
डॉ. संजय भालेराव, डॉ. विकास सरदार, डॉ. समाधान गरंडे
Milch Animal Bypass Fat दूध व्यवसायातील (Dairy Farming) यश हे चांगले व्यवस्थापन तसेच उत्तम दर्जाच्या आहारावर (Animal Feed) अवलंबून असते. जास्त दूध देणाऱ्या गाई व म्हशीचे व्यवस्थापनही तितकेच काळजीपूर्वक करावे लागते.
वेतातील विण्याअगोदरचे ३० दिवस आणि व्यायल्यानंतरचे सुमारे १०० दिवस असे महत्त्वाचे १३० दिवस जर आपण त्यांची ऊर्जेची गरज पूर्ण केली तर त्या अनुषंगाने येणाऱ्या अनेक आजारांपासून बचाव करता येतो.
जनावराच्या क्षमतेप्रमाणे जास्तीत-जास्त दूध व फॅट मिळवता येते तसेच गाय किंवा म्हैस पुन्हा गाभण राहण्यासाठी मदत होते. जेणेकरून वर्षाला एक वासरू ही संकल्पना साध्य करता येऊ शकते.
जास्त दूध देणाऱ्या जनावरांमध्ये ऊर्जेची गरज तितकीच जास्त असते. त्यामुळे वाढती ऊर्जेची गरज पूर्ण करणे, शरीरातील ऊर्जेचे संतुलन व चयापचय क्रिया सुरळीत करणे आवश्यक ठरते.
वाढत्या ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी बायपास फॅट तंत्राचा वापर करावा. रवंथ करणाऱ्या जनावरांचे पोट चार कप्प्यामध्ये विभागलेले असते. हे चार कप्पे म्हणजे कोठी पोट, पडदे पोट, जाळी पोट, पडदे पोट आणि खरे पोट होय.
बायपास फॅट हे असे खाद्य आहे जे जनावरांच्या कोठी पोट म्हणजे रुमेनमध्ये न जाता सरळ खऱ्या पोटात म्हणजे अॅबोमॅसममध्ये पचन केले जाते. कोठीपोटातील सूक्ष्म जीवाणू आत येणाऱ्या पदार्थांचे विघटन करत असतात.
बायपास फॅटचे विघटन कोठीपोटामध्ये होत नाही. बायपास फॅटचे पचन जनावरांच्या कोठीपोटात न होता, सरळ आतड्यामध्ये होते. परिणामी त्यापासून मिळणारी ऊर्जा ही दूध उत्पादनासाठी वापरली जाऊन, दूध उत्पादनात वाढ झालेली दिसून येते.
आपल्याला सुरवातीच्या १०० ते १२० दिवसांत नफा कालावधीचा फायदा घ्यायचा असेल तर दुभत्या जनावरांची ऊर्जेची गरज भागवावी लागेल. जेणेकरून त्याचे पुढील जीवन चक्र सुरळीत चालेल. त्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनावरांना बायपास फॅट पुरवणे आवश्यक आहे.
सुका चारा, ओला चारा आणि कमी दर्जा असलेल्या गोळी पेंडीतून दुभत्या जनावरांच्या ऊर्जेची गरज भागवली जाऊ शकत नाही. हे लक्षात घेऊन बायपास फॅट यांसारख्या पूरक अन्न घटकांचा वापर केला पाहिजे.
गाई,म्हशीमध्ये दूध उत्पादन, प्रजननासाठी लागणारी ऊर्जा बायपास फॅटद्वारे उपलब्ध होते. दुभत्या जनावरांतील ऊर्जेची गरज पूर्ण करण्याकरिता स्टार्च किंवा कर्बोदकांनीयुक्त असे मका, गहू किंवा तत्सम पिष्टमय पदार्थ वाढल्यास पोटामध्ये तीव्र आम्लता वाढते.
दूध उत्पादन कमी होते त्यामुळे, अशा पदार्थांपेक्षा अडीच पट जास्त ऊर्जा देणाऱ्या बायपास फॅटचा वापर खाद्यात करणे फायद्याचे ठरते.
गाभण काळातील महत्त्वाचे दिवस
पशुपालकाने हे लक्षात घ्यायला हवे की, जरी आपली गाय किंवा म्हैस या काळात दूध देत नसली तरी ती स्वत:ला पुढच्या वेतासाठी तयार करीत असते. या काळात त्यांची ऊर्जेची गरज भागवली गेली पाहिजे. असे न झाल्यास पुढल्या वेतात त्यांचे दुग्ध उत्पादन जवळपास २५ ते ३० टक्क्यांनी कमी होते.
२) ऊर्जेच्या कमतरतेमुळे गाय, म्हैस विल्यानंतर दुग्ध ज्वर, यकृताचा आकार वाढणे, लंगडेपणा, पोटात पीळ पडणे, जार पडण्यास विलंब होणे किंवा न पडणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
गाभण काळातील शेवटच्या महिन्यात गाय किंवा म्हैस दूध देत नाही, यावेळेस ती पुढील वेताची तयारी करीत असते. त्यामुळे या काळातच जर तिला योग्य आहार दिला गेला तर तिची प्रसूती व्यवस्थित होऊन दूध उत्पादनात सातत्य राहते.
शेवटच्या ३ महिन्यात गर्भाशयातील वासराची ६५ टक्के वाढ होते. त्यामुळे गाभण काळात प्रथिनांच्याबरोबरच ऊर्जेची गरज पूर्ण करणेसाठी बायपास फॅट देण्याची गरज आहे.
