जनावरांमध्ये दिसतो थंडीचा ताणतणाव

अचानक तापमान खूप कमी झाले तर जनावरे थंडीपासून निर्माण होणाऱ्या ताण तणावाला (कोल्ड स्ट्रेस) सामोरे जातात. यासाठी जनावरांद्वारे चयापचय प्रक्रियांचा वेग वाढविणे गरजेचे आहे. योग्य आहार आणि इतर व्यवस्थापनातून थंडीमुळे होणारा ताणतणाव कमीकरता येतो.
जनावरांमध्ये दिसतो थंडीचा ताणतणाव
Milch animals should be given high energy feed during cold season.

अचानक तापमान खूप कमी झाले तर जनावरे थंडीपासून निर्माण होणाऱ्या ताण तणावाला (कोल्ड स्ट्रेस) सामोरे जातात. यासाठी जनावरांद्वारे चयापचय प्रक्रियांचा वेग वाढविणे गरजेचे आहे. योग्य आहार आणि इतर व्यवस्थापनातून थंडीमुळे होणारा ताणतणाव कमी करता येतो. गाई, म्हशी आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवतात. साधारपणे गाईच्या शरीराचे तापमान ३८ अंश सेल्सिअस असते. तापमान सर्वसाधारण असताना शारीरिक तापमान नियंत्रणासाठी जनावरांना अधिकची ऊर्जा खर्ची होत नाही. यापेक्षा कमी तापमान झाल्यास चयापचय प्रक्रियांद्वारे निर्माण झालेली ऊर्जा शरीरासाठी वापरली जाते. या अवस्थेमध्ये जनावरे थंड हवेपासून वाचण्यासाठी निवाऱ्याचे ठिकाण शोधतात. अचानक तापमान खूप कमी झाले तर जनावरे थंडीपासून निर्माण होणाऱ्या ताण तणावाला (कोल्ड स्ट्रेस) सामोरे जातात. यासाठी जनावरांद्वारे चयापचय प्रक्रियांचा वेग वाढविणे गरजेचे ठरते, यामुळे शरीराला अतिरिक्त प्रमाणात ऊर्जा मिळते. एकाच ठिकाणी थांबलेल्या थंड हवेपेक्षा सतत वाहत असणाऱ्या वाऱ्यामुळे शरीरातील उष्मा किंवा ऊर्जा काढून घेतली जाते. शरीराच्या व्यवस्थापनासाठी तसेच उत्पादनासाठी जास्त ऊर्जेची गरज भासू लागते. योग्य आहार आणि इतर व्यवस्थापन केले असता जनावरांमधील थंडीमुळे होणारा ताणतणाव कमी होतो. थंड वातावरणात शरीराचे कार्य 

 •     रक्तवाहिन्या आकुंचन पावतात 
 •     ग्रंथींद्वारे कमी प्रमाणात घाम निघतो.  
 •     केसांद्वारे उष्माची बचत.
 •     स्नायूंची कार्यक्षमता वाढते 
 •     जनावरे एकत्रित येऊन समूहामध्ये जमा होतात.शरीरात निर्माण होणारी ऊर्जा (उष्मा) ही उत्सर्जित होणाऱ्या ऊर्जेपेक्षा जास्त असते.
 • ताण तणावाची कारणे 

