उन्हाळ्यात म्हशींना का होतो लाल मुत्र आजार?

उन्हाळ्यात म्हशींना लघवी लालसर रंगाची होते. म्हणून या आजाराला आपण लाल मुत्र रोग असे म्हणतो.
In summer buffalo suffer from Hemoglobinuria diseases
In summer buffalo suffer from Hemoglobinuria diseasesAgrowon

उन्हाळ्यात म्हशीमध्ये दिसून येणाऱ्या लाल मुत्र आजाराची विविध कारणे आणि त्यावरील उपाययोजना याबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर येथील डॉ. रविंद्र जाधव यांच्यांशी साधलेला संवाद अॅग्रोवन च्या प्लटफॉर्म वर.

१. म्हशींमध्ये स्फुरद कमतरतेमुळे होणारा लाल मुत्र रोग काय आहे ?

या आजाराची बाधा असलेल्या जनावरांमध्ये लघवी लालसर रंगाची होते. म्हणून या आजाराला आपण लाल मुत्र रोग असे म्हणतो. या आजाराचा प्रादुर्भाव जास्त दुधाचे उत्पादन देणाऱ्या म्हशी आणि शेवटच्या टप्प्यातील गाभण म्हशींमध्ये दिसून येतो. आर्थिकदृष्ट्या हा आजार महत्वाचा आजार आहे. कारण दुधाळ जनावरांच्या दूध उत्पादनात घट दिसून येते. औषध उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. वेळेत उपचार न केल्यास म्हशींना रक्तक्षयासारखा आजार होऊ शकतो. या आजाराची बाधा साधारणपणे ५ ते १० वर्षे वयोगटातील म्हशींमध्ये तिसऱ्या ते सातव्या वेतामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. गाभण काळातील शेवटचे तीन महिने आणि विल्यानंतरचे दोन महिने या कालावधीमध्ये प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. या आजाराचा प्रादुर्भाव डिसेंबर ते जुलै यामहिन्यात जास्त पाहायला मिळतो.

२. हा रोग म्हशींमध्ये होण्याची विविध कारणे कोणती आहेत?

आहारातील स्फुरदची कमतरता (phosphorus deficiency) हे या आजाराचे प्रमुख कारण आहे. दूध उत्पादनासाठी तसेच गर्भातील वासराची वाढ योग्य प्रकारे होण्यासाठी स्फुरदची गरज असते. महाराष्ट्रातील जमिनीत स्फुरदचे प्रमाण कमी किंवा अगदी नगण्य आहे. जनावरांना खाद्यासाठी दिला जाणारा चारा हा याच मातीत उगवलेला असल्याने पिकात स्फुरदची कमतरता निर्माण होते. परिणामी म्हशी लाल मुत्र (haemoglobinurea) आजारास बळी पडतात. त्यातही वाळलेल्या चाऱ्यामध्ये स्फुरदचे प्रमाण अगदी नगण्य असते.

In summer buffalo suffer from Hemoglobinuria diseases
जनावरे गुदमरून का मृत्यु पावतात ?

३. या आजाराची लक्षणे कोणती असतात ?

या आजाराचे प्रमुख लक्षण म्हणजे लाल, काळसर किंवा कॉफीच्या रंगाची लघवी होते. म्हैस शेण टाकताना कुंथुन बाहेर टाकतात. खाणेपिणे मंदावते, वजन घटते, अशक्तपणा वाढून जनावर मलूल बनते. दूध उत्पादन घटते. शरीराचे तापमान जरी सर्वसाधारण असले तरीही नाडीचा आणि श्वसनाचा वेग वाढतो. तीव्र स्वरूपाचा रक्तक्षय होतो. डोळ्यातील श्लेम पटल पांढरे किंवा कावीळ झाल्यास पिवळसर पडतात. बाधित म्हशींचा उपचार केला नाही तर तीव्र स्वरूपाचा रक्तक्षय होवून ४-५ दिवसात बाधित म्हशी दगावण्याची शक्यता असते.

In summer buffalo suffer from Hemoglobinuria diseases
जनावरे रवंथ कसे करतात?

४. लाल मुत्र आजाराचे निदान कसे केले जाते ?

हा आजार प्रामुख्याने नवीन विलेल्या म्हशींमध्ये शेवटच्या दोन महिन्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. तसेच गाभन जनावरांमध्ये शेवटच्या तीन महिन्यामध्ये या आजाराची बाधा दिऊन येते. या आजाराची बाधा डिसेंबर ते जुले च्या दरम्यान आढळून येते. स्फुरद खनिजचे इंजेक्शन ३ ते ५ दिवस दिल्यास बाधित म्हशी उपचारास चांगला प्रतिसाद देतात. रक्तामधील स्फुरदचे प्रमाण ४-६ ग्रॅम प्रति १०० मिली रक्त किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास प्रयोगशालेत तपासणी करून घ्यावी.

५. लाल मुत्र आजारासाठी औषधोपचार करता येतो काय ?

या आजाराचे तत्काळ निदान करून पशुवैद्यकांकडून उपचार करून घेतल्यास बाधित म्हशींना वाचवता येते. यामध्ये प्रामुख्याने स्फुरद खनिजयुक्त इंजेक्शन, सलाईन, ब जीवनसत्व इंजेक्शन, रक्त वाढविण्यासाठी टॉनिक वापरल्यास म्हशी उपचारास प्रतिसाद देऊन आजारातून बऱ्या होतात. परंतु उपचार सुरु करण्यास विलंब झाल्यास उपचारांती बाधित म्हशींमध्ये तीव्र स्वरूपाचा रक्तक्षय आणि कावीळ होवून मरतुक होऊ शकते. जर बाधित म्हशींमध्ये हिमोग्लोबिन ५ ग्रॅम/लिटर पेक्षा कमी झाल्यास अशा म्हशींमध्ये निरोगी दाता म्हशीचे किमान १.५ ते २ लिटर रक्त चढविण्यात यावे.

६. म्हशींमध्ये लाल मुत्र आजाराचा प्रतिबंध कसा करता येईल?

चांगली दुग्ध उत्पादकता असलेल्या म्हशींच्या आहारातील स्फुरद खनिजाचे व्यवस्थित नियोजन केल्यास लाल मुत्र या आजाराला आळा घालता येवू शकतो. गाभण व दुभत्या म्हशींच्या आहाराचे योग्य व्यवस्थापन करून पुरेशा प्रमाणात स्फुरद आहारात उपलब्ध करून दिल्यास गर्भात वाढणाऱ्या वासराच्या किंवा दूध निर्मितीसाठी लागणाऱ्या स्फुरद खनिजाची गरज भरून निघेल आणि अशा म्हशी या आजारास बळी पडणार नाहीत. म्हशींना आहारात वळलेला चारा, हिरवा चारा व खुराक योग्य प्रमाणात दिल्यास तसेच नियमित ५० ग्रॅम खनिज मिश्रणाचा पुरवठा केल्यास हा आजार पूर्णपणे टाळता येतो. आहारात कॅल्शियम आणि स्फुरद यांचे प्रमाण २:१ राहील याचीही काळजी घ्यावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com