Calf Care Management : वासरांची वाढ का खुंटते?

वासराची शारीरिक वाढ योग्य वयात झाल्यास त्यापासून उत्पादन काळ जास्त मिळतो, वासरांची संख्या जास्त मिळते, शारीरिक वाढ उत्तम झाल्यामुळे मुबलक दूध उत्पादनही मिळते.
Care Of Cow Calf In Monsoon
Care Of Cow Calf In Monsoon Agrowon

भविष्यात उत्पादक व सशक्त गाय (Cow), म्हैस (Buffalo) संगोपन करून किफायतशीर दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर वासरांच्या उत्तम संगोपनाकडे (Calf Care) लक्ष देणे गरजेचं आहे. परंतु बहुतांश गोठ्यातील वासरांची वाढ खुंटलेली दिसते. वासराची शारीरिक वाढ योग्य वयात झाल्यास त्यापासून उत्पादन काळ जास्त मिळतो, वासरांची संख्या जास्त मिळते, शारीरिक वाढ उत्तम झाल्यामुळे मुबलक दूध उत्पादनही मिळते. त्याचबरोबर अशा जनावरांपासून भविष्यातही सशक्त वासरे मिळतात. पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर येथील डॉ. प्रफुल्लकुमार पाटील यानी वासरांतील वाढ खुंटण्याच्या कारणांविषय़ी दिलेली माहिती पाहुया.

Care Of Cow Calf In Monsoon
वासरांचे गुडघे का सुजतात?

वासरांची वाढ खुंटण्याची कारणे

जन्मण्यापूर्वी गर्भाशयातील कमी वाढ, गाभण काळातील अपुऱ्या / निकृष्ट आहारामुळे गर्भाशयातील वासरू अशक्त राहते. अशी जन्मलेली वासरे पुढेही जलदगतीने वाढत नाहीत.

जन्मानंतर वासरांना गरजेनुसार चीक व दूध न पाजल्यास वाढ खुंटते.

बहुतांशी पशुपालकांकडे निकृष्ट चारा उपलब्ध असतो आणि केवळ अशा चाऱ्यावर वासरांची पूर्ण क्षमतेने वाढ होत नाही. वासरांच्या जलद वाढीसाठी प्रथिनयुक्त आहाराची गरज असते.

वासरांच्या शरीरातील जंत रक्त पितात, वासराने पचवलेले अन्न खातात. आतड्यांना इजा करतात त्यामुळे पचवलेले अन्नसुद्धा वासरांच्या शरीरात नीट शोषले जात नाही, परिणामी वाढ खुंटते.

गोचिड, पिसवा, उवा वासराचे रक्त पिऊन वाढतात. वासरू नेहमी बेचैन राहते. त्यामुळे चारा खाण्यावरील लक्ष कमी होऊन त्यांचे कुपोषण होऊन वाढ खुंटते.

गोठ्यातील इतर गाई/ म्हशी लहान वासरांना चारा, खाद्य खाऊ देत नाहीत त्यामुळे त्यांचे कुपोषण होऊन वाढ खुंटते.

वासरांना एकेठिकाणी दोरीने बांधल्यामुळे वासरांच्या शरीरावर एक प्रकारचा सतत ताण येतो. शरीराचा व्यायाम न झाल्यामुळे पचनक्षमता कमी होऊन वाढ खुंटते.

गोठा, सभोवतालची दलदल, अस्वच्छ वातावरण यामुळे वासराला नेहमी श्‍वसनाचे आजार होतात, हगवण लागते. त्यामुळे वासरांची वाढ खुंटते.

वासरे चांगल्याप्रकारे चारा खाऊ लागल्यानंतर, चारा पचवण्यासाठी वासरांनी मुबलक पाणी पिणे गरजेचे असते. जवळ जवळ १ किलो चारा पचवण्यासाठी ४ ते ५ लिटर पाण्याची गरज असते. परंतु वाढत्या पाण्याच्या गरजेकडे दुर्लक्ष होऊन वासरांची वाढ खुंटते.

बहुतांशी वासरांच्या आहारात वाढीनुसार बदल होत नाहीत म्हणून वासरांची वाढ खुंटते.

कातडी, पोट, आतड्याचे आजार यामध्ये वासरांचे कुपोषण होऊन वासरांची वाढ खुंटते.

वासरांना खाण्यासाठी, पाणी पिण्यासाठी, बसण्यासाठी, फिरण्यासाठी योग्य प्रमाणात जागा उपलब्ध झाली नाही तर वासरांची वाढ खुंटते.

पचनक्रिया सुरळीत राहणे व पचलेले अन्न शोषण्यासाठी क्षारांची गरज असते. वासरांच्या आहारात क्षाराचा अभाव असल्यामुळे. तसेच काही वासरांची वाढ आनुवंशिक कारणांमुळे कमी असू शकते. परंतु असे प्रमाण खूप कमी असते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com