

गोधन प्रदर्शनामध्ये देशी गोवंशाच्या अकरा जाती आणि त्यांची सविस्तर माहिती घेण्यामध्ये पशुपालकांनी चांगलाच रस दाखविला आहे. या शिवाय विद्यापीठाची फुले त्रिवेणी, संकरित गाई, म्हशीमध्ये पंढरपुरी, मुऱ्हा अशा जनावरांची माहिती, तसेच देशी गाईची मूळस्थाने, उपनावे, शारीरिक वैशिष्ट्ये, दूध उत्पादन याची वहीमध्ये आवर्जून नोंद करून घेताना पशुपालक दिसत होते. त्याचबरोबरीने पशुआहार व्यवस्थापन, चारा पिके, मुरघास, शेण व गोमूत्रापासून जैविक मिश्रण निर्मिती तंत्रज्ञानाची माहिती मिळाल्याने पशुपालकांना पूरक व्यवसायाची संधी लक्षात आली. तसेच महिला बचत गटांसाठी गोमय गणपती, पणत्या कुंड्या यांची निर्मितीची माहिती मिळत आहे. इंधन तसेच सेंद्रिय खतनिर्मितीमध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बायोगॅस संयत्राची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता दिसून आली.

प्रदर्शनातील स्टॉलमध्येही शेतकऱ्यांसह विद्यार्थी, पुणेकर नागरिकांनी चांगलीच गर्दी केली. यामध्ये प्रदर्शनात सहप्रायोजक असलेल्या कन्हैया अॅग्रो, चितळे डेअरी, बारामती अॅग्रो या मुख्य स्टॉलवर शेतकरी माहिती जाणून घेत होते. या शिवाय दूध प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रे, पशुखाद्य, पशुउपचार, पोर्टेबल बायोगॅस, छोटी शेतीचे अवजारे, सौर ऊर्जेची विविध उपकरणे, जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना, पुणे जिल्हा बॅंकेच्या शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या कर्ज योजना, पशुखाद्य निर्मिती यंत्र हे प्रदर्शनातील मुख्य आकर्षण ठरले. या शिवाय आजारी जनावरांना उचलण्यासाठीचे यंत्र, कंपोस्ट, जिवाणू कल्चर, अळिंबी संवर्धन, सेंद्रिय हळद, गूळ अशी विविध उत्पादनेदेखील पाहायला मिळत आहेत. तसेच शेती राखणदारीसाठी महत्त्वाचा श्वान असलेला मुधोळ हाऊंड देखील पशुपालकांचे लक्ष वेधून घेत आहे.

‘गो परिक्रमा’ ठरतेय आकर्षण
प्रदर्शनामध्ये ‘गो परिक्रमा’ हे मुख्य आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. यामध्ये अकरा जातीचे गोवंश एकाच ठिकाणी पाहायला उपलब्ध आहेत. तसेच त्यांची शास्त्रीय माहिती येथे उपलब्ध आहे. या ठिकाणी पुण्यातील जुनी सांगवी येथील सिंद्धात कांबळे या युवावादकांच्या सुमधुर बासरीवादनाने गो परिक्रमेत वेगळीच वातावरणनिर्मिती झाली आहे.

पशू उपचारासाठी औषधी वनस्पती
जनावरांच्या विविध आजारांवर उपचार करण्यासाठी विविध औषधी वनस्पती फायदेशीर ठरतात. या औषधी वनस्पतींची ओळख पशुपालकांना होण्यासाठी स्वतंत्र दालन मांडण्यात आले आहे. येथे गुळवेल, अश्वगंधा, शतावरी अशा विविध औषधी वनस्पतींसह त्यांची माहिती पत्रके नागरिकांना दिली जात आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com