जनावरांमधील रक्त संक्रमण फायदेशीर

कावीळ झालेल्या जनावराला वाचविण्यासाठी दुसऱ्या जनावराचे रक्त देणे हा पर्याय आहे. रक्त संक्रमण केल्यामुळे जनावराच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. जनावरांमध्ये पहिल्यांदा रक्तगट न तपासता फक्त क्रॉस मॅचिंग करून सुरक्षितरित्या रक्त देऊ शकतो.
जनावरांमधील रक्त संक्रमण फायदेशीर
Veterinarians during blood transfusions in sick cows.

कावीळ झालेल्या जनावराला वाचविण्यासाठी दुसऱ्या जनावराचे रक्त देणे हा पर्याय आहे. रक्त संक्रमण केल्यामुळे जनावराच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. जनावरांमध्ये पहिल्यांदा रक्तगट न तपासता फक्त क्रॉस मॅचिंग करून सुरक्षितरित्या रक्त देऊ शकतो. संकरित गायींमध्ये गोचीड ताप हा प्रमुख आजार दिसून येतो.या आजारामध्ये योग्य वेळी रोगनिदान आणि उपचार झाला नाही किंवा जनावर आजारी असल्याचे शेतकऱ्याच्या उशिरा लक्षात आले तर जनावराचे रक्त पातळ होते. हिमोग्लोबिन ३ ग्रॅम प्रति डीएल पर्यंन्त कमी होते. जनावराचे चारा खाणे पूर्णपणे बंद होते, हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे उती स्तरावर ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो, अवयवांची काम करण्याची क्षमता कमी होते. अशा वेळी जनावर दगावण्याची शक्यता जास्त असते. आपल्याकडे कावीळ होऊन मरण पावणाऱ्या जनावरांची संख्या खूप मोठी आहे. अशा परिस्थितीत त्या जनावराला वाचविण्यासाठी दुसऱ्या जनावराचे रक्त देणे हाच एकमेव पर्याय शिल्लक असतो.जनावराच्या शरीरात ऑक्सिजन उती स्तरावर वाहून नेण्याचे काम हिमोग्लोबिनचे असते. रक्त संक्रमण केल्यामुळे जनावराच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. जनावराच्या उती स्तरावर ऑक्सिजन उपलब्ध झाल्यामुळे अवयवांची काम करण्याची क्षमता वाढते, सर्व अवयव सुरळीतपणे काम करू लागल्याने जनावर चारा खाणे सुरू करते. हे लक्षात घेऊन मी आजारी जनावरांवर उपचार करण्यासाठी रक्त संक्रमण किट विकसित केले आहे. याचा वापर करून आपण जनावरांमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने रक्त भरू शकतो. जनावरांचे प्राण वाचवू शकतो.ज्या जनावरांचे हिमोग्लोबीन ४ ग्रॅम प्रति डीएलच्या खाली जाते, त्या जनावरांचे प्राण वाचवण्यासाठी हे कीट उत्तम प्रकारे काम करते. जनावरांमधील रक्तगट

 • जनावरांमध्ये वेगवेगळे रक्तगट असतात. गाईमध्ये ११ रक्तगट असतात. जनावरांमध्ये पहिल्यांदा रक्त भरत असताना रक्तगट तपासण्याची गरज पडत नाही.
 • जनावरांमध्ये पहिल्यांदा रक्तगट न तपासता फक्त क्रॉस मॅचिंग करून सुरक्षितरीत्या रक्त भरू शकतो.
 • ज्या जनावराला रक्त द्यायचे आहे, त्या जनावराला काही त्रास होऊ नये म्हणून सर्व काळजी घेतली असतानासुद्धा काही वेळा रिॲक्शन येऊ शकते. परंतु याचे प्रमाण फार अल्प आहे.
 • रक्त संक्रमणाची गरज 

 • जनावराला गोचीड ताप होतो. पुढे त्या जनावराचे रक्त पातळ होऊन कावीळ होते. त्या वेळी रक्त संक्रमण करण्याची गरज पडते.
 • अपघातामध्ये जर जास्त रक्तस्राव झाला, तर रक्त संक्रमणाची गरज पडते.
 • प्रसूती करताना जास्त रक्त गेले तर रक्त संक्रमणाची गरज असते.
 • जनावराचे मायांग बाहेर पडते. त्या वेळी जर जास्त रक्तस्राव झाला तर त्या ठिकाणी रक्त संक्रमण करावे.
 • रक्त संक्रमणाची योग्य वेळ 

