वराह फार्मचे व्यवस्थापन...

वराहपालन सुरू करताना फार्मचा आकार आणि वराह संगोपनाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. सुधारित जातीची निवड, स्वस्त पण संतुलित आहार द्यावा. यातून आर्थिक उत्पन्न वाढवू शकते.
Pigs should plan for separate cups according to age.
Pigs should plan for separate cups according to age.

वराहपालन सुरू करताना फार्मचा आकार आणि वराह संगोपनाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. सुधारित जातीची निवड, स्वस्त पण संतुलित आहार द्यावा. यातून आर्थिक उत्पन्न वाढवू शकते. वराहपालन व्यवसायात फार्म नियोजन, वराहांची देखभाल आणि योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. फायदेशीर व्यवसायासाठी वराह आहार व्यवस्थापन, फार्म यार्ड, औषधोपचार, शेतीची उपकरणे आणि कामगार इत्यादी बाबींसाठी विशेष व्यवस्था करावी. स्थानिक परिस्थितीनुसार योग्य जाती / संकरित जातींची निवड करावी. पौष्टिक आणि भरपूर आहार दिल्यास शरीराच्या वजन वाढीचा दर वेगवान होऊन अधिक उत्पादन मिळवता येते.

  • वेगवेगळ्या शारीरिक परिस्थितीत, जसे की वाढते वय, प्रसूती, दूध पाजणारी मादी, वयस्क नर, नवीन वयातील नर व मादी यांच्या गरजा वेगवेगळ्या असतात. योग्य लसीकरण, उपचार आणि निदान / प्रतिबंध प्रणालीद्वारे रोग आणि अंतर्गत, बाह्य परजीवींपासून संरक्षण केले पाहिजे. 
  • जुन्या प्रौढ प्रजननक्षम नराची नियमितपणे नवीन नराने जागा घ्यावी.फार्मवरील  आर्थिक अनुत्पादक वराहांची बाजारात विक्री करावी.
  • वराहांचे आधीपासून व्यवस्थित प्रजनन करावे.
  • वराह हे बहू प्रजनक पशुधन आहे. एक वर्षात दोन वेळा प्रजनन होण्यासाठी प्रयत्न करावा. 
  • दर दहा मादींवर एक तंदुरुस्त नर ठेवावा. जेणेकरून आपल्याला चांगली पिलावळ मिळेल.  
  • प्रजननाच्या वेळी नरांना पुरेसा आहार द्यावा. इतर वेळी त्याला कमी आहार द्यावा.
  • माजावरील मादी ओळखण्यासाठी चांगला टीझर वापरावा. एकदा मादी माजावर आल्यावर त्यास सहवासासाठी सोडून द्यावे.
  • गाभण काळातील व्यवस्थापन

  • गाभण काळात चांगल्या प्रमाणात  रेशन पुरवावे. पिलांच्या चांगल्या वाढीसाठी मादीला चांगला आहार द्यावा.
  • एका ठिकाणी जागेच्या उपलब्धतेनुसार ४ ते ५ मादी एकत्र ठेवावे. त्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी द्यावे.
  • वराहांचा गर्भधारणा कालावधी ११२ ते ११४ दिवस असतो. प्रसूतीच्या एक आठवड्यापूर्वी सर्व गर्भवती माद्यांना स्वच्छ केलेल्या वेगवेगळ्या वाड्यात ठेवा. 
  • नवजात पिलांची काळजी

  • नवीन पिलांची नाळ कापून त्याला आयोडिनने स्वच्छ करावे. 
  • जन्मानंतर लगेच पिलांचे तीक्ष्ण दात तासावेत. 
  • प्रसूत वराहाचे दूध फक्त ६ ते ८ आठवड्यांसाठी द्यावे. त्यानंतर पिलांना क्रिप रेशन देणे आवश्यक आहे. लोहाचे इंजेक्शन प्रत्येक पिलाला द्यावे. 
  • सर्दी आणि उष्णता टाळण्यासाठी योग्य व्यवस्था करावे. नियमितपणे लसीकरण करावे.
  • प्रजननासाठी वापरायचे असेल नर वराहांची योग्य काळजी घ्यावी.
  • वराह पालनात मांस उत्पादन, पिले आणि वयस्क वराह बाजारात विक्री केली जाते.
  • पशुपालक २ ते ३ महिन्यांच्या पिलांना विकत असतील, तर त्यातून लवकर उत्पन्न मिळण्यास सुरुवात होते. त्यासाठी चांगल्या जातीच्या वराहाची निवड करावी.
  • वराहाचे प्रजनन करायचे की मांसासाठी वराह तयार करायचे हे बाजारातील मागणीनुसार ठरवावे.
  • शेड व्यवस्थापन 

  • वराहांसाठी शेड उंच व कोरड्या ठिकाणी तयार करावी. शेड  हवेशीर असावी.
  • छताची उंची ८ ते १० फूट असावी.
  • फरशी सपाट आणि थोडीशी खडबडीत असावी. जेणेकरून जनावराचा पाय घसरणार नाही. 
  • कुंड, नाला आणि भिंतीचे कोपरे गोल असावेत. जेणेकरून सहज स्वच्छ करता येतील. शेडपेक्षा दुप्पट मोकळी जागा वराहांना वावरण्यासाठी असावी. ज्यात  वराहांना मोकळेपणाने फिरता येईल. 
  • उच्च तापमानामध्ये वराहांना जास्त धोका संभवतो. त्यामुळे शेडमध्ये उन्हाळ्याच्या काळात सावली आणि थंड पाण्याची व्यवस्था करावी. आजूबाजूला वृक्षारोपण करावे. 
  • शेडमधील मलमूत्र नियमित स्वच्छ करावे. जेणेकरून कुठल्याही आजाराचा प्रसार होणार नाही.
  • शेडमधील नर आणि दुधातील मादीला स्वतंत्र कप्यात ठेवावे.
  • १ ते २ महिने वयोगटातील वराह आणि अजून प्रसूती न झालेल्या माद्यांना गटागटांत एकत्र ठेवावे. 
  • कोणत्याही रोगाचा संशय असल्यास, ताबडतोब पशुतज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी. स्थानिक आणि सामान्य आजार रोखण्यासाठी व्यवस्थापन करावे. 
  • वराहांना नियमितपणे जंतनाशक औषध द्यावे.
  • दिवसातून २ ते २ वेळा शेड स्वच्छ करावी.
  • वराहांमध्ये (स्वाइन फ्लू, आफ्रिकन स्वाइन फीवर, धनुर्वात इत्यादी) नियमित लसीकरण करून घ्यावे.
  • - डॉ. धीरज पाटील, ९५५२१४४३४९ (गुरू अंगद देव पशुवैद्यकीय व पशुविज्ञान विद्यापीठ,  लुधियाना, पंजाब)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com