जनावरांमधील परोपजीवींचे निर्मूलन

जनावरांना प्रामुख्याने जिवाणूजन्य, विषाणुजन्य आणि परोपजीवीजन्य असे सांसर्गिक आजार होतात. यापैकी परोपजीवी हे मोठ्या प्रमाणात जनावरांना प्रादुर्भाव करतात. जास्त प्रमाणात दूध उत्पादन देणाऱ्या जनावरांमध्ये परजीवींमुळे होणारे आजार सर्रास आढळतात. हे आजार होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्त्वाच्या आहेत.
Animal Care
Animal CareAgrowon

डॉ. पी. डी. पवार, डॉ. पी. पी. म्हसे, डॉ. व्ही. एस. धायगुडे

--------------------------------------

परोपजीवी जंत (Parasite Worm) हे शरीरांतर्गत आढळणारे सूक्ष्म-अतिसूक्ष्म परोपजीवी जंतू असू शकतात. शरीराबाहेरील गोचीड (Tick), गोमाश्‍या, पिसवा, खरूज निर्माण करणारे जंत इत्यादी असतात. या परजीवी बाधेमुळे जनावरे आजारी (Animal Care) होतात. जिवाणू व विषाणू प्रतिबंध आणि निर्मूलन करण्यासाठी बाजारात विविध प्रकारच्या परिणामकारक लसी उपलब्ध आहेत, परंतु शरीरांतर्गत व शरीर बाह्य परजीवीपासून संरक्षण करण्यासाठी फारशा लसी उपलब्ध नाहीत. त्यामुळे परजीवीपासून होणाऱ्या आजारांचा प्रतिबंध करणे व जनावरांचे संरक्षण करण्यासाठी परजीवींचे योग्य नियंत्रण हाच उपाय आहे.

जनावरांमध्ये प्रामुख्याने बाह्य परोपजीवी आणि दुसरे शरीरांतर्गत आढळणारे परोपजीवी जंत असे दोन प्रकारचे परोपजीवी आढळतात. बाह्य परोपजीवीमध्ये सर्व प्रकारच्या कीटकवर्गीय गोचीड, माश्‍या, गोमाश्‍या, पिसवा तसेच खरूज हे कीटक आढळतात. तसेच जनावरांच्या शरीरामध्ये प्रामुख्याने गोलकृमी जंत, पट्टिका कृमी जंत, चपटकृमी किंवा पर्णकृमी जंत आढळून येतात. तसेच मोठ्या परोपजीवी मार्फत जनावरांच्या शरीरात प्रवेश करून रक्तामध्ये बाधा निर्माण करणारे एक पेशीय आदिम प्रजातीय (प्रोटोझुआ) परोपजीवी जनावरांमध्ये अतिशय घातक प्रकारचे आजार निर्माण करतात. उदा. थायलेरिया, बबेसिया, सर्रा आणि आतडीमध्ये रक्तस्राव करून रक्ती हगवण निर्माण करणारे कोक्सिडिया हे परजीवीदेखील मोठ्या प्रमाणात जनावरांमध्ये आढळतात.

अंतर्गत बाधा निर्माण करणारे कृमीवर्गीय परजीवी ः

१) पर्णकृती चपटे जंत ः

- हे जंत जनावरांच्या शरीरामधील जठर, यकृत, रक्तवाहिन्यांमध्ये आणि काही जंत जनावरांच्या नाकपुडीमध्ये देखील आढळतात. हे जंत काही मिलिमीटर ते अगदी काही सेंटिमीटरपर्यंत लांबीचे देखील आढळतात.

- जंतांचा यकृतामधील प्रादुर्भाव जनावरांसाठी अत्यंत घातक ठरतो.

पट्टिका कृमी जंत ः

- हे पट्ट्या सारखे लांब जंत जनावरांच्या लहान व मोठ्या आतड्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात.

- जंतांची लांबी तीन ते पाच मीटरपर्यंत देखील असू शकते.

- शरीर शीर आणि त्यापुढे एकमेकांना चिकटलेल्या स्वतंत्र चपट्या तुकड्यांचे बनलेले असते आणि आतड्यांमध्ये वाढ झाल्यानंतर फक्त त्यांच्या शरीराचा शेवटचा तुकडा ज्याला आपण ‘ग्रॅव्हिड प्रोग्लाटिस’ असे म्हणतो तेवढाच तुकडा गुदद्वारातून बाहेर पडतो.

