Artificial Insemination : तंत्रज्ञान प्रवास : कृत्रिम रेतन ते आयव्हीएफ

Horticulture Technology : ‘आयव्हीएफ’ तंत्रज्ञानामध्ये गाई-म्हशीच्या बीजांड कोषातून स्त्रीबीज काढून प्रयोगशाळेत त्याचे फलन केले जाते. त्यासाठी लिंग वर्गीकृत रेतमात्रांचा वापर केला जातो. त्यामुळे मादी वासरे जन्माला येण्याचे प्रमाण ९० टक्के असू शकते.
Artificial Insemination
Artificial Insemination Agrowon

डॉ. व्यंकटराव घोरपडे

महाराष्ट्रात झालेल्या धवलक्रांतीच्या पाठीमागे राज्यात राबवलेल्या कृत्रिम रेतन कार्यक्रमाचे फार मोठे योगदान आहे. आज अगदी खेड्यापाड्यांतील गरिबांच्या झोपडीपर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचले आहे. यामध्ये पशुसंवर्धन विभागासह सहकारी दूध संघ, जेके ट्रस्ट, बाएफ, इतर सेवाभावी संस्था व खासगीरीत्या कृत्रिम रेतन देणारे सेवादाते यांचे फार मोठे योगदान आहे.

राज्यात कृत्रिम रेतनास १९४८ मध्ये मिळालेल्या मंजुरीनंतर १९५० मध्ये प्रत्यक्ष कृत्रिम रेतनास सुरुवात झाली. दूध उत्पादन वाढीसाठी सुरुवातीला गाईमध्ये साहिवाल, गीर, रेड सिंधी व म्हशीमध्ये सुरती व मुऱ्हा जातीच्या वळूचा वापर केला गेला.

गावठी गाई-म्हशीमध्ये आनुवंशिक सुधारणा करून दूध उत्पादन वाढीचा प्रयोग केला गेला. नंतर मग विदेशी दुधाळ जातींच्या एचएफ व जर्सी यांचा वापर सुरू झाला. पुढे १९६८ मध्ये परदेशातील गोठीत रेत मात्रा आयात करून त्याचा वापर केला जो किफायतशीर व फलदायी ठरला.

परिणामी आज मितीला आपण संकरित गायीचे दूध उत्पादन ५.१२ लिटरवरून ९.१५ लिटर पर्यंत पोहचवले. देशी गाईच्या बाबतीत १ लिटर वरून २.२५ लिटरपर्यंत व म्हशीच्या बाबतीत २.५ लिटरवरून ४ लिटरपर्यंत प्रतिदिन आपण उडी मारली आहे.

प्रति जनावर दूध उत्पादन वाढ केल्याशिवाय उत्पादन खर्च कमी होणार नाही. कमी उत्पादन देणाऱ्या जनावरावरील खर्च कमी करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने आनुवंशिक सुधारणा कार्यक्रम, उच्च वंशावळीच्या वीर्य कांड्यांचा वापर, लिंगनिर्धारित रेतमात्रांचा वापर यासह अनेक योजना कार्यान्वित केल्या.

Artificial Insemination
Animal Care : कृत्रिम रेतन यशस्वी होण्यासाठी ही माहिती आवश्यक

परंतु ज्या वेगाने उच्च वंशावळीची जनावरे निर्माण व्हायला हवीत त्या प्रमाणात होताना दिसत नाहीत. या सर्व योजनांसह आणखी एक योजना प्रयोग म्हणून ‘आयव्हीएफ’ (इन विट्रो फर्टिलायझेशन अर्थात शरीर बाह्य फलन) तंत्रज्ञानातून भ्रूण निर्मिती व त्याचे प्रत्यारोपण करण्यासाठी देशभर प्रयोग आणि प्रयत्न सुरू केले आहेत.

या तंत्रज्ञानामध्ये गाई-म्हशीच्या बीजांड कोषातून स्त्रीबीज काढले जाते. प्रयोगशाळेत त्याचे फलन केले जाते. त्यासाठी लिंग वर्गीकृत रेतमात्रांचा वापर केला जातो. त्यामुळे मादी वासरे जन्माला येण्याचे प्रमाण ९० टक्के असू शकते.

ते फलित स्त्रीबीज नंतर इनक्यूबेटरमध्ये सात दिवस ठेवून ८-९ दिवसांपूर्वी माजावर येऊन गेलेल्या किंवा माज नियमन केलेल्या गाई-म्हशीच्या गर्भाशयात त्याचे प्रत्यारोपण केले जाते.

साधारण अशा या तंत्रज्ञानात बीजांड हे उच्च वंशावळीच्या गाई-म्हशीचे व ते फलित करण्यासाठी उच्च वंशावळीच्या वळूच्या वीर्याची गरज लागते जे या ठिकाणी फार महत्त्वाचे आहे.

तुलनात्मक अभ्यासातून असे दिसून आले आहे की नैसर्गिक संयोगासाठी वापरावयाच्या वळूपासून उच्च वंशावळीच्या गाई-म्हशी निर्माण करताना असा वळू ठेवणे सर्वांना परवडणार नाही आणि एकच गाय एका वेळी गाभण राहू शकणार आहे.

