
चाकण ः खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील महात्मा फुले बाजारात शनिवारी (ता. १७) भरलेल्या बाजारात ९० म्हशी (Buffalo Market) विक्रीसाठी आल्या होत्या. त्यापैकी साठ म्हशींची विक्री झाली. सुमारे एक कोटी सत्तर लाख रुपयांची उलाढाल झाली, अशी माहिती खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली.
लम्पी स्कीनच्या प्रादुर्भावामुळे सप्टेंबरपासून चाकण (ता. खेड) येथील जनावरांचा बाजार बंद होता. खेडच्या प्रांताधिकाऱ्यांनी बाजार समितीच्या मागणीनुसार म्हशींचा बाजार भरविण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे शनिवारी (ता.१७) फक्त म्हशींचा बाजार सुरू झाला आहे. या बाजारात व्यापारी, शेतकरी यांनी म्हशी विक्रीसाठी आणल्या होत्या.
चाकण बाजार हा राज्यात जनावरांचा बाजार विशेषतः म्हशींचा बाजार म्हणून प्रसिद्ध आहे. बाजारात विविध प्रकारच्या विशेषत: अधिक दूध देणाऱ्या जाफराबादी, तोडा, नागपुरी, निलीरावी, पंढरपुरी, बन्नी, भदावरी, मराठवाडी, मुऱ्हा, मेहसाणा, सुरती आदी जातींच्या म्हशींना मागणी असते. या म्हशींना अगदी एक ते दीड लाख रुपयापर्यंत किंमत मिळाली. म्हशींचा बाजार सुरू झाल्याने शेतकरी, व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
याबाबत शेतकरी कैलास मेदनकर म्हणाले, ‘‘म्हशींचा बाजार बंद असल्याने शेतकरी, व्यापारी विशेषतः गोठ्यावरच म्हशीची खरेदी विक्री करीत होते. शेतकरी, व्यापारी अधिक दूध देणाऱ्या म्हशीची मागणी करतो व त्या म्हशी गोठ्यात ठेवतो. दूध देणाऱ्या म्हशींना अधिक किंमत असते. म्हशी पाळून दूध धंदा करण्याकरिता अधिक दूध देणाऱ्या म्हशी विकत घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. त्यामुळे त्या म्हशींच्या किमती अधिक असतात. म्हशींचा बाजार सुरू झाल्याने म्हशीच्या बाजारातील उलाढाल वाढणार आहे.’’
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.