शेळ्या, मेंढ्यांना पोटफुगी का होते?

पोटफुगी (ब्लोट) हा चयापचयाचा आजार आहे. पोटात जास्त प्रमाणात वायू तयार होऊन साठल्यामुळे हा आजार होतो. पोटफुगी ही सामान्यतः जनावरे आणि मेंढ्यांमध्ये दिसून येते, परंतु शेळीमध्ये कमी आढळते. प्रतिबंधासाठी ओल्या, कोवळ्या हिरव्या कुरणात दीर्घकाळ शेळी किंवा मेंढी चारू नये.
शेळ्या, मेंढ्यांना पोटफुगी का होते?
Animal CareAgrowon

डॉ. गणेश सावळे, डॉ. प्रेरणा घोरपडे, डॉ. जी. पी. भारकड

-----------------------------------

पावसाळा सुरू होताच जनावरांना बऱ्याच दिवसाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर हिरवा चारा (Green Fodder) मोठ्या व मुबलक प्रमाणात मिळतो. त्यामुळे जनावरे हिरवा चारा आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात खातात. जास्त प्रमाणात हिरवा चारा /खाद्य खाल्यामुळे पोटफुगीसारख्या (Stomach Bloating) घातक आजाराला बळी पडतात.

१) पोटफुगी (ब्लोट) किंवा रुमिनल टिम्पेनी हा एक चयापचयाचा आजार आहे. पोटात जास्त प्रमाणात वायू तयार होऊन साठल्यामुळे हा आजार होतो.

२) पोटफुगी होण्याचे मुख्य कारण म्हणजे हिरव्या गवतामध्ये असलेली प्रथिने आणि अत्यंत पचण्याजोगे खाद्य (कार्बोहायड्रेट) यांच्या जलद पाचक सूक्ष्मजीव किण्वनामुळे पोटामध्ये गॅस जास्त प्रमाणात तयार होतो.

३) पोटफुगी होण्याचे दुसरे कारण म्हणजे सामान्य उत्सर्जन प्रक्रियेत हस्तक्षेप होणे होय. पोटफुगी (ब्लोट)मुळे फुफ्फुसावर दाब निर्माण होऊन श्‍वसनाचा त्रास होतो. गंभीर असल्यास आणि जनावरांना त्वरित उपचार न मिळाल्यास श्वासोच्छवासामुळे किंवा हृदयाच्या विफलतेमुळे जनावरे दगावतात.

४) पोटफुगी ही सामान्यतः जनावरे आणि मेंढ्यांमध्ये दिसून येते, परंतु शेळीमध्ये कमी आढळते.

पोटफुगीचे प्रकार ः

फेसाळ फुगणे किंवा प्राथमिक फुगणे :

- सामान्यतः वायू पोटात रुमिनल किण्वन क्रियेद्वारे तयार होतो आणि अन्ननलिका आणि तोंडाद्वारे (ढेकर येणे) तसेच गुदद्वाराद्वारे आतड्यांद्वारे बाहेर पडतो.

- कोवळ्या हिरवे मऊ गवत, शेंगा, बारीक ग्रासलेले गवत किंवा ल्युसर्न खाद्यामध्ये जलद किण्वन क्रियेद्वारे मिथेन, कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड आणि इतर विषारी वायू उदा. हायड्रोजन सल्फाइड जे अन्ननलिका उत्सर्जनापेक्षा जास्त प्रमाणात तयार होतात. परिणामी, रुमेनमध्ये जास्त प्रमाणात स्थिर फेस तयार होतो, ज्यामुळे फेसाळ फुगणे उद्‌भवते.

दुय्यम फुगणे :

- हे अन्ननलिकेच्या अडथळ्यामुळे (प्लॅस्टिकचा गोळा, आंब्याची कोय, चेंडू, इत्यादी) किंवा कार्यात्मक समस्यांमुळे पोटामधील वायूचे विसर्जन होत नाही. प्लॅस्टिकच्या पिशव्या खाणारे प्राणी हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.

- स्पायरोसरका लुपाय, इसोफॅगसमध्ये गाठ, वाढलेल्या लिम्फ नोड्सचा दाब यासारखे अवयवांमध्ये वाढणारे किंवा, चेंडू, आंब्याची कोय, इत्यादींसारख्या कोणत्याही बाह्य वस्तूंमुळे होणारे अन्ननलिकेतील अडथळे (चोक) यामुळे गॅस शरीराबाहेर पडण्याच्या मार्गात अडथळा येतो. परिणामी पोटफुगी होते.

पोटफुगीची लक्षणे :

- पोटफुगीमुळे शेळी किंवा मेंढीमध्ये फारशी वैद्यकीय लक्षणे नसताना अचानक मरण पावते.

- पोटफुगीमध्ये डाव्या ओटीपोटाचा तीव्र विस्तार होऊन पोट हळूहळू डाव्या बाजूला पसरते/ वाढते आणि नंतर संपूर्ण ओटीपोटात वाढ होते. यामुळे शेळी किंवा मेंढीमध्ये अस्वस्थता (उठणे-बसणे), दात चावणे, ओटीपोटात दुखल्यामुळे पोटाकडे वारंवार बघणे, पोटावर लाथा मारणे, लाल गळणे, नैराश्य, वारंवार लघवी होणे किंवा अतिसार आणि मान लांबवणे ही लक्षणे दिसू शकतात.

- शेळी किंवा मेंढी अस्वस्थ होऊन श्‍वसनाचा त्रास वाढतो आणि त्वरित उपचार न मिळाल्यास जनावरे दगावतात.

प्रतिबंधक उपाय :

- उपचारापेक्षा प्रतिबंध महत्त्वाचा आहे. ओल्या, कोवळ्या हिरव्या कुरणात दीर्घकाळ शेळी किंवा मेंढी चारू नये.

- शेळी किंवा मेंढीला हळूहळू हिरव्या गवताची ओळख करून द्यावी. यासाठी शेळ्यांना चरायला सोडण्याआधी कोरडा चारा आणि त्यानंतर हिरव्या कुरणात एक किंवा दोन तास चरायला द्यावे.

- हिरव्या कुरणावर चरण्याची वेळ हळूहळू वाढवत न्यावी. जेणेकरून रुमेन आणि त्याची सूक्ष्म वनस्पती हिरव्या गवतांशी सुसंगत होईल.

-हिवाळ्यामध्ये शक्यतो गवतावर दवबिंदू असेपर्यंत चरायला सोडू नये. गवतांवरून दवबिंदू नाहीसे होईपर्यंत चरायला दररोज विलंब करावा.

- मोठ्या प्रमाणात धान्य केंद्रित आहार देणे टाळावे. तथापि, धान्य थोडे-थोड्या प्रमाणात वाढवले जाऊ शकते.

- खाण्यावर शिंपडलेले शेंगदाणा तेल प्रतिबंधात्मक उपाय म्हणून उपयुक्त आहे.

- खाद्यामध्ये अचानक बदल करू नका.

- चरित शेळी किंवा मेंढीसाठी अँटीफोमिंग घटकांचा धोरणात्मक वापर पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार करावा.

- शेळी किंवा मेंढीला सर्व वेळ मीठ आणि पाणी उपलब्ध करून द्यावे.

------------------------------

संपर्क ः

डॉ. गणेश सावळे, ९५९४१४५०५१

डॉ. प्रेरणा घोरपडे ९८३३३०४७२९

डॉ. जी. पी. भारकड ८०९७ ०७१२०१

(मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com