
दुधाळ किंवा गाभण गायी-म्हशींचे संगोपन केवळ वाळलेल्या चाऱ्यावर केल्यास जनावरे मृदूअस्थी म्हणजेच उरमोडी (Urmodi) या आजाराला बळी पडतात. प्रामुख्याने म्हशींमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक दिसून येते. उन्हाळ्यात चारा टंचाईच्या (Fodder Shortage) काळात या आजाराचे प्रमाण अधिक असते.
कारणे काय आहेत?
- आपल्या राज्यात प्रामुख्याने चराऊ जमिनीत स्फुरदचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे दिसून आले आहे.जमिनीत स्फुरदची कमतरता असल्यास, चाऱ्यात सुद्धा हे प्रमाण कमी राहते. चाऱ्यातून म्हशींना स्फुरदचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नाही.
- जनावरांच्या आहारात कोरड्या चाऱ्याबरोबर हिरवा चारा, पशुखाद्य, क्षार-मिश्रणाचा अभाव किंवा कमी प्रमाणात समावेश असल्यास. प्रामुख्याने उन्हाळ्यात जनावरांचे संगोपन फक्त कोरड्या चाऱ्यावर केल्यास, या आजाराची बाधा होते.
- शारीरिक अवस्थेनुसार तसेच शरीराच्या वाढत्या गरजेनुसार स्फुरद न मिळाल्याने जनावरांना या आजाराची बाधा होते.
- सर्वसाधारणपणे एका लिटर दुधात १ ग्रॅम स्फुरद वापरले जाते. यासाठी आहारातून प्रतिलीटर दुधामागे २ ग्रॅम अधिक स्फुरद पुरविले पाहिजे.
लक्षणे कशी ओळखायची?
- जनावर खंगत जाते.
- दूध उत्पादनात घट होते.
- जनावर आखडून व हळूवार चालते.
- जनावराची पाठ वाकडी होते.
- जनावर उठताना अत्यंत हळूवार हलकेच उठते.
- जनावर उठताना बराच वेळ गुडघ्यावर थांबून राहते.
- वेळीच उपचार न केल्यास, जनावर आडवे पडून राहते आणि शेवटी मृत्युमुखी पडते.
प्रतिबंधात्मक उपाय आणि उपचार
- हिरव्या चाऱ्यात स्फुरदचे प्रमाण कोरड्या चाऱ्याच्या तीन पट अधिक असते. याउलट पशुखाद्यात हेच प्रमाण सहा पटीने अधिक असते. त्यामुळे आहारात त्यांना हिरव्या चाऱ्याचा समावेश करावा.
- आजारी गायी-म्हशींना १५ ते ३० दिवस नियमितपणे १०० ते १२५ ग्रॅम खनिज मिश्रण दिल्यास त्या पूर्णपणे निरोगी होऊ शकतात.
- दुधाळ गायी–म्हशीच्या दूध उत्पादनाच्या प्रमाणात प्रती २.५ ते ३ लिटर दुधामागे एक किलो तर गाभण जनावरांना गाभणकाळाच्या शेवटच्या २ महिन्यात दीड किलो जादा खुराक द्यावा.
- दुधाळ व गाभण गायी-म्हशींच्याआहारात रोज किमान ५० ग्रॅम क्षार मिश्रणे द्यावीत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.