- अशा तुकड्यांतील पट्टिका कृमी असंख्य अंडीसह दुसऱ्या जनावरांच्या शरीरास बाधा करतो. बाकीचे उर्वरित पट्टिका कृमी कायमस्वरूपी मूळ जनावराच्या आतड्यांमध्ये राहतात.

- हा बाहेर पडलेला भाग पुनश्‍च दुसऱ्या जनावरांच्या शरीरात जाऊन तिथे पूर्णपणे नवीन कृमीचे रूप धारण करून बाधा निर्माण करतो.

- जंतांमध्ये सलग अन्ननलिका नसते. या कृमीचा प्रत्येक तुकडा त्या जनावराच्या आतड्यांमधील तयार अन्नघटक शोषून घेऊन आपला जीवनक्रम पूर्ण करत असतात.

गोलकृमी ः

- हे जंत जनावरांच्या शरीरामध्ये विविध भागांत आणि वेगवेगळ्या

अवयवात आढळतात. आतडी, यकृत, मेंदू, हृदय, डोळे व किडनी या भागांमध्ये हे जंत बाधा करू शकतात.

- तीनशेपेक्षा जास्त प्रकारच्या विविध गोलकृमीच्या प्रजाती अस्तित्वात आहेत आणि त्यापैकी काही प्रजाती या प्राण्यांमध्ये तसेच माणसांमध्ये बाधा करतात.

- गोलकृमी जंतांची लांबी साधारण सहा मिलिमीटरपासून पंचाहत्तर सेंटिमीटरपर्यंत असते. काही सूक्ष्म जंत आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत.

- गोलकृमीमध्ये स्वतःच्या अन्ननलिकेची संपूर्ण वाढ झालेली आढळते आणि साधारणपणे गोलकृमी हे प्रामुख्याने प्राण्यांचे रक्त शोषून जगत असतात.

हिमोन्कोसिस जंत ः

- हे जंत एकावेळी एका दिवसात साधारणपणे लहान जनावरांमध्ये शरीरातील अर्धा मिलिलिटर रक्त शोषतात. असे हजारोंच्या संख्येने हे जंत त्या प्राण्याच्या शरीरात असतात. त्यामुळे गंभीर स्वरूपाचा रक्तक्षय जनावरांमध्ये होऊन जनावरे दगावतात.

जंताचे जीवनचक्र ः

- सर्वसाधारणपणे जंतांचे दोन प्रकारचे जीवनचक्र आढळून येतात; पहिल्या प्रकारांमध्ये थेट म्हणजेच कोणत्याही माध्यम किंवा मध्यस्थीविना पूर्ण होणारे जीवनचक्र आणि दुसऱ्या प्रकारांमध्ये अप्रत्यक्ष म्हणजेच ज्यात माध्यमाच्या सहभागाची जीवनचक्र पूर्णत्वासाठी जंत मदत घेत असतो.

- थेट जीवनचक्र पद्धतीमध्ये जंतांच्या सगळ्या जीवन अवस्थांमध्ये कुठल्याही प्रकारच्या माध्यमाची आवश्यकता नसते. हे जंत त्यांचे संसर्गक्षम अवस्था भोवतालच्या वातावरणामध्ये धारण करतात आणि जनावरांना बाधा पोहोचवतात. परत त्या जनावारामधून बाहेर पडून दुसऱ्या जनावरांना बाधा पोहोचवतात.

- अप्रत्यक्ष जीवनचक्र जगणारे जंत त्यांचे जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी एखाद्या अवस्थेसाठी दुसऱ्या मध्यस्थाचा उपयोग करतात. हे मध्यस्थ बहुदा सजीवच असतात. उदाहरणार्थ, सर्वसाधारण पट्टीकृमी आपल्या एका जीवन अवस्थेसाठी जमिनीमधील परिभ्रमण करणारे माइट्स (पिसवा) या वर्गातील कीटकांचा मध्यस्थ म्हणून उपयोग करतात. पर्णकृती कृमी जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी गोगलगाय किंवा इतर कीटक, मुंग्या, गांडूळ आणि इतर प्रकारच्या मध्यस्थांची एका अवस्थेसाठी उपयोग करीत असतात.

