Bail Pola : बैलपोळा साजरा करताना ही काळजी घ्या?

बैलांच्या या कष्टाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात "बैलपोळा" सण साजरा केला जातो.
Bail Pola
Bail PolaAgrowon

शेतीत कितीही यांत्रिकीकरण झाले तरी शेतीतील कामासाठी बैलाचे महत्व आजही कमी झालेले नाही. शेतकऱ्याच्या उत्पन्नात त्याच्या सचोटीइतकाच त्याच्या बैलांच्या कष्टाचा मोलाचा वाटा असतो. बैलांच्या या कष्टाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात "बैलपोळा" (Bail Pola) सण साजरा केला जातो. पोळा हा सण श्रावण महिन्यातील पिठोरी अमावस्येला येतो, महाराष्ट्रातील काही भागात भाद्रपद पोळा साजरा केला जातो ज्याला "कारहूनी"म्हणतात. कर्नाटकातील शेतकरी जेष्ठ महिन्यात मूळ नक्षत्रावर बेंदूर साजरा करतात.

Bail Pola
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार

बैलपोळ्या दिवशी बैलांना अंघोळ घालून झुलींनी सजवले जाते. शिंगांना रंगवले जाते, गळ्यात हार घातले जातात, विधीवत पूजा केली जाते. हा सण साजरा करताना काही रूढी- परंपरा पार पाडताना होणाऱ्या चुकांमुळे बैलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतात. पोळ्याच्या परंपरा पार पाडताना होणारी इजा व त्यावरील उपाय याविषयी ताकविकी, ता. जि. उस्मानाबाद येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रविण पतंगे यांनी पुढील माहिती दिली आहे.

१) बैलांना घातली जाणारी अंघोळ

सध्या महाराष्टात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे त्यामुळे नद्या, नाले, ओढे यात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. शेतकरी या पाणीसाठ्याला बैलांच्या अंघोळीसाठी प्राधान्य देतो. हे साठलेले पाणी बऱ्याच जिवाणू, विषाणू, परोपजीवी व त्यांची अंडी यांचे वस्तीस्थान असते. बैल या साठ्यामध्ये अंघोळीस आणल्यावर हे दूषित पाणी पितात व संसर्गास बळी पडू शकतात. इतर बैल या पाण्यात धुतल्यानंतर त्यांच्या शरीरावरील गोचीड,उवा, लिखा व त्यांची अंडी या पाण्यात मिसळून जातात व निरोगी बैलांना त्याचा प्रादुर्भाव दिसून येतो. नुकत्याच झालेल्या पेरणीदरम्यान व मशागत करताना बहुतांश बैलांना जखमा झाल्यामुळे या जखमातून दूषित पाण्यातील जंतू शरीरात प्रवेश करून संसर्गाची शक्यता बळावते. त्यामुळे अंघोळीसाठी जलसाठ्यातील, गढूळ, दूषित पाण्याचा वापर प्रकर्षाने टाळावा. स्वच्छ पाणी वापरावे. शरीरावरील जखमांवर उपचारासाठी प्रतिजैवकांची योग्य मात्रा पशूवैद्यकाकडून टोचून घ्यावी. बैल जर सार्वजनिक जलस्रोताच्या संपर्कात आले असतील तर बाह्यपरोपजीवीनाशक औषध शरीरावर फवारावे आणि बैलाला जंतनाशक पाजावे.

२) शिंग साळणे व शिंग रंगवणे

बैल जास्तीत-जास्त आकर्षक दिसावे म्हणून शिंगांणा आकार देण्यासाठी ते साळण्याची पद्धत असते. शिंग साळण्यासाठी वापरण्यात येणारी वस्तू निर्जंतुक नसल्यास जखम होऊन शिंगाच्या कर्करोगाचा धोका उद्भवतो. शिंगाच्या कर्करोगावर शिंग समूळ कापणे हा एकमात्र उपाय पशुवैद्यकाकडे राहतो. परिणामी शिंग नसलेल्या बैलाची बाजारातील किंमत कमी होते. शिंग साळण्यासाठी वापरण्यात येणारी वस्तू गंजलेली असेल तर धनुर्वात होण्याची शक्यता असते. शिंग रंगवण्यासाठी ऑइल पेंट्सचा वापर केला जातो. या पेंट मध्ये झिंक ऑक्साइड, टीटॅनियम डायऑक्साइड, कॅडमीअम सारखे त्वचेसाठी घातक असणारी रसायने असतात. यावर उपाय म्हणजे शिंग साळणे शक्यतो टाळावे आणि शिंग रंगवण्यासाठी नैसर्गिक रंगाचा वापर करावा. साळताना जखम झाली असल्यास उपचार करून धनुर्वात रोगप्रतिबंधक लस टोचून घ्यावी.

Bail Pola
बैल बाजारात दोनच दिवसात सहाशे बैलांची विक्री

३) तेल आणि अंड्याचे मिश्रण पाजणे

बैल तजेलदार, मांसल व धष्टपुष्ट दिसावे म्हणून तेलातून अंडी पाजली जातात. हे मिश्रण चुकीच्या पद्धतीने पाजताना बैल ठसकतात आणि मिश्रण अन्ननलिकेऐवजी श्वासनलिकेतून फुफ़ुसात जाते. त्यामुळे फुफ़ुसाचा दाह म्हणजे न्यूमोनिया होऊन जनावर दगाऊ शकते. त्यामुळे मिश्रण पाजताना योग्य काळजी घ्यावी ज्याने जनावर ठसकणार नाही. तेल, अंडी यात स्निग्ध पदार्थ व प्रथिने असतात जी स्नायूंना बळकट करण्यासाठी व वजन वाढवण्यास उपयुक्त ठरतात यांना पर्याय म्हणून तेलबियांच्या पेंडीचा वापर करावा. जेणेकरून हेतू साध्य होईल आणि धोकाही टळेल.

४) पिठाचे गोळे व पोळ्या चारणे

पोळ्याच्या दिवशी व त्याआधी बैलांना ज्वारीच्या पिठाचे गोळे व नैवेद्य म्हणून पूरणपोळ्या,कडधान्याचा भरडा चारला जातो. प्रमाणाबाहेर चारल्या जाणाऱ्या ऐवजामुळे बैलाला पोटाच्या व्याधी निर्माण होतात. रक्तातील लॅक्टिक ऍसिडचे प्रमाण वाढून जीवाला धोका निर्माण होतो. पोटाच्या व्याधीमुळे बाधित जनावर पोटाला लाथा मारते, दात खाते, जीभ चावते, चारही पाय वर करून उजव्या बाजूस लोळते. अशी लक्षणे दिसून आल्यास तात्काळ पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावे. प्राथमिक उपचार म्हणून पाणी व खाण्याच्या सोड्याचे मिश्रण पाजावे. पाजताना जनावर ठसकणार नाही याची काळजी घावी.

५) बैलांची मिरवणूक

पोळ्यादिवशी संध्याकाळी सजवलेल्या बैलांची वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. मिरवणूकीत बऱ्याच ठिकाणी बैल पळवले जातात अश्या वेळी अनेक ठिकाणी दुर्घटना घडून बैल गंभीर जखमी होतात. काही बैलांना-वेगाने पळण्याची सवय नसते म्हणून ती उधळतात आणि त्यांच्या आतड्याला पीळ पडण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे पोळा उत्साहात साजरा करावा पण सोबतच आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com