रेबीज बद्दल जागरूक रहा

रेबीज हा उष्ण रक्ताच्या प्राण्यांचा, विषाणूद्वारे संक्रमित होणारा प्राणघातक आजार आहे. हा रोग कोल्हा, वटवाघूळ, मुंगूस, लांडगा, तरस, घुबड या जंगली प्राण्यांत आणि गाय, म्हैस, शेळी, मेंढी, घोडा, वराह, श्वान, मांजर या पाळीव प्राण्यांत आढळून येतो.
 श्वान दंशावर वेळेवर उपचार करावेत.
श्वान दंशावर वेळेवर उपचार करावेत.

रेबीज हा उष्ण रक्ताच्या प्राण्यांचा, विषाणूद्वारे संक्रमित होणारा प्राणघातक आजार आहे. हा रोग कोल्हा, वटवाघूळ, मुंगूस, लांडगा, तरस, घुबड या जंगली प्राण्यांत आणि गाय, म्हैस, शेळी, मेंढी, घोडा, वराह, श्वान, मांजर या पाळीव प्राण्यांत आढळून येतो.  मानवात रेबीज संक्रमणातून होणाऱ्या मृत्युंपैकी ९९ टक्के मृत्यू  हे पाळीव श्वानांच्या चावण्याने होतात. रेबीज बाधित प्राण्यांच्या लाळेतून हे विषाणू संक्रमित होत असतात. 

  • आजाराचा प्रादुर्भाव बाधित प्राण्यांच्या दंशाने, खोलवर चावण्याने किंवा ओरबडल्याने होतो. अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियामध्ये श्वानांच्या नियमित लसिकरणातून रोग प्रसार थांबला असला तरी विशिष्ट प्रकारच्या वटवाघुळाद्वारे रोग प्रसार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. 
  •   बाधित प्राण्याच्या लाळेचा जखम अथवा श्लेष्म त्वचेशी सरळ संपर्क झाल्यास रोग प्रसार होतो. बाधित मनुष्यापासून इतर मनुष्याना रोग संक्रमण होत असल्याचे दिसून आले नाही. या विषाणूचे संक्रमण दूध किंवा शिजवलेल्या मांसातून होत असल्याचे ऐकिवात नाही. 
  • मानवामधील लक्षणे  

  • श्वान दंश अथवा रेबीज संक्रमण झाल्यानंतर रेबिज ची लक्षणे दिसण्यासाठी साधारणतः १ आठवडा ते १ वर्ष कालावधी लागू शकतो. हा कालावधी प्रामुख्याने श्वान दंश झालेल्या भागावर अवलंबून असतो. श्वानदंशाचा भाग मेंदूपासून जेवढा दूर असेल तेवढा लक्षणे दिसण्यासाठीचा कालावधी जास्त असतो. 
  • रेबीजच्या एकूण रुग्णांपैकी ९५ टक्के नागरिकांना हा आजार रेबीज विषाणूने ग्रस्त कुत्र्याने चावा घेतल्यामुळे होतो. 
  • ढोबळमानाने ८० टक्के रुग्णांमध्ये क्लासिकल तर इतरांमध्ये पॅरॅलिटिक रेबीज दिसून येतो. ताप येणे, जखमेवर चिमटा येणे, टोचल्यासारखे वाटणे, जळजळ होणे यासारखी लक्षणे सुरुवातीच्या काळात दिसू शकतात.
  •  क्लासिकल रेबीजमध्ये चिंताग्रस्त होणे, गोंधळणे, वागणुकीत अचानक विचित्र भेदभाव करणे, तीव्र स्वरूपाची डोकेदुखी, अशक्तपणा, जेवणाची इच्छा नसणे, ओकारी होणे, नाका-डोळ्यातून पाणी वाहणे, झटके येणे, असंबद्ध विचित्र वागणूक, निद्रानाश, भास होणे, पाण्याची भीती वाटणे, पायाच्या खालील भागात लकवा होणे, आवाजात कंप जाणवणे आणि गिळण्यास त्रास होणे अशी लक्षणे आढळू शकतात. 
  • आजाराच्या शेवटच्या क्षणांत तीव्र झटके, दौरे आणि तोंडातून फेस येतो. प्रादुर्भाव जस-जसा मज्जारज्जू आणि मेंदू पर्यंत पोहोचतो तस-तसा त्या भागाचा दाह वाढत जातो. हा दाह जीवघेणा ठरू शकतो.
  • पॅरॅलिटिक रेबीजमध्ये ताप, डोकेदुखी, पायांमध्ये कमजोरी, जखम खाजवणे, जखमेची आग होणे, पक्षाघात, हृदयविकार आणि मृत्यू यासारखी लक्षणे आढळून येतात.
  • प्राण्यांमधील लक्षणे 

