ओळखा जनावरांतील जंताचा प्रादुर्भाव...

जंताची प्रादुर्भाव झालेल्या जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती घटते. ते इतर आजारांना बळी पडू शकतात. जंतनाशकाची मात्रा देण्यासाठी वेळापत्रक ठरवताना जनावराचे वय, पाऊस पडल्यास सुरवात झाली तो दिनांक व गवताची उपलब्धता हे तीन घटक महत्त्वाचे ठरतात.
ओळखा जनावरांतील जंताचा प्रादुर्भाव...
जनावरांना पावसाळा सुरू होण्यापूर्वी जंतनाशकाची मात्रा द्यावी.

जंताची प्रादुर्भाव झालेल्या जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती घटते. ते इतर आजारांना बळी पडू शकतात. जंतनाशकाची मात्रा देण्यासाठी वेळापत्रक ठरवताना जनावराचे वय, पाऊस पडल्यास सुरवात झाली तो दिनांक व गवताची उपलब्धता हे तीन घटक महत्त्वाचे ठरतात. पावसाळ्यामध्ये जनावरांना कुरण चरावयास उपलब्ध असल्यामुळे जंताचा प्रादुर्भाव होतो. गोलकृमीच्या जीवनचक्राचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात येईल, की विष्ठेद्वारे कुरणावर पडलेली जंतांची अंडी अर्भक अवस्थेमध्ये विकसित होतात. त्यांच्या वाढीसाठी पावसाळा ऋतूमध्ये आर्द्रता व तापमान उपलब्ध असते. म्हणून अर्भकांची योग्य वाढ होऊन ते गवताच्या पात्यावर दवबिंदूच्या साह्याने वास्तव्य करतात. असे गवत खाल्ल्यानंतर जंताचा जनावरांना प्रादुर्भाव होतो.

 • ज्या पडकावर मागील वर्षी जंताची अंडी पडलेली आहेत ती पाऊस पडल्यानंतर विकसित होतात. त्यांचा प्रादुर्भाव होतो.
 • पाऊस पडल्यानंतर नव्याने वाढत असलेले गवत वासरे व शेळ्या-मेंढ्यांनी खाल्ल्यानंतर हमखास जंताचा प्रादुर्भाव होतो.
 • पावसाळा व हिवाळा ऋतूचा काही भाग जोपर्यंत गवत उपलब्ध आहे, गवताच्या पात्यावर दवबिंदू साचतात तोपर्यंत जंताचा प्रादुर्भाव होतो. म्हणून गवत उपलब्ध असलेल्या पूर्ण कालावधीसाठी जंतनाशकाची मात्रा द्यावी लागते.
 • जंतनाशक देण्याचे फायदे 

 • गायीच्या दुग्धोत्पादनामध्ये ०.३५ ते ०.६० म्हणजेच ३५० ते ६०० मिलिलिटर प्रतिदिन वाढ संभवते. एका वेतामागे साधारणपणे १७० ते ५१६ लिटर दूधवाढीची नोंद आहे.
 • वजनवाढ १८ ते ४३ किलोने वाढ संभवते. गाईची कालवड २८ ते ६८ दिवस माजावर अगोदर येते. त्यामुळे एवढ्या कालावधीचा दूध मिळण्याचा फायदा होतो.
 • मेंढीमध्ये जंतामुळे ४० टक्के लोकर उत्पादन घटते.
 • जंताची प्रादुर्भाव झालेल्या जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती घटते. ते इतर आजारांना बळी पडू शकतात.
 • प्रौढ जनावरांना विष्ठेद्वारे बाहेर टाकल्या जाणाऱ्या जंताची अंडी संख्या घटते. पर्यायाने अशा पडकावर इतर जनावरांना जंताचा प्रादुर्भाव कमी प्रमाणामध्ये होते.
 • आरोग्य, उत्पादन वाढ व पुनरुत्पादन यामध्ये फायदा संभवतो.
 • जंतनाशक देण्यासाठी मापदंड 

