Animal Care : नवजात वासराची घ्यावयाची काळजी

विल्यानंतर नवजात वासराची योग्य तपासणी करून घ्यावी. जंतुनाशक द्रावणाने नाळ कापून घ्यावी. नवजात वासरांची वासरांमध्ये रोगप्रतिकारक्षमता वाढण्यासाठी त्यांना पहिल्या दोन तासांमध्ये चिकाचे दूध पाजावे.
Animal Care
Animal CareAgrowon

डॉ. ए. बी. कोळी, डॉ. एस. एस रामटेके

जनावरांची प्रसूतिपूर्व व प्रसूतीनंतर विशेष काळजी (Animal Care) घेणे गरजेचे असते. तसेच व्याल्यानंतर मादीसोबतच नवजात वासराची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. काही वेळेस वासरू जन्माच्या वेळी मानवी साह्यतेची गरज भासते. अशा वेळी वासरू (Calf) कमजोर असण्याची दाट शक्यता असते.

नैसर्गिकरीत्या जन्मलेल्या वासरांमध्ये अवयवांची पुरेशी वाढ झाली असल्याने संप्रेरकांच्या साह्याने त्यांच्यात जन्मल्यानंतर पूर्ण कार्यक्षमता प्राप्त होते.

बऱ्याच वेळा नवजात वासरांची व्यवस्थित काळजी न घेतल्याने त्यांच्यातील मरतुकीचे प्रमाण वाढलेले दिसून येते. नवजात वासरांतील मरतूक टाळण्यासाठी योग्य व्यवस्थापन पद्धती आणि काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

प्रसूतीवेळी नवजात वासरू व मादी यांचे योग्य व्यवस्थापन न केल्यास किंवा निष्काळजीपणा केल्याने दुग्धोत्पादन व्यवसायामध्ये नुकसान होऊ शकते. जसे की मादी जनावर संपूर्ण गर्भधारणा कालावधीसाठी वासरास तिच्या गर्भाशयात ठेवते.

परंतु व्यायच्या वेळेस योग्य काळजी न घेतल्यास तितका कालावधी व्यर्थ जातो. मादी दूध देणे बंद किंवा कमी करते, वासरापासून (नर/मादी) यांच्यापासून भविष्यात मिळणारे उत्पन्न गोठते. त्यासाठी व्यायल्यानंतर वासराची व मादीची योग्य काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

घ्यावयाची काळजी ः

१) विल्यानंतर नवजात वासराची योग्य तपासणी करून घ्यावी. नाक, तोंड, श्‍वासनलिका, गुद्द्वार तपासून पाहावेत. बेंबीच्या ठिकाणी रक्तस्राव येत आहे का, याची तपासणी करावी. काही नवजात वासरांचे गुदद्वार हे बंद असते. अशा वेळेस त्वरित पशुवैद्यकांस संपर्क करावा.

२) वासरू जन्माला आल्याबरोबर लगेच त्याच्या नाका-तोंडातून चिकट द्रव्य दूर करावा. जेणेकरून त्याला श्‍वास घेण्यास मदत होईल.

३) वासरू जन्मल्यानंतर ते मादीच्या जवळ ठेवावे. जेणेकरून मादी वासराला चाटून चिकट द्रव्य साफ करेल. गायी वासराला चाटल्याने त्यांच्यातील रक्ताभिसरणास चालना मिळते.

४) बऱ्याच वेळेस पहिल्यांदा विणाऱ्या जनावरांमध्ये मातृ-वृत्तीचा अभाव असल्याने ते नवजात वासरांना चाटत नाहीत. तसेच जवळ सुद्धा घेत नाहीत. अशा वेळी नवजात वासरांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

५) कोरड्या कापडाने वासराच्या नाकातोंडातील चिकट द्रव्य काढून नाक व तोंड स्वच्छ करून घ्यावे.

Animal Care
Animal Feed : बार्शीत दूध संघाच्या पशुखाद्य कारखान्याचे बुधवारी उद्‍घाटन

६) वासराला श्‍वसनास त्रास होत असल्यास काही वेळ पाठीमागचे पाय उचलून (घड्याळाच्या लोलकाप्रमाणे) उलटे लटकवावे. जेणेकरून त्यांच्या नाकातील चिकट द्रव्य बाहेर निघून जाण्यास मदत होईल.