 • जनावराला गोचीड ताप झालेला आहे आणि बरेच उपचार करून देखील कावीळ झाली आहे, शरीरातील हिमोग्लोबीनची पातळी ३ ते ४ ग्रॅम प्रति डीएल आहे, जनावर व्यवस्थित उभे राहत आहे, जनावराच्या मागच्या पायांच्या मांड्यावर थरकाप होत नाही, चालताना जनावर व्यवस्थित चालते, चालताना पायात पाय न अडकता चालत आहे अशा वेळी रक्त संक्रमण केले पाहिजे.
 • कावीळ आजारात जनावर जेव्हा उभे असेल, थोडाफार चारा खात असेल तेव्हाच रक्त संक्रमण करावे. इतर उपचार करण्यात वेळ गेला आणि हिमोग्लोबीन ३ पेक्षा कमी झाले तर ते जनावर रक्त संक्रमण करून देखील वाचवणे अवघड असते.
 • रक्त संक्रमण करण्याची पद्धत  रक्तदात्या गाईची निवड आणि क्रॉस मॅचिंग करणे 

 • रक्तदाती गाय निरोगी असावी. मागील सहा महिन्यांपासून त्या गाईला कुठलाही आजार झालेला नसावा. गाय गाभण नसावी. शांत असल्यास रक्त काढणे सोपे जाते.
 • दात्या गाईचे रक्त आजारी गाईला सहन होईल की नाही हे क्रॉस मॅचिंगमध्ये बघितले जाते. पशुवैद्यक ते तपासून गाईची निवड करतात.
 •  रक्तदात्या गाईकडून रक्त बॅगमध्ये गोळा करणे 

 • रक्तदात्या गाईकडून प्रति किलो वजनास १० मिलि या प्रमाणात रक्त काढू शकतो.
 • ५०० किलो वजन असणाऱ्या गाईपासून आपण एकूण ५ लिटरपर्यंत रक्त काढू शकतो.
 • रक्त आजारी जनावरास देणे 

 • प्रति किलो वजनास ५ मिलि याप्रमाणे आजारी जनावराला रक्त द्यावे.
 • जर आजारी जनावराचे रक्त खूप कमी झालेले असेल, तर अशा ठिकाणी प्रती किलो वजनास १० मिलि या प्रमाणात रक्त संक्रमण करावे.
 • आजारी जनावराला पहिले ३० मिनिटे एकदम हळूहळू रक्त दिले पाहिजे. त्यानंतर रक्त देण्याचा वेग हळूहळू वाढवू शकतो. परंतु जेवढे कमी वेगाने रक्त भरू तेवढे चांगले असते.
 • रक्त संक्रमणाची रिॲक्शन :

 • जनावराच्या अंगावरील केस उभे राहतात.
 • जनावर जोरात ठसकते.
 • धापा टाकायला सुरुवात होते.
 • डोळे व मायांग सुजते.
 • जनावरांसाठी रक्त पेढीची गरज ज्या शेतकऱ्याकडे एक गाय आहे आणि त्या गाईला रक्त भरण्याची गरज आहे, अशा वेळी त्या शेतकऱ्याकडे रक्त काढण्यासाठी दुसरे जनावर उपलब्ध नसते. शेजारचा शेतकरी त्याच्या गाईचे रक्त काढू देत नाही किंवा रक्त दाता मिळत नाही. ज्या ठिकाणी रक्तदाता मिळतो ते ठिकाण आणि रक्त भरण्याचे ठिकाण यामध्ये खूप अंतर असते. आजारी गाईचे प्राण वाचवण्यासाठी रक्ताची लगेच गरज असते. अशा परिस्थितीत जर जनावरांसाठीची रक्तपेढी असेल तर त्या ठिकाणी रक्त उपलब्ध होऊन जनावर वाचू शकते. संपर्क: डॉ. विकास चत्तर, ९७६५२१५५७३ (पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १, नांदूर शिंगोटे, ता. सिन्नर, जि. नाशिक)  

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.