यामुळे गर्भाशयातील वासराची योग्य वाढ होते. गायीच्या शरीरात चरबीच्या रूपाने ताकद साठून राहते. तिचा प्रकृती अंक (बॉडी स्कोअर) ३.५ ते ४ यादरम्यान राहण्यास मदत होते.
व्यायल्यानंतरचे महत्त्वाचे दिवस
व्यायल्यानंतर ३५ ते ४५ दिवसापर्यंत गाय-म्हशीचे दूध उत्पादन वाढत जाते. याकाळात जितके जास्त दूध आपल्याला मिळवता येईल तितके त्या वेतातील एकूण दूध उत्पादन वाढते. या काळातच जनावरांमध्ये ऊर्जेची कमतरता (निगेटिव्ह एनर्जी) दिसून येते.
तिचा प्रकृती अंक (बॉडी स्कोअर) खालावतो कारण दुधावाटे पोषक द्रव्ये शरीराबाहेर निघून जातात. शरीरातील चरबी यकृतावर (लिव्हर) जमा होऊन फॅटी लिव्हर आजार होण्याची शक्यता बळावते.
शरीरासाठी लागणारे ग्लुकोज यकृत पूर्ण क्षमतेने तयार करू शकत नाही. यामुळे गाय एकूणच तिच्या क्षमतेपेक्षा कमी दूध व फॅट उत्पादन करते.
यामुळे जनावरांमधील ऊर्जेची कमतरता बायपास फॅटच्या स्वरूपात भरून काढल्यास पूर्ण क्षमतेने दूध व फॅट उत्पादन घेणे शक्य होते.
व्यायल्यानंतर दुभत्या जनावरांमध्ये ऊर्जेची गरज भरपूर प्रमाणात वाढते. कारण, त्यांच्या दुभत्या काळातील पहिले १०० ते १३० दिवस हे सर्वात जास्त दूध देण्याचे असतात.
गाय, म्हशींच्या गोळीपेंडमध्ये बायपास फॅटचा वापर
गोळी पेंडमध्ये बायपास फॅट वापरणे फायद्याचे ठरते. कारण पारंपरिक पद्धतीने जेव्हा गोळी पेंड बनवितात तेव्हा त्यामध्ये फॅटचे प्रमाण वाढविण्यासाठी राइस पॉलिशचा वापर करतात.
राइस पॉलिशमध्ये असणाऱ्या फॅटमध्ये मुक्त फॅटी आम्लाचे प्रमाण जास्त असल्यामुळे गोळी पेंडमध्ये एक रासायनिक प्रक्रिया घडून काही विषारी पदार्थ तयार होतात.
त्यामुळे गोळीपेंडीला एका प्रकारचा उग्र वास येतो, सोबतच बाकीच्या अन्नघटकांच्या पचनाची टक्केवारी सुद्धा कमी होते. गोळीपेंडीमध्ये फॅटचे प्रमाण वाढविण्यासाठी बायपास फॅट हा सर्वोत्तम पर्याय आहे.
राइस पॉलिशमधील फॅट बऱ्याच प्रमाणात कोठी पोटात विघटित होते. हवी असलेली ऊर्जा मिळत नाही. दुभत्या जनावरांच्या आहारात उन्हाळ्यात प्रती दिन एक लिटर दुधामागे २० ग्रॅम बायपास फॅट वापरल्यास उन्हामुळे आलेला ताण कमी होण्यास मदत होते. दुग्ध उत्पादनात २० टक्क्यांपर्यंत वाढ आणि दुधामधील फॅटचे प्रमाण वाढवण्यास मदत होते.
बायपास फॅटचे कार्य
गाई-म्हशींना दिले जाणारे खाद्य, चारा पचवून देण्याचे काम कोठीपोटातील कोट्यवधी जीवजंतू करतात, हे जीवजंतू सर्व प्रकारची प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थांचे रूपांतर एकतर स्वतःच्या शरीर पेशीत करतात किंवा त्यांचे विघटन करतात.
म्हणून चांगल्या प्रकारची प्रथिने (प्रोटीन), स्निग्ध पदार्थ (फॅट) हे जास्त दूध देणाऱ्या गायींना लगेचच उपलब्ध होत नाहीत, म्हणूनच बायपास फॅटचे संतुलित पशुआहारात अधिक महत्त्व आहे.
बायपास फॅटमुळे जनावरांच्या शरीरातील ऊर्जेची गरज पूर्ण होते, वासरांची दैनंदिन योग्य वाढ होते, कालवडी योग्य वयात माजावर येतात. दुभत्या गाई-म्हशी त्यांच्या क्षमते एवढे दूध उत्पादन करू शकतात.
आत्ताचे सर्वात संरक्षित बायपास फॅट नॅनो तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात आले आहे. ज्यामध्ये फॅट व फॉस्फेटिडेल्कोलीन जे ऊर्जेची पूर्तता करते. सोबत यकृतावर जमा झालेल्या फॅटला काढण्याचे काम करते. हे फॅट दूध उत्पादन वाढ आणि सोबतच यकृतात ग्लुकोज बनवण्याची प्रक्रिया जलद होऊन दूधवाढीस उपयुक्त ठरते.
- डॉ. संजय भालेराव, ९०९६३२४०४५
(सहायक प्राध्यापक, पशुपोषणशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.