७) कमजोर वासरांना श्‍वासोच्छ्वास करण्यास त्रास होत असल्यास, कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतल्यानंतर हाताच्या तळव्याने वासराच्या छातीवर हलका दाब देऊन रक्ताभिसरणास चालना द्यावी. कृत्रिम श्‍वासोच्छ्वास द्यावा.

८) नवजात वासरांमध्ये शरीराचे तापमान नियंत्रित करण्याची क्षमता विकसित झालेली नसते. त्यामुळे त्यांना कोरड्या व उष्ण ठिकाणी ठेवावे.

हिवाळ्यामध्ये याबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. नवजात वासरांना उबदार ठिकाणी ठेवावे किंवा त्यांच्या शरीराभोवती उबदार कापड गुंडाळावे.

९) बऱ्याच वेळेस वासराची नाळ ही खूप लांब असते. नाळेमध्ये जंतुसंसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यासाठी लांब नाळ जंतुनाशक द्रावणाने (पोटॅशिअम परमॅंगनेट, टिंचर आयोडीन द्रावणाने) स्वच्छ करून, बेंबीपासून दोन इंचाच्या अंतरावर बांधून घ्यावी. त्याखालून ती नवीन ब्लेडने कापून टाकावी.

१०) नवजात वासरांना पहिल्या दोन तासांमध्ये चिकाचे दूध पाजावे. हे दूध वासरांमध्ये रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचे असते. वासरांच्या शरीराच्या वजनाच्या एक दशांश दराने चीक पाजावा.

या चिकाच्या दुधामध्ये विविध इम्युनोग्लोबुलीन असतात. ही इम्युनोग्लोबुलीन (रोगप्रतिकारक सत्त्वे) नवजात वासरांचे विविध रोगांपासून संरक्षण करतात.

काही वेळेस मादीचा मृत्यू झाल्यास नवजात वासरांना चिकाचे दूध मिळत नाही. अशा वेळी उपलब्ध असल्यास इतर जनावरांचे किंवा कृत्रिम पद्धतीने तयार केलेले चिकाचे दूध वासरांना द्यावे.

११) वारसाचे पहिले शेण काढून टाकण्यासाठी चिकाच्या दुधाचा रेचक प्रभावदेखील आहे.

१२) मातेचे चिकाचे दूध हे तिलाच पाजू नये. त्यामुळे मादीमध्ये आम्लारी अपचन होते व पुढील पचनक्रिया थांबते. यावर वेळीच उपाययोजना न केल्यास गंभीर आजार होऊन जनावराचा मृत्यू होण्याची शक्यता असते.

१३) गायी विल्यानंतर गायीला व वासराला स्वच्छ व कोरड्या ठिकाणी ठेवावे. वासराला योग्य प्रमाणात दूध देणे आवश्यक आहे.

दूध जास्त प्रमाणात दिल्यास, हगवण लागण्याची शक्यता असते. तसेच अगदी कमी प्रमाणात दूध दिल्यास, वासरे कमजोर होतात व मरतुक होण्याची शक्यता वाढते.

Animal Care
Animal care: थंडीत दुधाळ जनावरांची अशी काळजी घ्या| Agrowon

१४) कमजोर वासरे दूध पीत नसल्यास त्यांना बाटलीच्या साह्याने दूध पाजावे.

१५) योग्य नियोजन व व्यवस्थापन केल्यास गायी वर्षाकाठी एक तर म्हशी दीड वर्षातून एकदा वासरू जन्माला घालतात.

कृत्रिम पद्धतीने चिकाचे दूधनिर्मिती ः

पदार्थ---प्रमाण

कोमट पाणी---२७५ मिलि

साधे कच्चे अंडे---१

एरंडेल तेल---३ मिलि

जीवनसत्त्व अ---१०००० आययू

गरम दूध---५२५ मिलि

ऑरिओमायसिन (प्रतिजैविक)---८० मिलिग्रॅम

डॉ. अनुजकुमार कोळी, ९१४५०५०२३७ (पशुप्रजननशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com