 •     थंड वातावरण, शरीरावरील केसांचे कमी प्रमाण. 
 •     निवाऱ्याची अयोग्य सोय
 •     बॉडी कंडिशन स्कोअर (प्रकृती अंक) कमी होणे. 
 •     पोषक घटकांची पूर्तता न होणे, खाद्य व पाणी कमी पिणे. 
 •     कमी शुष्क पदार्थांचे सेवन, वासरांची अयोग्य निगा. 
 •     गोठ्याचे अयोग्य व्यवस्थापन.संक्रमण काळातील जनावरे.
 •     आहारामध्ये खाद्यपूरकांचा कमी समावेश. 
 •     रूमेनमधील अंतर्गत वातावरणातील बदल.
 •     जनावरे शॉकमध्ये जाणे, हायपोकॅल्शेमिया.
 • ताणतणाव निर्माण होण्याचा प्रकार शरीरात निर्माण होणारी ऊर्जा (उष्मा) ही उत्सर्जित होणाऱ्या ऊर्जेपेक्षा कमी असते, यामुळे हायपोथर्मिया निर्माण होतो. चेतासंस्थेची कार्यक्षमता मंदावते. रक्तवाहिन्या अधिक प्रमाणात प्रसरण पावतात. यामुळे शरीराचे तापमान अजून कमी होते.   परिणाम  गाईमध्ये सौम्य, मध्यम आणि तीव्र स्वरूपाचा हायपोथर्मिया 

 •     सौम्य : ३० ते ३२ अंश सेल्सिअस (८६ ते ८९  फॅरानाईट)
 •     मध्यम : २२ ते २९ अंश सेल्सिअस (७१ ते ८५ फॅरानाईट)
 •     तीव्र : २० अंश सेल्सिअस पेक्षा कमी (६८ फॅरानाईट)
 • शरीराचे तापमान २८ अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेले असता, जनावरांना बाहेरून फ्लुइड थेरपी देणे गरजेचे असते. त्याशिवाय ते साधारण तापमान नियंत्रित ठेऊ शकत नाहीत. तापमान अजून कमी झाले असता चयापचय आणि शारीरिक प्रक्रियांचा वेग मंदावतो. शरीराच्या सर्व बाह्य भागापासून रक्त अंतर्गत महत्त्वाच्या अवयवांपर्यंत पोहचवले जाते. प्रकृती अंकावर परिणाम

 • प्रकृती अंकाचा (BCS) थेट संबंध शरीरामधील फॅट किंवा चरबीसोबत असतो. फॅटमध्ये इन्सुलेटिव्ह गुणधर्म असल्याने आपले जनावर थंडीच्या तणावाला सामोरे जात आहे की, नाही हे ओळखण्यास मदत होते. 
 • संक्रमण काळातील गाई-म्हशी विल्यानंतर दूध उत्पादनासाठी शरीरातील फॅटचा वापर करतात, ज्यामुळे अशी जनावरे “कोल्ड स्ट्रेस” ला लवकर बळी पडतात. तसेच यासाठी खुरांमधील फॅट चा देखील वापर केला जातो, ज्याचा उपयोग जनावरांना सर्वसाधारण उभे राहण्यासाठी होतो. याप्रकारे फॅट कमी झाले असता जनावरे एकाच ठिकाणी उभी राहून खाद्य, पाण्यापासून वंचित राहू शकतात.
 • नितेज व थंड त्वचा, खाद्याचे सेवन कमी, दुग्धोत्पादन घट. 
 • वाढती हृदय गती, श्वास घेण्यासाठी त्रास. 
 • स्नायू आखडतात, त्वचेला भेगा पडतात 
 • अति ताणामध्ये जनावरे मृत्युमुखी पडतात.
 • थंडीच्या तणावापासून संरक्षण गोठा व्यवस्थापन

 • जास्त वॅट्स असणाऱ्या बल्बचा वापर. 
 • गोठ्यातील जमिनीवर भात, गव्हाचे काड तसेच भुसा वापरावा.त्यामुळे जनावरांचे थंडीपासून संरक्षण होईल.
 • गोठा नेहमी स्वच्छ ठेवावा. छप्परावर इन्सुलेटिंग मटेरिअल वापरावे.
 • गोठ्याच्या दोन्ही बाजू गोणपाट किंवा ताडपत्रीने झाकाव्यात.
 • जनावरे, वासरांचे शरीर झाकावे. 
 • गोठ्यामध्ये काही काळ हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. 
 • गोठ्यात पुरेसा सूर्यप्रकाश आत येईल अशी व्यवस्था करावी.
 • गोठा रोज धुण्यापेक्षा शक्य तिथे चुन्याचा वापर करावा.
 • आहार व्यवस्थापन 