त्यानंतरचा जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी शेवटचा सजीव म्हणून जनावरांच्या शरीरामध्ये सांसर्गिक अवस्थेत हे जंत प्रवेश करतात आणि आपला उर्वरित जीवन काळ जनावरांच्या शरीरामध्ये वाढून पूर्ण करतात.

- सर्वसाधारण गोलकृमींच्या जीवन चक्रामध्ये जवळ जवळ सर्वच कृमींची सांसर्गिक अवस्था मध्यस्थांच्या शरीराबाहेर पडून जनावरांच्या चारा-पाण्याद्वारे त्यांच्या शरीरात गेल्याने निर्माण होते.

- काही प्रकारचे गोलकृमी मादी जनावरांमध्ये गाभण काळात नाळे मार्फत रक्ताद्वारे त्यांच्या गर्भातील अर्भकामध्ये देखील प्रवेश करतात. अर्भकाला जनावरांच्या गर्भामध्येच संक्रमित करतात. काही गोलकृमी वासराच्या जन्मानंतर मातेच्या दुधावाटे सुद्धा वासरांना बाधा पोहोचवतात. असे जंत वासरांना सर्वात जास्त बाधा निर्माण करतात.

जंतबाधेमुळे आढळणारी बाह्य लक्षणे ः

- गंभीर संसर्ग निर्माण करणारे जिवाणू किंवा विषाणू जनावरे बाधित केल्यानंतर स्पष्ट असे बाह्य स्वरूपाचे लक्षण आणि आकस्मिकपणे त्या जनावरांचा मृत्यू दिसतो. मात्र जंतामुळे जनावरे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण नगण्य असल्याने अशा जंतांच्या प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष होते.

- बहुतेक प्रकारचे परोपजीवी आणि शरीरांतर्गत बाधा निर्माण करणारे जंत लक्षणीय प्रमाणात जनावराच्या शरीराला हानी पोहोचवत असतात, परंतु अशी लक्षणे बहुदा सौम्य असतात. गंभीर लक्षणे निर्माण न करणाऱ्या परोपजीवी आजाराकडे मात्र आपले लक्ष वेधले जात नाही.

Animal Care
जनावरे बसण्याची जागा कशी असावी? | cow seating arrangement in shed | ॲग्रोवन

जंतुसंसर्ग जनावरांमध्ये आढळणारी लक्षणे ः

- जंतुसंसर्ग असलेले जनावर रोज थोडे थोडे खंगत जात असते. दुबळे व अशक्त होते.

- त्याचे वजन, दूध उत्पादन, मांस उत्पादन आणि रोग प्रतिकारशक्ती अतिशय कमी होत जाते.

- जनावराची भूक मंदावते आणि चारा कमी खाते.

- दूध देणाऱ्या जनावरांमध्ये वीस ते तीस टक्के उत्पादन कमी होते.

- जनावरांची कातडी रबरासारखी निस्तेज खडबडीत निबर होते.

- जनावरांचे केस राठ उभे राहतात. मोठ्या प्रमाणात केस गळती वाढते.

- लहान जनावरांमध्ये अतिसार सुरू होतो. बाधित जनावरांची विष्ठा/शेण पातळ होते. शेणाला नासक्या अंड्यासारखा वास येतो.

- शेळ्या, मेंढ्या, जनावरांमध्ये जबड्याच्या खालच्या बाजूला कातडीखाली पाणी साचून सूज येते.

- म्हशीच्या पारडीमध्ये मातकट रंगाची चिकट विष्ठा तयार होऊन संपूर्ण गोठ्यामध्ये दुर्गंधी पसरलेली असते.

- वासरे अशक्त होऊन खंगत जातात आणि त्यांची वाढ खुंटते. रेड्यामध्ये जंतांच्या बाधेमुळे मरतुकीचे प्रमाण लक्षणीयरीत्या अतिशय जास्त आढळून येते.

Animal Care
नवीन जनावर खरेदी करताय, मग हे जाणून घ्या! | Selection of Dairy Animals | ॲग्रोवन

जंतबाधेचे दुष्परिणाम ः

१) बाधित जनावरांच्या पोटात अन्न पचनानंतर तयार होणारे अन्नघटक कमी होतात. आतडीमधील गोल कृमींमुळे आतड्याला इजा पोहोचते. तीव्र पोटदुखी दिसून येते.