  •  उग्र प्रकारात बाधित प्राण्यांमध्ये असंबद्ध मात्र अति सक्रियता, असामान्य विचित्र वर्तन, प्रकाश, हवा व पाण्याची भीती वाटणे इत्यादी लक्षणे दिसतात. लक्षणे आढळल्यानंतर काही दिवसातच श्वसन व हृदय क्रिया बंद पडून मृत्यू ओढवतो.
  • शांत प्रकारात रेबीजचा प्रादुर्भाव व लक्षणे दाखविण्याचा वेग उग्र प्रकारापेक्षा मंद असतो. स्नायू हळूहळू लकावाग्रस्त होतात. स्नायूंचा लकवा श्वान दंशाच्या भागापासून सुरु होऊन हळूहळू मज्जारज्जू आणि मेंदूकडे पसरतो. लकवा ग्रस्त रुग्ण कोमा मध्ये जातो आणि त्याचा मृत्यू होतो.
  • उपाययोजना 

  • श्वानांच्या नियमित लसीकरणाने प्रतिबंध करता येऊ शकतो. मानवात संक्रमित होणाऱ्या रेबीजचा श्वानांमध्येच प्रतिबंध करणे हा सोपा मार्ग आहे. 
  • निरोगी आणि रेबीज बाधित श्वानांच्या वागणुकीमधील फरक लक्षात घेतल्यास श्वानदंश तसेच त्यावरील उपचाराचा खर्च कमी करता येऊ शकतो. तसेच श्वान दंश झाल्यानंतर करावयाच्या उपचारांबद्दल माहिती घेऊन ते योग्य रित्या पार पडल्यास रेबीजवर मात करता येऊ शकते.
  • प्राण्यांच्या वारंवार संपर्कात येणाऱ्या व्यक्तींनी (श्वान पालक, पशु पालक, पशु वैद्यक, वन रक्षक इत्यादी) रेबीजचे प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेतल्यास प्रादुर्भाव कमी होतो. 
  • तीन महिने वयाच्या पाळीव श्वानास पहिली लस द्यावी. त्यानंतर २१ दिवसानंतर दुसरी मात्रा द्यावी. त्यानंतर लस दरवर्षी न चुकता द्यावी. पाळीव श्वानास भटक्या श्वानाच्या संपर्कात येऊ देऊ नये.
  • श्वानात आजाराची लक्षणे आढळल्यास पशुवैद्यांशी संपर्क साधावा.
  • श्वान दंश झाल्यानंतर उपाययोजना 

  •  श्वानदंश झाल्यास किंवा रेबीज बाधित प्राण्यांशी सरळ संपर्क आल्यास जखम त्वरित वाहत्या पाण्यात भरपूर वेळ (कमीत कमी १५ मिनिटे) धुवून घ्यावी. 
  • जखम धुण्यासाठी साबण, धुण्याचा सोडा किंवा पोविडीन आयोडिन चा वापर करावा. साबणामध्ये कॅर्बोलिक आम्ल असल्यास अतिउत्तम. या उपचाराने रेबीज विषाणू त्याच ठिकाणी निष्क्रिय होतो. विषाणूचा प्रसार मज्जारज्जू आणि मेंदूकडे होत नाही. 
  • जखमेला बँडेज बांधू नये किंवा टाके घेऊ नयेत. जखम उघडी ठेवावी. जखमेवर सूर्यप्रकाश पडू द्यावा. 
  • श्वानदंश झालेल्या व्यक्तीचे वेळापत्रकानुसार लसीकरण करून घ्यावे. लसीकरणासाठी प्रमाणित लस वापरावी. आवश्यकता भासल्यास रेबीज प्रतीपिंडांचा वापर करावा.
  • श्वानदंश झालेल्या किंवा रेबीज बाधित प्राण्यांशी सरळ संपर्क आलेल्या व्यक्तीचे जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिलेल्या मानकाप्रमाणे उपचार व लसीकरण करणे गरजेचे असते. 
  • संपर्क ः डॉ.सुधाकर आवंडकर,९५०३३९७९२९ (पशुवैद्यकीय सुक्ष्मजीवशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर,जि.लातूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com