कृत्रिम रेतनाच्या बाबतीत वळूची आनुवंशिकता विचारात घेता येते. त्यामुळे एकूणच उच्च वंशावळीच्या गाई-म्हशी निर्माण व्हायला बराच कालावधी लागतो.

बहुबीज स्खलन व भ्रूण प्रत्यारोपण (MOET) मध्ये आदर्श दाता गाय किंवा म्हैस ही उच्च दर्जाच्या पुनरुत्पादन क्षमतेत आणि आरोग्यामध्ये असायला हवी. त्याचबरोबर ही प्रक्रिया थोडीशी महाग पण आहे आणि संपूर्ण गर्भाशयाचा यात वापर केला जातो.

त्यामानाने बाह्य फलन व भ्रूणप्रत्यारोपण तंत्रज्ञान हे प्रगत तंत्रज्ञान आहे. यामध्ये दोन्हीही नर व मादी यांचा पूर्ण आनुवंशिक इतिहास माहीत असतो. त्यामुळे नर व मादी दोन्हीकडील आनुवंशिक गुणांचा पूर्ण उपयोग होतो. कमी कालावधीत सर्व गायी-म्हशी नियोजनबद्ध पद्धतीने गाभण राहू शकतात.

तसेच या ठिकाणी फक्त स्त्रीबीजांचा वापर होतो. दाता गाय व्याल्यानंतरच्या चार महिन्यांपासून ते चार-पाच महिने गाभण असताना देखील गर्भास कोणताही धक्का न लावता स्त्रीबीज संकलित करून उपयोगात आणता येऊ शकतात.

यामध्ये कमीत कमी प्रति गाय प्रति वर्ष सरासरी गर्भधारणेची संख्या १५-२० आहे, जी नैसर्गिक संयोगामध्ये व कृत्रिम रेतनामध्ये फक्त एक आहे आणि बहुबीज स्खलन व भ्रूण प्रत्यारोपण मध्ये ७-८ आहे.

साधारणपणे जगामध्ये १८ व्या शतकाच्या शेवटी शरीर बाह्य फलन या तंत्रज्ञानाचा संशोधनास सुरुवात झाली. नंतर १९३० मध्ये पहिल्यांदा 'ससा' या प्राण्यात त्याचा प्रयोग झाला पण तो अयशस्वी ठरला.

पुढे त्याला गती मिळाली आणि देशात सर्वांत पहिले म्हशीमध्ये हा प्रयोग एनडीआरआय कर्नाल येते यशस्वी झाला आणि 'प्रथम' नावाच्या वासराचा जन्म १९९० मध्ये झाला. नंतर २०१२ मध्ये साहिवाल या प्रजातीमध्ये 'होली' या वासराचा जन्म या तंत्रज्ञानाद्वारे झाला. पुढे ५ सप्टेंबर २०१७ मध्ये डॉ. श्याम झंवर यांच्या टीमने हा प्रयोग थारपारकर या गाईमध्ये यशस्वीपणे केला.

आता फेब्रुवारी २३ अखेर देशात एकूण १८६७ वासरे या तंत्रज्ञानाने निर्माण झाली आहेत, त्यांपैकी आपल्या राज्यात १४३५ वासरे निर्माण करण्यात आली आहेत. यात गोदरेज मॅक्सी मिल्क, नाशिक या संस्थेचा मोठा वाटा आहे. त्यांनी या तंत्रज्ञानाद्वारे १३८८ वासरांना जन्माला घातले आहे.

Artificial Insemination
लिंग विनिश्‍चित रेतन तंत्रातून तयार झाल्या उत्कृष्ट कालवडी

२०१८ पासून मोठ्या प्रमाणात पण ठरावीक प्रयोगशाळांमधून ह्या तंत्रज्ञानाद्वारे वासराची निर्मिती होत आहे. अगदी अलीकडे नोव्हेंबर २०२२ पासून ही वासरे दूध उत्पादनात येऊ लागली आहेत. गोदरेज मॅक्सी मिल्क या नाशिकच्या प्रक्षेत्रावरील दूध उत्पादन वाढही लक्षणीय आहे.

२०१८ मधील सरासरी १०.५ किलो दूध उत्पादनावरून सध्या २६.३ किलो दूध उत्पादन वाढ नोंदवली आहे, जी खूप आशादायी आहे. अजूनही अनेक वासरे दुधात येत आहेत, त्यावेळी एकूणच अंदाज बांधता येणार आहे. तथापि एकंदरीत या तंत्रज्ञाचा वापर जगात सगळीकडे होत आहे.

आमचे मित्र डॉ. पांडुरंग नेटके हे ऑस्ट्रेलियामध्ये एका मोठ्या प्रक्षेत्रावर काम करतात. त्यांच्या प्रक्षेत्रावर १२०० वासरे या तंत्रज्ञानाद्वारे जन्माला आली आहेत. अजून १००० गाई या तंत्रज्ञानाद्वारे गाभण राहिल्या आहेत. सध्या असणारे सरासरी ४० लिटर दूध उत्पादन हे प्रतिदिन प्रतिगाय ४५ लिटरपर्यंत जाण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. एकूणच या तंत्रज्ञानामुळे प्रतिजनावर दूध उत्पादन वाढ ही निश्चित होणार आहे आणि ती वेगाने होईल, यात शंका नाही.

(लेखक पशुसंवर्धन विभागातील सेवानिवृत्त सहायक आयुक्त आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com