२) काही प्रकारचे जंत उदाहरणार्थ गोलकृमी दररोज जनावरांचे रक्त शोषतात. गंभीर रक्तक्षय निर्माण होतो. यकृता मधील पर्णकृमी जंत यकृत पेशींचे भक्षण करून यकृतास मोठ्या प्रमाणात हानी पोचवतात.

३) दुधाळ जनावरांच्यामध्ये जंत झाल्यामुळे २० ते ३० टक्के उत्पादन कमी होते. मांस आणि लोकर उत्पादन करणाऱ्या जनावरांमध्ये उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.

४) आतड्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या जंतामुळे अन्न तुंबून राहते, अजीर्ण होते, अन्नाचे पचन होत नाही. जंत संसर्ग झाल्याने रक्तामधील महत्त्वाच्या रक्त घटकांचे प्रमाण कमी होत जाऊन जनावरांमध्ये अंतर्गत तीव्र स्वरूपाचा रक्तस्राव देखील होतो. विशेषतः लहान जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात अशक्तपणा आणि रक्तक्षय दिसून येतो.

५) जनावरांच्या पचन संस्थेमधील एकूण चयापचयाचे कार्य बिघडते. त्यांची भूक मंदावते. उत्सर्जनात जंतांच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या विषारी पदार्थांद्वारे जनावरांच्या शरीरामध्ये विषबाधा बघायला मिळते.

६) आतड्यातील जंतामुळे तसेच एक पेशीय आदीजीवी यासारख्या जंतामुळे रक्त हगवण लागते. जनावरांच्या शरीरामधील पाण्याचे आणि क्षारांचे प्रमाण हगवण लागल्याने तीव्र स्वरूपात कमी होते.

७) शेळ्या, मेंढ्यांमध्ये यकृतामधील प्रथिने निर्मिती थांबल्याने रक्त पातळ होऊन जबड्याच्या खालच्या बाजूला त्वचेखाली पाणी साचल्याने बाटलीच्या आकाराची सूज येते.

८) जंत असल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणात कमी होते, त्यामुळे असे जनावर इतर आजारांना लवकर आणि सहज बळी पडतात. अशा जनावरांचे लसीकरण करून देखील संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव अशा जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे परिणामकारक लसीकरण होत नाही.

९) कृमींच्या मोठ्या संख्येमुळे आतड्याच्या अंतस्लेश्म त्वचेला इजा होऊन पाचकरस निर्माण होण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे जनावरांची भूक मंदावते. आतडीमधील आवरणास झालेल्या जखमांमुळे जनावरांना रक्तमिश्रित अतिसार होतो.

१०) कृमींमुळे आतड्याला आरपार छिद्र पडलेले दिसते. यामुळे गंभीर पोटशूळ होतो. शरीरामधील प्रथिने, रक्तशर्करा, क्षार व इतर अत्यावश्यक सूक्ष्म घटकांचे प्रमाण कमी होत जाते. पचनक्रिया बिघडते, शेणाला दुर्गंधी येते. तसेच चारा- खाद्य यांचे पचन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे काळपट आणि कधी कधी रक्तमिश्रित शेण देखील बघायला मिळते.

११) यकृताची क्षमता कमी होऊन प्रथिने तयार होण्यास बाधा निर्माण होते. रक्ताची घनता कमी होते. रक्तपेशींच्या संख्येमध्ये लक्षणीय घट होते. रक्तक्षय झाल्यामुळे जनावर खंगत जाते. अतिशय दुर्बळ झाल्याने जनावरांच्या पाठीचा कणा, हाडे आणि बरगड्या सहज वरती दिसू लागतात.

१२) गाई-म्हशींच्या दूध उत्पादनात आणि बैलांच्या कार्यक्षमतेमध्ये देखील लक्षणीय घट होते. शेळ्या-मेंढ्यांची कोकरे तसेच वासरांची रोगप्रतिकार क्षमता कमी होते, रक्तक्षय होत जातो, जनावरांची वाढ खुंटते व तीव्र रक्तक्षय झाल्यामुळे लहान करडे व वासरे मृत्युमुखी देखील पडतात.

