शेतीपूरक व्यवसाय : डंखविरहित मधमाशीपालन

कोकण विभागामध्ये वर्षभर आढळणारी, डंख विरहित मधमाशी (स्टिंगलेस बी) आहे. या माश्या केस, डोळे व कानावरही हल्ला करत असल्या तरी डंख नसल्यामुळे फारशी इजा (वेदना) होत नाहीत. हाताळणी करताना ‘बिवेल’चा वापर करावा.
 Stingless beekeeping
Stingless beekeeping

पृथ्वीवर मधमाश्यांच्या एकूण २०,०९२ प्रजाती असून, त्यापैकी आपल्या देशात सातेरी (एपिस सेरेना इंडिका) आणि इटालियन (एपिस मेलिफेरा) या मधमाश्या मध आणि परागीकरणासाठी पाळल्या जातात. या दोन्ही डंख मारणाऱ्या मधमाश्या आहेत. मात्र कोकण विभागामध्ये वर्षभर आढळणारी, डंख विरहित मधमाशी (स्टिंगलेस बी) आहे. या माश्या केस, डोळे व कानावरही हल्ला करत असल्या तरी डंख नसल्यामुळे फारशी इजा (वेदना) होत नाहीत. हाताळणी करताना ‘बिवेल’चा वापर करावा.  डंखविरहित मधमाश्या या आकाराने लहान आणि सर्वांत लहान मध उत्पादक म्हणून ओळखल्या जातात. डंख नसणे, पुढील पंखांवर नसांचे कमी जाळे आणि मागील पंखांमध्ये जुगल लोबची उपस्थिती या खुणांमुळे वेगळ्या ओळखता येतात. या मधमाश्‍यांना ‘डॅमर बी’ म्हणून संबोधले जाते. हे ‘डॅमर’ म्हणजे डिप्परोकार्पच्या झाडापासून तयार केलेली राळ असते. या मधमाश्या नैसर्गिक वनस्पती व कृषी पिकांमध्ये उत्कृष्टपणे परागीकरण करतात. यांच्या वसाहतीतून कमी म्हणजेच २०० ते ५०० ग्रॅम मध मिळतो. मात्र यातील औषधी गुणधर्म  आणि पौष्टिकतेमुळे त्यांच्या पालनासंदर्भात संशोधन केले जात आहे. प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र,  भाट्ये येथे गत चार वर्षांपासून डंखविरहित मधमाशीपालन या विषयावर काम सुरू आहे. केंद्रामध्ये एकूण वीस वसाहतींचे संवर्धन करून वेगवेगळे सापळे विकसित केले आहेत.  विविधता आणि वितरण भारतीय उपखंडात डंखविरहित मधमाश्यांच्या आठ प्रजातींची नोंद. (लेपिडोटभायगोना आर्किफेरा, लिसोटभायगोना कॅसिए, लिसोटिगोना मोहनदासी, टेटभागोनूला इरिडीपेनिस, टेटभागोनूला बेंगालेन्सिस, टेटभागोनूला ग्रेसिटी, टेटभागोनूला प्रोटेरिटा, टेटभागोनूला रूफिकॉर्निस.) घरट्यांनुसार वर्तन धमाश्यांप्रमाणे डंख नसलेली मधमाशी ही बारमाही वसाहतीत राहणारी एक अत्यंत सामाजिक कीटक आहेत आणि ते वृक्षांच्या खोड, पोकळ दांडे, खडकांच्या आतल्या कडा, इतर प्राण्यांनी बनवलेल्या छिद्रांमध्ये यासारख्या आडोशाच्या जागी पोळे बांधतात.घरट्याचे प्रवेशद्वार एक साधे छिद्र असू शकते. बाह्य प्रवेशिका ही नलिकाकार असून, तेथून घरटे वाढविले जाते. प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये येथे ६ बाय १० सेंमी आकारची आयताकृती झाकण असलेली ५ फूट उंच असलेली पेटी तयार केली. त्यामध्ये चांगल्या प्रकारे वसाहत विकसित झाल्याचे आढळले. वसाहत हाताळण्यास आणि मध काढण्यास कुठलीच अडचण येत नाही.  मेलिपॉनिकल्चर केवळ डंखविरहित मधमाश्यांचे पालनपोषण आणि व्यवस्थापन करणे म्हणजेच ‘मेलिपॉनिकल्चर’ होय. कृत्रिम संगोपनामध्ये बांबूमध्ये एक वर्षात ६०० ते ७०० ग्रॅम मध उत्पादन होते. या माश्यांसाठी कृत्रिम पोळे आता बनविण्यात आले आहे. त्यात सुपर चेंबर हा ब्रुड चेंबरपासून व्यवस्थित वेगळा केला जातो. आयताकृती लाकडी पेटीच्या पोळ्यामध्ये सुपर चेंबरमध्ये एक झाकण दिले आहे. नैसर्गिक पोळ्यापासून वसाहतीचे कृत्रिम पोळ्यामध्ये हस्तांतरण सामान्यतः प्रमाणित ब्रूडद्वारे केले जाते. मेलिपॉनिकल्चरची ताकद आणि फायदे 