 • गर्भधारणेच्या शेवटच्या तीन महिन्यांत जास्त उर्जायुक्त आहार द्यावा. 
 • संक्रमण काळात गाई-म्हशी आणि वासरांच्या आहारावर योग्य लक्ष द्यावे. 
 • आहारातील ऊर्जेची घनता वाढवावी. 
 • साधारणतः दुपारी किंवा संध्याकाळी खाद्य द्यावे. यामुळे ६ ते ८ तासांनंतर शरीरात जास्त उष्मा (ऊर्जा) निर्माण होण्यास मदत होते, जेव्हा वातावरणातील तापमान कमी असते. 
 • स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध करून दिल्याने खाद्याचे सेवन वाढते.
 • रूमेनमधील किण्वन प्रक्रिया योग्य प्रकारे चालू राहण्यासाठी तसेच सामू नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य खाद्यपूरकांचा वापर करावा.
 • खाद्य किंवा पाण्यामधून खनिजे व जीवनसत्त्वे द्यावीत. जनावरांना योग्य प्रमाणात इलेक्ट्रोलाइट्स मिळाल्यामुळे डीहायड्रेशनचा धोका होत नाही.  
 • आहारातील खाद्य घटकांचा आकार योग्य असावा. असे नसल्यास जास्त ऊर्जा जनावरांद्वारे चर्वण करण्यात वाया घालवली जाते. 
 • सहज पचण्याजोगी कर्बोदके आहारात वापरल्यामुळे ऊर्जा लवकर मिळण्यास मदत होईल. 
 • जनावरांच्या आहारात बायपास फॅटचा वापर करावा. 
 • आहारामध्ये योग्य त्या प्रमाणात उसाची मळी किंवा गुळाचा वापर करावा. यातून ऊर्जा तसेच कॅल्शिअम मिळण्यास मदत होईल.
 • पचन संस्था तसेच पचन प्रक्रिया व्यवस्थित राहील याची काळजी घ्यावी.
 • वासरांमध्ये जन्मतः कमी फॅट आणि रूमेन ची अकार्यक्षमता असल्या कारणाने ऊर्जेची निर्मिती कमी प्रमाणात होते. यासाठी योग्य त्या वेळेस काफ स्टार्टर आणि मिल्क रिप्लेसरचा वापर करावा.
 • असिडोसिस टाळण्यासाठी सोडियम बायकार्बोनेटचा वापर करावा.
 • मंदावलेली पचन प्रक्रिया सुधारण्यासाठी यीस्ट सप्लिमेंटचा वापर करावा.  
 • सुक्या चाऱ्याचा आहारामध्ये समावेश करावा.
 • इतर व्यवस्थापन

 • वातावरणातील तापमान बदलावर लक्ष ठेऊन जनावरांचे तापमान तपासावे. 
 • ज्या जनावरांच्या शरीरावर केसांचे आच्छादन कमी आहे, त्यांची काळजी घ्यावी.
 • जनावरांना एकाच ठिकाणी बांधून न ठेवता त्यांना बाहेर सूर्यप्रकाशात चालवावे. जेणेकरून शरीराची हालचाल, व्यायाम होण्यास मदत होते. 
 • गाई,म्हशींना स्वच्छ ठेवावे. हिवाळ्यामध्ये जनावरांना भादरु नये.
 • व्यवस्थित पान्हा सोडण्यासाठी, कास आणि वासरांना धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा.
 • जनावरांच्या शरीरावरुन ब्रश फिरवला असता रक्ताभिसरण सुरळीत होते.  
 • - डॉ. अक्षय वानखडे,  ८६५७५८०१७९,  (लेखक पशू पोषण व आहार तज्ज्ञ आहेत)  

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.