१३) कालवडीमध्ये जंतांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असेल तर कालवडी योग्य वयात येऊनही माजावर येत नाहीत. मोठी जनावरे वारंवार रेतन करून देखील गाभण राहत नाहीत. जंतांच्या प्रादुर्भावामुळे गाई, म्हशींमधील प्रजननक्षमता कमी होते. माजावर वेळेवर न येणे, गर्भधारणा न होणे, तसेच वारंवार उलटणे यांसारख्या समस्या आढळून येतात.

प्रतिबंधात्मक उपाय ः

१) जनावरांमध्ये कोणत्या प्रकारचे जंत आहेत याचे प्रयोगशाळेद्वारे परीक्षण करून माहिती करून घ्यावी. जनावरांच्या विविध नमुन्यांची वेळोवेळी व नियमित तपासणी करून घ्यावी. जंतांचा प्रकार समजल्यानंतर त्याच्या नियंत्रणासाठी व प्रतिबंधात्मक उपायांसाठी उपयुक्त व प्रभावी कृमिनाशक निवडणे आणि व्यवस्थापन करणे सोपे आणि सुलभ होते.

२) दृश्य लक्षणे दाखविणारे अशक्त आणि बाधित जनावरे इतर निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवावीत. नवीन येणाऱ्या किंवा विकत घेतलेल्या जनावरांच्या शेणाच्या नमुन्याची तपासणी करून मगच निरोगी कळपामध्ये सोडावे.

३) चांगली प्रतिकारशक्ती असणाऱ्या जनावरांमध्ये कृमींचा प्रादुर्भाव आपोआप कमी होताना आढळतो. त्यांच्यावर कोणताही तणाव नसावा.

४) जनावरांचे पाऊस थंडी व वातावरणातील अचानक होणारे बदल यापासून रक्षण करावे. जेणेकरून त्यांच्यावर वातावरण बदलामुळे होणारा तणाव उद्‍भवणार नाही.

५) जनावरांच्या आहारामध्ये प्रथिने, कर्बोदके, सूक्ष्म खनिजे, जीवनसत्वे यांचा योग्य प्रमाणामध्ये वापर करून जनावरांना रोज संतुलित आहार व स्वच्छ व मुबलक पाणी द्यावे. त्यामुळे जनावरांचे आरोग्य निरोगी व तंदुरुस्त राहण्यास मदत होते.

६) गोठा नेहमी स्वच्छ, कोरडा व हवेशीर ठेवावा. वेळोवेळी योग्य औषधांचा वापर करून निर्जंतुकीकरण करावे. जंतांचा प्रसार मध्यस्ती जीव, कीटक यांच्यामार्फत होत असल्याने त्यांचा प्रसार नियंत्रणात ठेवावा.

७) पशुपालकांनी आपल्या गोठ्यातील / विभागातील सर्व जनावरांची जंत निर्मूलन मोहीम एकाच वेळी राबवावी. यामुळे पुन्हा नव्याने होणाऱ्या जंत बाधेला थांबवता येऊ शकते.

८) जनावरांमध्ये कोणत्याही आजाराची लक्षणे दिसताच पशुवैद्यकाकडून सल्ला घेऊन रक्त, लघवी व शेण यांची प्रयोगशाळेमध्ये तपासणी करून आजाराचे निदान करावे.

९) कृमींचा प्रकार, संख्या व जनावरांचे संतुलित आहार आणि व्यवस्थापन यावरच जंत बाधेचे दुष्परिणाम अवलंबून असतात. ज्या जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते, त्या जनावरांमध्ये कृमीची वाढ प्रमाणाबाहेर होत नाही. ज्या जनावरांमध्ये निकृष्ट चारा पाणी आणि व्यवस्थापन असते अशा जनावरांची रोगप्रतिकारक क्षमता कमी होऊन अधिक प्रमाणात आजारास बळी पडतात.

१०) गोठ्यातील जनावरांना जंत होऊ नये म्हणून योग्य त्या अंतराने वेळोवेळी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जंतनाशकाचा कटाक्षाने वापर करावा, जेणेकरून परजीवींमुळे पशुपालकाचे होणारे आर्थिक नुकसान टाळता येऊ शकते.

संपर्क ः

डॉ. पी. डी. पवार, ८८७२५३७२५६

डॉ. पी. पी. म्हसे, ९०११४११०६६

(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ, जि. सातारा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com