पशुसंवर्धन व दुग्धविकास प्रश्‍नांबाबत अभ्यास गट

मोर्फा बरोबर सेंद्रिय व विषमुक्त प्रश्‍नाबाबत बैठक
पशुसंवर्धन व दुग्धविकास प्रश्‍नांबाबत अभ्यास गट
Dairy Agrowon

पुणे : सेंद्रिय व विषमुक्त दूधनिर्मिती (Milk Production) टप्प्यातील प्रश्‍नाबाबत सविस्तर अभ्यास गटाची घोषणा करून अहवाल शासनाला तत्काळ दाखल करण्याची सूचना पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांनी दिल्या आहेत.

महा ऑरगॅनिक ॲण्ड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशनच्या (मोर्फा) पुढाकारातून बुधवारी (ता.११) मंत्रालयात पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्र्यांच्या दालनात व विषमुक्त दूधनिर्मिती व विकास या टप्प्यातील पशुसंवर्धन व दुग्ध विकासाच्या प्रश्‍नाबाबत उच्चस्तरीय बैठकीत मंत्री श्री केदार यांनी सूचना केली. या वेळी मोर्फाचे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे, पशुसंवर्धन विभागाचे सहसंचालक माणिक गुट्टे, कृषी विभागाचे उपसचिव ह. गो. म्हपणकर, दुग्धविकास विभागाच्या अवर सचिव श्‍यामबाला दबडे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शैलेश केंडे, दुग्ध विकास अधिकारी एस. आर. शिरपूरकर, डॉ. रवींद्र सावंत, मोर्फाचे संजय देशमुख, अमरजित जगताप, कैलास जाधव, डॉ. किशोर मठपती, डॉ. सोमनाथ माने आरे कॉलनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पवार उपस्थित होते.

सेंद्रिय व विषमुक्त पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाबाबतच्या ॲन्टोबायोटिक फ्री दुग्ध उत्पादन वाढविणे, एवन व एटू मिल्क दुधाबाबतचा फरक समजून ग्राहकांची फसवणूक थांबविणे, कायदेशीर नियम बनविणे, सेंद्रिय व विषमुक्त चिकन व अंडी निर्मितीबाबत नियम बनविणे बाबत सविस्तर अभ्यास करण्यासाठी पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांनी अभ्यास गट स्थापन करण्याची घोषणा बैठकीत केली. तसेच विषमुक्त व सेंद्रिय दूधनिर्मितीसाठी दहा, वीस, ५० व १०० गोठ्यांची निर्मिती करण्याची योजना अभ्यास गटाच्या शिफारशीनुसार शासन अमलात आणणार आहे.

मोर्फाच्या वतीने महानंद व आरेच्या मुंबई व पुण्यातील दुकानातून विषमुक्त व सेंद्रिय दूध विक्री करण्याची मागणी मंत्री केदार यांनी तत्काळ मान्य करून तशी कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच पशुपालकांना विभागाच्या योजना, लसीकरण व मार्गदर्शन मिळण्यासाठी लवकरात लवकर ॲप बनवावे अशा सूचना दिल्या.

बैठकीत झालेले निर्णय

- विषमुक्त व सेंद्रिय दूधनिर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या अडचणी व विभागाने करावयाचे काम याबाबत अभ्यासगट तत्काळ स्थापण्याचे ठरले.

- महानंद व आरेच्या जागा सेंद्रिय व विषमुक्त दूध विक्रीसाठी शेतकरी व गटांना देण्याचा निर्णय.

- पशुसंवर्धन विभाग योजनांची माहिती शेतकऱ्यांना कळण्यासाठी ॲप बनवणार.

समाजाला सुरक्षित दुधाची निर्मिती करून देणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या दुधामुळे लहान मुले, महिला यांच्या आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम होत असल्याने आता शासनाने सावध पावले टाकून विषमुक्त व सेंद्रिय दूधनिर्मितीसाठी पुढाकार घेतला. तर पुढील पिढी सुरक्षित राहणार आहे. त्या दृष्टीने ही बैठक अतिशय सकारात्मक झाली. -
कृषिभूषण अंकुश पडवळे, अध्यक्ष, मोर्फा
नवीन पिढीला दुग्ध व्यवसायात आणण्यासाठी व उत्पादन होणारे दूध आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित निर्मिती करण्यासाठी तरुणांना मार्गदर्शनाची गरज आहे. यासाठी शासनाने लवकर पावले उचलावीत.
डॉ. रवींद्र सांवत, संचालक, त्रिमूर्ती डेअरी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.