Animal Heatstroke : जनावरांतील उष्माघाताची लक्षणे, उपाययोजना

वातावरणातील तापमान वाढल्याने शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी जनावरांवर एक प्रकारचा ताण पडतो. उष्माघाताची तीव्रता जनावरांचे वय, प्रकार, उष्माघाताचा कालावधी, हिरव्या चाऱ्याची कमतरता यावर अवलंबून असते.
Animal Care Tips in Marathi
Animal Care Tips in Marathi Agrowon

डॉ. बाबासाहेब घुमरे, डॉ. विकास कारंडे

Heatstroke In Animal उन्हाळ्यातील जादा तापमान (Temperature), जास्त सापेक्ष आर्द्रता आणि वाऱ्याचा कमी वेग अशा वातावरणात जनावरे उष्माघाताची (Animal Heatstroke) लक्षणे दाखवितात.

उष्माघातामुळे जनावरांच्या शारीरिक क्रिया, आहार, पुनरुत्पादन आणि दूध उत्पादनावर (Milk Production) प्रतिकूल परिणाम होतो, त्यामुळे लक्षणे ओळखून उपाययोजना कराव्यात.

वातावरणातील तापमान वाढल्यास जनावरांच्या शरीराचे तापमान आणि वातावरणातील तापमान यामध्ये फरक पडतो. बाहेरील तापमानाला जुळवून घेण्यासाठी शरीरातून घाम स्रवत असतो.

लक्षणे

जनावरांच्या शरीरातील तापमानाचे नियोजन करणाऱ्या ग्रंथीमध्ये बिघाड होतो. शरीराचे तापमान ११० अंश फॅरानहाइट इतके होते.

जनावरांचे तोंड कोरडे पडते. नाकावरील त्वचा कोरडी पडते. त्यांचे नाडी, हृदयाचे ठोके तसेच श्‍वासोच्छ्वास जलदगतीने होतो.

डोळे निस्तेज दिसतात. जनावरे खाणे बंद करतात; परंतु पाणी जास्त पितात.

जनावर सुस्तावून चक्कर आल्याने जमिनीवर कोसळते, पाय झाडू लागते.

परिणाम

शरीरक्रिया ः जनावरांच्या चयापचय, रक्तप्रवाह, श्‍वसनाचा वेग, रक्त द्रवातील प्रथिने, प्रथिनासोबत संयोग होणाऱ्या आयोडीन, जीवनसत्त्व ‘अ’च्या प्रमाणात घट होते. चेतना संस्था उत्तेजित होऊन संप्रेरकाच्या निर्मितीमध्ये फेरबदल होतात, संतुलन बिघडते. यामुळे शरीरक्रिया विस्कळीत होऊन उत्पादनात घट होते.

आहार ः जनावरांची भूक कमी होऊन सतत तहान लागते, खाण्याच्या सवयीमध्ये बदल होतो. अन्नद्रव्यांची पाचकता कमी होऊन दूध उत्पादनामध्ये घट होते.

वासरांची वाढ ः वासरांची वाढ खुंटते. कालवडीचे पहिल्या विताचे वय वाढते.

आरोग्य ः प्रतिकारक क्षमता कमी होऊन आजारांचा प्रादुर्भाव होतो. मूत्रपिंड, मूत्राशय व यकृताच्या आकारामध्ये वाढ होते.

पुनरुत्पादन ः संकरित गायी व म्हशींमध्ये प्रजननचक्र अनियमित होऊन सुप्त माजाच्या प्रमाणात वाढ होते. माजाची तीव्रता, कालावधी व गर्भधारणेचे प्रमाण कमी होऊन दोन ऋतू काळातील अंतर वाढते. गर्भधारणा झालीच तर गर्भपात होतो. हंगामी वांझपणा येतो.

Animal Care Tips in Marathi
Animal Care : जनावरांना खारे पाणी दिल्यामुळे काय होतं?

उपाययोजना

शरीराच्या तापमानाचे संतुलन

उन्हाळ्यात वातावरणातील तापमान वाढल्याने जनावरांचे शरीर थंड ठेवणे आवश्यक असते. शरीराचे तापमान सांभाळण्यासाठी म्हशींना ३० मिनिटे दररोज पाण्यामध्ये डुंबण्याची व्यवस्था केली, तरी शरीराचे तापमान योग्य राखण्यास मदत होते. संकरित गाईस दिवसातून दोन वेळा धुवावे, खरारा करावा.

पाणी कमी असल्यास म्हशी तसेच संकरित गाईंच्या शरीरावर दुपारच्या वेळी १ ते २ बादल्या थंड पाणी शिंपडावे किंवा गाई-म्हशींच्या शरीरावर पोते ओले करून अंथरल्यास शरीराचे तापमान कमी करण्यास मदत होते.

जनावरे सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत गोठ्यामध्ये सावलीत ठेवावीत.

पाणी व्यवस्थापन

उष्माघातामध्ये जनावरांचे पाणी पिण्याचे प्रमाण ५० टक्के वाढते. स्वच्छ व थंड पाणी दिल्यास शरीरातील उष्णतेचे संतुलन चांगल्या प्रकारे होते. यासाठी जनावरांना दिवसातून ५ ते ६ वेळा स्वच्छ, थंड पाणी मुबलक प्रमाणात पाजावे.

पाण्याच्या हौदावर सावली करावी. जर हौद नसेल तर मोठ्या रांजणामध्ये पाणी साठवून ते जनावरांना पिण्यासाठी द्यावे.

Animal Care Tips in Marathi
Animal Care : जनावरांना खारे पाणी देताय?