 • डंखविरहित मधमाश्याच्या प्रजाती उष्ण कटिबंधीय हवामानात चांगल्या वाढतात. 
 • मूळ प्रजाती असल्याने परजिवी कीटक आणि रोगांना प्रतिरोधक आहेत. 
 • पॉलिहाउसमध्ये परागीकरणासाठी योग्य.
 • अधिक औषधी मधाला चांगली किंमत मिळते. (आजचा दर साधारणपणे १५०० रुपये प्रति किलो असा आहे.)
 • स्टिंगलेस मधमाश्यांचे जीवशास्त्र पिलांची कोठी (ब्रुड सेल) तयार करणे, अळ्यांना अन्न देणे आणि अंडी घालणे या सर्व प्रक्रियेस ‘प्रोव्हिजनिंग’ आणि ‘ओव्हिपोजिशन’ प्रोसेस (पीओपी) असे म्हटले जाते. सेल बांधकाम आणि मधमाशीच्या अळ्यांचे नियमित संगोपन कामकरी माश्या करतात. हे खरे असले तरी राणीमाशी अनुपस्थित असल्यास सेल बांधकाम थांबविले जाते. वसाहत दिवसेंदिवस कमी होत जाते. कामकरी माश्या ४ ते ६ च्या तुकड्यांमध्ये जोड्यांसारख्या स्तंभाद्वारे एकमेकांशी जोडलेले एकसारख्या गोलाकृती ब्रूड पेशी तयार करतात. बांधकाम चालू असताना राणीमाशी ब्रूड सेल्सची तपासणी करते. पूर्ण झाल्यानंतर ६-८ परिचर कामकरी माश्यांकडून विशेष मध आणि परागकण खाद्य मिश्रणाने प्रत्येक सेलमध्ये भरण्यात येतात. राणी आपले पंख लयबद्ध पद्धतीने फडफडवत अशा ब्रूड सेलची तपासणी करते. नंतर ती उभ्या किंवा तिरकस स्थितीत प्रत्येक ब्रूड सेलमध्ये अळ्यांच्या खाद्याच्या मध्यभागी अंडी ठेवते.  डंखविरहित मधमाशीच्या जीवनअवस्था :  अंडी, अळी, कोष आणि प्रौढ.

 • अंड्याची लांबी १.३७ मिमी व रुंदी ०.४८ मिमी असून, ती ५.५ ते ६ दिवसांत उबतात. 
 • अळ्या मलईदार पांढऱ्या, पाय नसलेल्या आणि सी-आकाराच्या असतात. वयानुसार अळ्याची लांबी आणि रुंदी वाढते. अळी अवस्थेतील कालावधी ११ ते १३.५ दिवसांचा असतो.
 • कोष अवस्था ३३ ते ३८ दिवसांची असते. 
 • असा अळी व कोष अशा सरासरी एकूण विकासात्मक जीवनक्रम कालावधी ५३ दिवसांचा असतो. 
 • जुन्या पोळ्यातील काही कामकरी माश्या नवीन पोकळी निवडतात. नवीन पोळे तयार करण्यासाठी त्याची साफसफाई सुरू करतात. पुढे पूर्वीच्या वसाहतीतील (आईच्या) आवश्यक तेवढे सुरुवातीचे साहित्य आणतात. याच काळात नव्या राणीमाशीचे झुंडीने आलेल्या अनेक नरापैकी एका नरमाशीशी हवेमध्ये मिलन होते. या प्राथमिक घटनेनंतर नवजात कामकरी माश्या पुढील कामांना लागतात. नवीन वसाहतीत स्थलांतरित होतात. नवी राणीमाशी डिप्लॉइड फलित अंड्यातून तयार केली जाते. त्यासाठी कामकरी माश्या या अळीला रॉयल जेली अधिक प्रमाणात खाऊ घालत राहतात. ती अन्य कामकरी मधमाश्यांप्रमाणेच मादी असली तरी  आकाराने मोठी असते. राणीमाशीमध्ये कॉरबिक्युला व मेणग्रंथी नसतात. तिची जीभ आणि मंडेबल्स (दात) लहान असतात. तिचे पंख अर्धवट असल्यामुळे पूर्ण शरीर झाकले जात नाही. अंडी घालणे हे एवढेच व  एकमेव कार्य राणीमाशी करते. राणीमाशीचे नराशी मिलन झाल्यानंतर त्यांचे शुक्राणू आयुष्यभर एका विशेष पिशवीत साठवून ठेवते. राणीमाशीचे आयुष्य ५ वर्षांपर्यंत असू शकते.
 • वसाहतीमधील नर केवळ राणीमाशीच्या मिलनाचे काम करतात. आकाराने नर कामकरी माश्यांपेक्षा मोठे असतात, परंतु राणीमाशीपेक्षा लहान असतात. नराला मोठ्या स्पर्शिका (ॲन्टेना), मोठे डोळे आणि सर्वांत लहान मॅन्डेबल्स (दात) असतात. 
 • कामकरी माश्या या फलित अंड्यांमधून विकसित केल्या जातात. त्याचा आकार राणी आणि नरापेक्षाही लहान असतो. त्यांचे कॉर्बिक्युले, मॅन्डेबल्स मजबूत आणि चांगले विकसित असतात. कोषातून बाहेर आल्यानंतर प्रत्येक कामकरी माश्यांकडे ब्रूड चेंबरची काळजी आणि दुरुस्ती अशा विविध कामांची विभागणी होते. 
 • काही कामकरी माश्या अळीपासून राणीमाशीची निर्मिती करण्याच्या उद्देशाने रॉयल जेली तयार करतात. थोड्या मोठ्या झाल्यावर परागकण आणि प्रोपोलिस गोळा करण्यासाठी बाहेर जातात किंवा वसाहतीच्या संरक्षणाचे काम करतात. अन्न शोधण्यासाठी आणि त्याच्या स्रोतांच्या पोळ्यातील इतर मधमाश्यांना सतर्क ठेवण्यासाठी काही जबाबदार स्काऊट्स बनतात. कामकरी माश्यांचे आयुष्य सुमारे ८० दिवस असते.
 • - डॉ. संतोष वानखेडे, (कनिष्ठ कीटकशास्त्रज्ञ),  ८०१०८९०८६२ (प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि. रत्नागिरी)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com