 • गवताची उपलब्धता आणि जनावरांना कुरणावर चरावयास सोडले जाते. (बंदिस्त जनावरास आवश्‍यकता भासत नाही).
 • विष्ठा पातळ होणे व वासरांना आवमिश्रीत हगवण, तर शेळी/मेंढीमध्ये लेंड्याऐवजी पातळ विष्ठा व त्यामुळे गुदद्वाराचा भाग माखला जातो. यास डॅगस्कोअर असे संबोधले जाते.
 • उपलब्ध जनावरांच्या ५ ते १० टक्के शेणाचे नमुने तपासल्यानंतर प्रादुर्भाव झाल्याचे कळते; परंतु झालेला प्रादुर्भाव दखलपात्र आहे का? याचे मार्गदर्शन पशुतज्ज्ञांकडून घ्यावे. दखलपात्र असल्यास जंतनाशकाची मात्रा देणे क्रमप्राप्त ठरते. विशेषतः हा भाग प्रामुख्याने गाय/ म्हैस प्रौढ यांच्यामध्ये आवश्‍यक ठरतो. शेळी/मेंढी एकवेळ दखलपात्र प्रादुर्भाव नसतानादेखील नियमित मात्रा देणे आवश्‍यक ठरते.
 • साधारणपणे गर्भधारणेचा शेवटचा काळ व प्रसूतिपश्‍चात काही काळ गाय, म्हैस, शेळी, मेंढी यांना अर्भकाच्या वाढीसाठी व दुधासाठी आपली शक्ती खर्च करावी लागते. या कारणाने त्यांच्यामधील रोगप्रतिकारक शक्तीमध्ये काहीशी कमतरता येते. त्यामुळे त्यांच्या शरीरातील सुप्त अवस्थेतील जंताची अर्भके झपाट्याने वाढतात. त्यांच्याद्वारे प्रचंड प्रमाणामध्ये जंताची अंडी गवतावर टाकली जातात. अशा पडकावर इतर जनावरांना जंताचा जास्त प्रादुर्भाव होतो. म्हणून या कालावधीमध्ये जंतनाशकाची मात्रा देणे अत्यंत फायदेशीर ठरते.
 • गळ्याखालील सूज ः शेळी-मेंढीस जंताचा प्रादुर्भाव प्रमाणाबाहेर व प्रदीर्घ कालावधीसाठी झाल्यास गळ्याखाली सूज येते. याचा अर्थ त्यांना जंतनाशकाची मात्रा देणे आवश्‍यक ठरते.
 • फमाचा चार्ट ः फमाचा चार्ट संशोधनाद्वारे तयार करण्यात आलेला आहे. याद्वारे हिमॉन्कस कॉन्टूरट्‌स या जंताची लागण जास्त प्रमाणामध्ये झाल्यास ॲनिमिया होतो. रक्तक्षय झाल्यामुळे डोळ्याच्या आतील पापुद्रे लाल, कमी लालसर, फिकट लालसर, फिकट, पांढरे पडतात. या पापुद्र्याच्या रंगावरून जंतनाशकाची मात्रा देणे आवश्‍यक आहे हे ठरवावे.
 •   जंतनाशकाची मात्रा देण्याचे वेळापत्रक ठरविण्याचे नियोजन  वेळापत्रक ठरवताना जनावराचे वय, पाऊस पडल्यास सुरुवात झाली तो दिनांक व गवताची उपलब्धता हे तीन घटक महत्त्वाचे ठरतात.

 • वय :  गाय-म्हैस यांच्यासाठी वासराचा वयोगट, प्रसूतिपूर्व-पश्‍चात व कालवड माजावर येण्यापर्यंतचे वय, या वेळेस जंतनाशकाची मात्रा देणे योग्य ठरते. शेळी/मेंढीच्या सर्व वयोगटांमध्ये मात्रा देणे आवश्‍यक असते.
 • पाऊस :  प्रथम पावसाचा दिनांक त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रथम मात्रा द्यावी.
 • गवताची उपलब्धता :  पावसाळा, हिवाळ्याचा कालावधी जोपर्यंत कुरणावर चरण्यासाठी गवत उपलब्ध आहे. तोपर्यंत दर ३५ ते ४० दिवसांनी जंतनाशकाची मात्रा द्यावी. म्हणून पावसाळा ऋतूतील पहिला पाऊस यांचा दिनांक ते गवताची उपलब्धता हा शेवटचा दिवस ठरावा. यादरम्यान मात्रा द्यावी. म्हणून जंतनाशक देण्याचे वेळापत्रक हे प्रतिवर्ष पावसाचा दिनांक व ठिकाण यावर अवलंबून असते. प्रत्येक ठिकाणासाठी ते वेगळे असते. कारण प्रत्येक ठिकाणी त्या भौगोलिक परिस्थितीनुसार पाऊस पडत असतो. गवताची उपलब्धता अवलंबून असते.
 • जंतनाशकांना प्रतिकार  जनावरांना जंतापासून संरक्षण देण्यासाठी नियमितपणे/ ठराविक कालांतराने/ काही प्रसंगी जंतनाशकाची मात्रा दिली जाते यास ‘डिवर्मिंग’ म्हणतात; परंतु काही कारणाने काही जंतनाशकाच्या प्रति प्रतिकारशक्ती विकसित होते. उदा. अलबेनडॅझॉल या जंतनाशकाविरुद्ध ‘हिमॉन्कस कॉन्टूरट्‌स’ जंताने प्रतिकारशक्ती विकसित केली आहे असे आपण म्हणतो. म्हणजेच ‘हिमॉन्कस कॉनटूरट्‌स’ हे जंत (५० टक्के अधिक) नेहमी दिलेल्या अलबेनडॅझॉलच्या मात्रेला दाद न देता प्रतिकार करतात. यास ‘जंतनाशकांना प्रतिकार’ असे म्हणतात. हा प्रतिकार ते आपल्या जनुकीय पातळीवर घडवतात आणि पुढील पिढ्यांमध्येदेखील परावर्तित करतात. म्हणून असे जंतनाशक कायमस्वरूपी या जंताच्या विरुद्ध निकामी ठरते. पर्यायी एक चांगले जंतनाशक कुचकामी ठरते. म्हणूनच ही एक घातक प्रक्रिया असून, यामागे अनेक कारणे सांगता येतील; परंतु सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे मानवनिर्मित असते व त्यासाठी अनेक चुका कारणीभूत ठरतात. यामुळे अनेक पटींनी आर्थिक नुकसान होते. म्हणून हे टाळणे अतिशय आवश्‍यक आहे. संपर्क - डॉ. बाबासाहेब नरळदकर - ९४०३८४७७६४ डॉ. गजानन चिगुरे - ९७६१९६४९९९ (पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com