गोठा व्यवस्थापन

जनावरांचे शारीरिक तापमान सर्वसामान्य राहण्यासाठी गोठ्यातील तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस असणे महत्त्वाचे असते.

मुक्त हवेशीर गोठ्याचा वापर करावा, यामुळे योग्य प्रकारचे वायूविजन होईल. गोठ्यातील जनावरांची संख्या मर्यादित ठेवावी.

गोठ्याच्या छताची उंची १५ ते १६ फुटांपेक्षा कमी नसावी. छतासाठी सिमेंटचे पत्रे वापरावेत. पत्र्याचे किंवा इतर धातूचे पत्रे असल्यास त्यावर उन्हाळ्यात गवताचे, पाचटाचे, पालापाचोळ्याचे आवरण घालावे किंवा पाण्याचे फवारे लावावेत. पत्र्याच्या वरील बाजूस पांढरा रंग लावावा. यामुळे उष्णतेचे शोषण न होता परावर्तन होईल व गोठ्यातील वातावरण थंड राहील.

उन्हाळ्यामध्ये उष्ण वारे पश्‍चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. यामुळे जनावरांना उष्ण झळा बसतात. आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. हे टाळण्यासाठी गोठ्याच्या पश्‍चिमेस हिरवीगार झाडांची ताटी असल्यास उष्ण झळांचा बंदोबस्त होतो. गोठ्यातील वातावरण थंड राहण्यास मदत होते.

शक्य असल्यास गोठ्यामध्ये पाण्याच्या फवाऱ्याची व्यवस्था करावी, तसेच गोठ्यातील खुल्या जागेत, दरवाजा आणि भिंतींवर पोते ओले करून बांधावे, त्यामुळे गोठ्यातील आतले तापमान नियंत्रित राहील.

आहार व्यवस्थापन

उन्हाळ्यात चारा व खाद्यामध्ये बदल करावा. दैनंदिन चारा एकावेळी वापरण्याऐवजी ३ ते ४ वेळा विभागून द्यावा. चारा वैरणीमध्ये विविधता ठेवावी. वेगवेगळ्या प्रकारचा चारा मिश्रण कुट्टी करून द्यावा. खुराक देताना शरीरात जास्त ऊर्जा निर्माण होईल असे अन्नघटक कमी करावेत. उदा. मका कमी करावा.

दिवसा जनावरांना मका, कडवळ, गजराज, हायब्रीड नेपिअर, बरसीम, लसूण घास,

चवळी यांसारखा ताजा व पालेदार हिरवा

चारा द्यावा. त्यामुळे शरीरात थंडावा निर्माण होऊन उष्णतेचे नियमन होते. आहारातील कोरड्या, सुक्या वैरणीचे प्रमाण कमी करावे. कारण हा चारा शरीरात जास्त उष्णता निर्माण करीत असतो. शरीरात जास्त प्रमाणात तयार झालेली उष्णता बाहेर टाकण्यास बराच वेळ लागतो.

उन्हाळ्यात कोरडा खुराक खाऊ घालू नका,

तो भिजवून खाऊ घालावा. उन्हाळ्यात वाळलेल्या चुऱ्याची कुट्टी व खुराक एकत्र करून ४ ते ५ तास भिजत ठेवून त्यानंतर जनावरांना खाऊ घालावा.

जनावरांना कोरडा व सुका चारा रात्रीच्या वेळात द्यावा. उन्हाळ्यात रात्रीच्या वेळात जनावरे जास्त चारा खातात. कारण रात्रीच्या वातावरणात थंडावा जास्त असतो. यामुळे कोरडा चारा जनावरांकडून खाल्ला जातो. अशा प्रकारचा

चारा जनावरांकडून जास्तीत जास्त पचविला जातो.

हवेचे तापमान ९० अंश फॅरानहाइटपेक्षा जास्त झाल्यावर यकृतातील जीवनसत्त्व ‘अ’चा निचरा होतो. संकरित जनावरांमध्ये उष्णतेमुळे लॅक्टिक आम्लाचे प्रमाण वाढून जास्त कॅल्शिअम क्षारांची जरुरी पडते.

यासाठी जीवनसत्त्व ‘अ’चे इंजेक्शन तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जनावरांना द्यावे. खाद्यातून वाढीव क्षार मिश्रण द्यावे. हिरव्या चाऱ्यात जीवनसत्त्व - अ आणि आवश्यक क्षार अधिक प्रमाणात असतात.

उन्हाळ्यामध्ये पोटॅशिअम क्षाराची जरुरी जास्त वाढते. बेरियम व सेलेनियम हे क्षार जनावरांना अतिशय अल्प प्रमाणात लागतात; परंतु या क्षारांच्या उपलब्धतेमुळे जनावरांना उन्हाळ्याचा त्रास कमी होतो. या क्षारांची कमतरता ज्या मातीमध्ये असेल, त्यातील चारा पिकांमध्येही या क्षारांची कमतरता आढळते व जनावरांना ती उपलब्ध होत नाही.

उन्हाळ्याचा जास्त त्रास होणाऱ्या म्हशी तसेच संकरित गाई यांची तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार रक्त तपासणी करून या क्षारांची कमतरता असेल तर हे क्षार तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने क्षार मिश्रणातून द्यावे. याचे कारण म्हणजे हे क्षार अतिशय अल्प प्रमाणात जनावरांना लागतात. जर याचे प्रमाण जास्त झाले तर जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात.

- डॉ. बाबासाहेब घुमरे,

९४२१९८४६८१,

- डॉ. विकास कारंडे,

९४२००८०३२३

(क्रांतिसिंह नाना पाटील,

पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com