
निरोगी जनावरांमध्ये काळपुळी आजाराच्या प्रादुर्भावामुळे अचानक मृत्यु होतो. काळपुळी हा आजार बॅसिलस अँथ्रॅसिस या जिवाणूमुळे होतो. या आजाराची बाधा गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, वराह तसेच माणसालाही होऊ शकते.(ANTHRAX disease in animals)
बॅसिलस अँथ्रॅसिस (Bacilus anthracis) या जीवाणूचा प्रसार बाधित प्राण्यांचे केस, लोकर, हाडे आणि मांस यामधून होत असतो. रोगाने बाधित जनावराचा मृत्यु झाल्यानंतर हे जीवाणू (Bacteria) बीज तयार करतात. हे बीज मातीमध्ये साठ वर्षापर्यंत टिकून राहू शकतात. दुषित मातीच्या संपर्कातून हे जीवाणू खाण्यावाटे किंवा जखमेद्वारे जनावरांच्या शरीरात प्रवेश करतात. हे जीवाणू शरीरात मॅक्रोफेज या पांढऱ्या रक्तपेशींमार्फत लसिका ग्रंथींमध्ये जातात. लसिका ग्रंथींमध्ये जीवाणूंची वाढ झपाट्याने होते. वाढ होत असताना हे जीवाणू लीथल आणि एडीमा नावाचे अत्यंत घातक विष तयार करतात. एडीमा विषामुळे शरीर आणि अवयवांवर सूज येते. तीव्र विषबाधा होऊन बाधित जनावर मृत्यू पावते.
साधारणपणे २ ते ३ तास आधी निरोगी दिसणाऱ्या जनावरांमध्ये अचानक मरतूक होते. फार कमी जनावरांमध्ये २४ तासांच्या आत कधी कधी थरथरणे, ताप येणे, श्वसनास त्रास होणे, जमिनीवर आडवे पडणे, झटके येणे आणि मृत्यू होणे अशी लक्षणे दिसून येतात.
बाधित जनावर चारा खाणे, रवंथ करणे बंद करते. फुफ्फुसाला सूज आल्याने श्वास घेण्यास त्रास होतो. श्वासाची गती वाढते. गाभण जनावरांमध्ये गर्भपात होतो. काही जनावरांच्या मानेवर, पाठीवर किंवा पायाच्या आतील भागात सूज येते.
बाधित मेंढ्या गरगर फिरून अचानक मरतात. मृत्यु झालेल्या बाधित जनावराचे मांस खाऊन डुकरांनाही या आजाराची बाधा होते.
या आजारात जनावराला भरपूर ताप येतो. मृत्यु झालेल्या जनावरांच्या कानातून, नाकातून, तोंड आणि गुदद्वार, योनीमार्ग यांसारख्या अवयवातून काळसर रंगाचा रक्तस्त्राव होतो. मृत्यू झालेल्या जनावराचे रक्त गोठत नाही. ते पातळ आणि काळपट पडते.
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून या आजारावरील प्रतिबंधात्मक लस दरवर्षी न चुकता टोचावी. आजाराचे निदान लवकरात लवकर झाल्यास पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रतिजैविके द्यावीत.
या आजारात मृत्यू होण्याचे प्रमाण अतिशय जास्त असते. जनावरांची प्रतिकारशक्ती चांगली असल्यास मृत्युदर कमी आढळतो. आजाराच्या सौम्य आणि तीव्र प्रकारानुसार मृत्युच्या दरात बदल होत असतात.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.